सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृध्द - विनोद तावडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2019
Total Views |



मुंबई : सोशल मिडिया म्हणजे करमणूक अथवा वेळ घालविण्याचे साधन नाही तर या माध्यमामुळे उत्तम मूल्यनिर्मिती, समृध्द विचार आणि विविध विषयांची सकारात्मक चर्चा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, असा विश्वास मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी यांच्या वतीने आजपासून दोन दिवस (१७, १८ ऑगस्ट) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पहिले राज्यस्तरिय मराठी सोशल मिडिया संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, समीर आठल्ये, मंगेश वाघ, प्रदीप लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

पहिल्या सोशल मिडिया संमेलनात आपले विचार मांडताना तावडे पुढे म्हणाले की, अभिव्यक्ती समृध्द करण्यासाठी सोशल मिडिया हे पूरक व्यासपीठ आहे. त्यामुळे तमाम मराठी भाषाप्रेमींनी सोशल मिडियावरील मराठी साहित्यामध्ये विशेष रुची घेतली पाहिजे आणि या संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विकासासाठी स्वतःला जोडून घेतले पाहिजे. त्यामुळे मराठी भाषा मराठी भाषिकांपर्यंत अधिक ताकदीने पोहोचविण्यामध्ये आपण यशस्वी होऊ, असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला. माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात सोशल मिडियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोशल मिडियामुळे जागतिक स्तरावरील मराठी जनता एकत्र बांधली गेली असून मराठीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे. येणाऱ्या काळात मराठी भाषा विभागामार्फत प्रचलित साहित्यिक आणि सोशल मिडियावर लिहिणाऱ्या साहित्यिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि येत्या काळात हे माध्यम अधिक शक्तिशाली करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील, असेही तावडे म्हणाले.

 

सोशल मिडियावर लिहिला जाणारा मजकूर हा साहित्याचा प्रकार आहे. आजची तरुणाई या माध्यमाला आपलेसे करून या माध्यमात अधिक उत्तमपणे व्यक्त होत आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या महापुराच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखविल्याच, पण सोशल मिडियावर तर बातम्यांचा महापूर पाहायला मिळाला. त्यामुळे या माध्यमाचे अस्तित्त्व नाकारून चालणार नाही. हे माध्यम केवळ तरुणपिढीच्या मनोरंजनाचा विषय राहिला नसून, लोकशाही व्यवस्था बदलण्याचे सामर्थ्य या माध्यमात असल्याचे तावडे यांनी नमूद केले. वन टू मेनी या प्रणालीचा अवलंब करून सोशल मीडियाद्वारे क्षणार्धात अनेकांपर्यंत पोहचता येते. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी समाज प्रसारमाध्यम हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे असे सांगतानाच तावडे म्हणाले की, सद्यस्थितीत, कलाकार, विचारवंत, अभ्यासक, लोकनेते, व्यावसायिक यांचा सोशल मिडियावरचा वाढता वावर सकारात्मक दृष्टीने पाहता, मराठी भाषेच्या विकासासाठी अतिशय पूरक आहे. सोशल मिडियात क्रियाशील होण्यासाठी व मराठीचा विकास साध्य करण्यासाठी संबंधित विषयांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळा घ्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

अजय अंबेकर म्हणाले की, सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्वाचे योगदान देणाऱ्या समाज माध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होणे आवश्यक आहे. सोशल मिडियाचे महत्व, सोशल मिडियाची शक्ती लक्षात घेता मराठी भाषा संमेलन जसे आज जागतिक स्तरावर पोहोचले आहे, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात मराठी सोशल मिडिया संमेलन जागतिक स्तरावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

@@AUTHORINFO_V1@@