भारत-भूतान आपलेपणाचे संबंध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |


 


पाकिस्तानने भारताविरोधात सुरू केलेल्या विखारी प्रचारामुळे भारताबद्दल जागतिक पातळीवर गैरसमज निर्माण होण्याची, तसेच भारतविरोधी शक्ती त्याचा फायदा घेण्याची शक्यता होती. मात्र, मोदींनी भूतानला भेट दिल्याने भारताच्या कोणत्याही कृतीकडे टक लावून बसलेल्यांच्या हाती धुपाटणेच आले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांतच भूतानला भेट दिली. शनिवार आणि रविवारच्या दोन दिवसीय भूतान दौऱ्यात नरेंद्र मोदी व भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात जलविद्युत प्रकल्प, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, नॅशनल नॉलेज नेटवर्क, उपग्रह, रुपे कार्ड यांसह इतरांचा समावेश होतो. वस्तुतः मोदींचा भूतान दौरा एका ऐतिहासिक पार्श्वभूमीवर झाला, ज्याचा संबंध जम्मू-काश्मीर, पाकिस्तान आणि संयुक्त राष्ट्रांशीही आहे. भारताने 'कलम ३७०' व '३५ अ' निष्प्रभ केल्यानंतर पाकिस्तानने आक्रस्ताळा थयथयाट चालवल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान, परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी आणि लष्कराचे प्रतिनिधी सातत्याने भारताविरोधात आगपाखड करत आहेत. सोबतच भारताला विस्तारवादी, युद्धखोर वगैरे ठरविण्यासाठीही तो देश आटापिटा करत असल्याचे दिसते. अशात नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीर प्रश्नावर केंद्र सरकार व संसदेने सर्वसहमतीने जो निर्णय घेतला, त्यानंतर भूतानसारख्या चिमुकल्या देशाची वाट धरली. इथेच भारत आक्रमक वा वर्चस्ववादी नसल्याचे स्पष्ट होते. कारण, भारताला जर युद्धाची खुमखुमी असती तर पाकिस्तानप्रमाणेच जगातील बलाढ्य देशांत जाऊन त्यादृष्टीने पावले उचलली असती. परंतु, भारताने तसे काही केले नाही व भूतानचा पर्याय निवडला. मोदींनी भूतानी जनतेला संबोधित करतानाही असेच सांगितले की, "आज मी भूतानच्या भविष्यासाठी उभा आहे." म्हणजेच भारत आपल्याबरोबरच शेजाऱ्यांनाही भविष्यातील विकासाच्या, प्रगतीच्या, समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाऊ इच्छितो, हे यातून समजते. शिवाय भूतान हा कितीही छोटुकला देश असला तरी त्याच्या हातात हात घालून पुढे जाण्याचा भारताचा मनोदय असल्याचेही यावरून कळते. अशा देशाला पाकिस्तानसारखा कांगावखोर देश जर हल्लेखोर वा प्रादेशिक शांततेचा भंग करणारा म्हणत असेल तर ते चुकीचेच, हा संदेश मोदींनी आपल्या भाषणातून दिला. पाकिस्तानने भारताविरोधात सुरू केलेल्या विखारी प्रचारामुळे भारताबद्दल जागतिक पातळीवर गैरसमज निर्माण होण्याची, तसेच भारतविरोधी शक्ती त्याचा फायदा घेण्याची शक्यता होती. मात्र, मोदींनी भूतानला भेट दिल्याने भारताच्या कोणत्याही कृतीकडे टक लावून बसलेल्यांच्या हाती धुपाटणेच आले.

 

भारत आज नवतेच्या, आमूलाग्र परिवर्तनाच्या काळातून जात आहे. मोदींच्या हाती देशाची सत्ता आल्यापासून सातत्याने शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, उद्योग, संरक्षण, आधुनिक ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात भरीव कार्याला सुरुवात झाली. भारताच्या या सर्वांगीण कर्तृत्वाचा शेजाऱ्यांनाही लाभ व्हावा, अशी मोदींची इच्छा आहे आणि ही बाब त्यांनी भूतानमध्ये बोलूनही दाखवली. भारत भूतानमध्ये जलविद्युत प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक करत आहे. त्याआधीही भारताने तिथे या क्षेत्रात काम केलेले आहे. भूतानची भौगोलिक रचना जलविद्युत निर्मितीसाठी उपयुक्त आहे, मात्र, आर्थिक, तांत्रिक मर्यादांमुळे त्याचा पुरेपूर वापर भूतानला करता येत नाही. अशा परिस्थितीत भारताने केलेली मदत भूतानसाठी महत्त्वाची ठरते, जेणेकरून तो देशही अधिकाधिक ऊर्जा उत्पादन, त्याची विक्री किंवा औद्योगिक वापरातून आपले हित साधू शकेल. मोदींनी 'आयुष्मान भारत' सारखी जगातली सर्वात मोठी आरोग्य क्षेत्रातील योजना लागू केली. आता भूतानच्याही आरोग्यविषयक आवश्यकतांच्या परिपूर्तीसाठी भारताने सहकार्य देऊ केले आहे. तिथे भारताच्या सहयोगाने उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवरून हे दिसते. सोबतच भारताच्या अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने 'चांद्रयान', 'मंगळयान', एकाचवेळी १०० उपग्रहांचे प्रक्षेपण आदी गोष्टींतून स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आता भारत अंतराळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचाच नाही तर भूतानच्या विकासासाठीही कटिबद्ध आहे. 'इस्रो'चे भूतानमधील ग्राऊंड स्टेशन त्याचेच परिचायक आहे.

 

दुसरीकडे "भूतान हा देश भौगोलिकदृष्ट्या केवळ भारतालगत आहे म्हणून आपल्याला त्याबद्दल आपुलकी वाटत नाही," असे मोदी म्हणाले. मोदींचे म्हणणेही खरेच आहे, कारण तसेच असते तर आज पाकिस्तानशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असायला हवे होते; चीनची गणनाही भारताचा विश्वासू साथीदार म्हणून व्हायला हवी होती. परंतु, भौगोलिकतेने हे दोन्ही देश भारताच्या जवळचे असले तरी त्यांचे उद्योग संबंध बिघडवणारेच ठरतात, तर भूतानशी मात्र भारताची सीमा तर भिडलेली आहेच. पण, दोन्ही देशांचा इतिहास, संस्कृती, पारंपरिक रिती-रिवाज सामायिक पातळीवर येणारे आहेत. म्हणूनच या आपलेपणा वाटणाऱ्या गोष्टी दोन्ही देशांतील संबंधांत प्रगाढता आणताना दिसतात. सोबतच भारत आणि भूतानमध्ये झालेल्या करारानुसारही हे दोन्ही देश मैत्रीच्या धाग्यात बांधले गेले. तद्नुसार २०१७ साली भारत, भूतान आणि चीनमधील डोकलामवरून उद्भवलेल्या वादात भारताने भूतानची साथ देत चीनच्या बळजोरीला अटकाव केला. चीनसारखा अजस्त्र देश समोर असतानाही भारताने भूतानची बाजू घेतली. यातून भूतानच्याही मनात भारताबद्दलचा विश्वास आणखी दृढ झाला. एकीकडे चीन छोट्या देशांवर स्वतःचे प्रभुत्व निर्माण करण्यासाठी, दक्षिण चीन समुद्रातील बेटे घशात घालण्यासाठी उचापत्या करत असताना, भारत मात्र तसे काही न करता छोट्या देशांची पाठराखण करत असल्याचे यातून सिद्ध झाले. बदलत्या जागतिक राजकारणात भारताची ही प्रतिमा इतरांना खूप काही सांगून गेली. आज पाकिस्तान व चीनसारखे शेजारी देश भारताला पाण्यात पाहत असताना आपली सौहार्दाने, सलोख्याने, सामंजस्याने राहणारा देश, ही ओळख अतिशय महत्त्वाची आहे. तसेच कोणी आगळीक केली, तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याचेही धाडस राखून आहोत, हे सांगणेही त्यामुळे सुलभ होते. आताची भारताची पाकिस्तान आणि भूतानबद्दलची भूमिका या दोन्हीचे निदर्शक आहे. तुकाराम महाराजांनी याचेच वर्णन 'मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।' अशा नेमक्या शब्दांत केलेले आहे. जम्मू-काश्मीरसंबंधीचा भारताचा निर्णय, नंतरची भारताची अण्वस्त्रविषयक प्रतिक्रिया आणि मोदींचा भूतान दौरा या घडामोडी या पद्धतीनेही परस्परांशी जोडलेल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@