राम मंदिराची पहिली वीट आम्ही ठेवू! बाबर वंशज याकूब तुसी यांची भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |



हैदराबाद : "अयोध्या ही भगवान रामाचीच भूमी असल्याने, तिथे भव्य राम मंदिर उभारले जावे, अशी आमचीही इच्छा आहे आणि मंदिराचा मार्ग प्रशस्त झाल्यास या मंदिराची पहिली वीट आम्हीच ठेवू," अशी भूमिका बाबरचे वंशज आणि हैदराबादचे राजकुमार याकूब हबिबुद्दीन तुसी यांनी विशद केली. रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यात आम्हाला पक्षकार करण्यात यावे, अशी मागणी तुसी यांनी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेतून केली होती, पण न्यायालयाने ती अमान्य केली होती.

 

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, "अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारण्यात यावे, अशी आमची मनापासून इच्छा आहे. ज्या जमिनीवरून वाद निर्माण झाला आहे, त्या जमिनीच्या मालकी हक्काचे दस्तावेज कुणाकडेच नाहीत. अशावेळी मुघल साम्राज्याचा वंशज या नात्याने न्यायालयात बाजू मांडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. जमिनीचा मालकी हक्क कुणाला द्यावा, यावर माझे मत एकदा तरी ऐकून घ्यायला हवे," असे ते म्हणाले.

 

"सन १५२९ मध्ये मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबरने आपल्या सैन्याला नमाज अदा करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी बाबरी मशीद बांधून दिली होती. हे स्थळ केवळ सैन्यासाठी होते. या जागेवर आधी काय होते, या वादात मला पडायचे नाही. मात्र, ही भूमी भगवान श्रीरामाचे जन्मस्थळ आहे, अशी हिंदूंची श्रद्धा आणि दृढ विश्वास असेल, तर एक सच्चा मुस्लीम या नात्याने त्यांच्या भावनांचा मी नक्कीच आदर करेन," असेही तुसी म्हणाले. "मुघल साम्राज्याचा वंशज या नात्याने मला या जमिनीचा मालकी हक्क मिळाला, तर ही जमीन मी राम मंदिर उभारण्यासाठी दान करेन," असेही तुसी यांनी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@