अमरनाथ यात्रेला स्थगिती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019
Total Views |



यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; गुप्तचर यंत्रणांची माहिती

 

नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात अमरनाथ यात्रेच्या मार्गावर पाकिस्तानी भुसुरुंग आणि एक 'स्नायपर रायफल' सापडल्यानंतर अमरनाथ यात्रा तातडीने थांबवण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना तात्काळ काश्मीर सोडण्याचे आवाहन करत भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सीमेपलीकडून अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्याचे कट कारस्थान रचला जात असल्याचा दावा केला. भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचे माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांच्या कुरापत्यांमुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आल्यानंतर जगभरातून दहशतवाद्यांचा निषेध करण्यात येत आहे.

 

अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी भारतीय लष्कर, सीआरपीएफ; तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ढिल्लन म्हणाले, "सुरक्षारक्षकांनी अमरनाथ यात्रेच्या मार्गावर हाती घेतलेल्या शोधमोहिमेदरम्यान, एका ठिकाणाहून 'अमेरिकन स्नायपर रायफल एम-२४' जप्त केली. तर काही ठिकाणी भूसुरुंग लावलेले आढळून आले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्यापही शोधमोहीम सुरू आहे," असेही ते म्हणाले.

 

काश्मीरातील हिंसाचाराच्या परिस्थितीबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, "आतापर्यंत पकडण्यात आलेल्या किंवा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी ८३ टक्के लष्करावर दगडफेक करणारे तरुण असल्याचे आढळून आले आहे. सुरुवातीला ५०० रुपये घेऊन तरुण मंडळी दगडफेक करतात आणि नंतर दहशतवादी होतात. त्यामुळे सर्व माता-भगिनींना आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे" असे आवाहन ढिल्लन यांनी यावेळी केले.

 

पाकिस्तानचाच हात

 

"काश्मीर खोऱ्यात हिंसाचार घडवला जाऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच लष्कराने अमरनाथ यात्रेच्या मार्गावर शोध मोहीम राबवली. त्या दरम्यान एक दहशतवादी ठिकाण उध्वस्त केले. तेथून अमेरिकन बनावटीची एक एम-२४ रायफल हस्तगत करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी बनावटीची अँटी पर्सनल माइनही जप्त केली आहे. त्यामुळे काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या कटामागे थेट पाकिस्तान आणि आयएसआयचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे," असे लेफ्टनंट जनरल सरबजीतसिंग ढिल्लन यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@