विविध धर्मप्रणालीतील चिह्नसंकेत : रांगोळी संस्कृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2019   
Total Views |



माझ्या लिखाणात मी नेहमीच 'प्राचीन भारतीय संस्कृती' असा उल्लेख करत असतो. मूर्ती, शिल्प, चित्र, शब्द, लिखित साहित्य अशा अनेक माध्यमांतून अशी संस्कृती स्पष्ट होत जाते. वेगवेगळ्या प्रदेशातील प्रथा, परंपरा, भाषा, परिधान, कुटुंब पद्धती, इतिहास, भूगोल, रसना संस्कृती, अलंकार पद्धती अशा समाजशास्त्राच्या विविध पैलूंच्या अभ्यासातून त्या त्या समाजाच्या संस्कृतीचा परिचय मिळत असतो. त्या समाजाची आध्यात्मिक मूल्ये, धार्मिक मूल्ये, नैतिक मूल्ये काय आहेत आणि ती तशी का आहेत, याचा व्यापक संदर्भ मिळतो. वर उल्लेख केलेल्या समाजाच्या प्रत्येक पैलूंच्या काही सहस्र वर्षांच्या वापराच्या सातत्याने, प्रथा आणि परंपरा निर्माण होतात. लोकश्रुती आणि लोकश्रद्धा विकसित होतात. हीच त्या त्या समाजाची संस्कृती असते. आजच्या लेखात अशाच एका सामाजिक पैलूंचा, रांगोळी संस्कृतीचा, त्याच्या प्राचीन प्रथेचा-परंपरेचा परिचय आपण करून घेणार आहोत.


सत्ता, यश, धनशक्ती यांच्या जोरावर प्रत्येक समाजात, प्रत्येक व्यक्तीआनंद मिळवतचअसते. मात्र, या पलीकडे 'संस्कृती' या संबोधनाने ओळखली जाणारी प्रथा आणि परंपरेने जपलेली एक जीवनशैली अत्यंत आवश्यक असते. या संस्कृतीमुळेच समाज ओळखला जातो. अशा जीवनशैलीची प्रगती एकट्या व्यक्तीमुळे कधीच होत नसते. संपूर्ण समाजाने अशी विशिष्ट जीवनशैली स्वीकारली तरच ती संस्कृती, प्रथा-परंपरेच्या सातत्याने अनेकानेक अमूर्त, अस्पष्ट, अदृश्य संकल्पना वास्तव दृश्य-श्राव्य माध्यमातून मूर्त, स्पष्ट, दृश्य स्वरूपात साकार करते. अशी दृश्य स्वरूपात जपली गेलेली संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, परिधान, अलंकार, खेळणी आणि दैनंदिन घरगुती वापरातली भांडी, अवजारे, वस्तू, साधने या दृश्य माध्यमातून व्यक्त होते. प्रथा-परंपरा आणि प्रचलित मूल्य सिद्धांत या जीवनशैलीतील पैलूंमुळे आपल्याला त्या समाजाच्या अमूर्त, अस्पष्ट, अदृश्य संकल्पनांचा परिचय करून घेता येतो. या दृश्य, स्पष्ट, मूर्त माध्यमांची सांगड अदृश्य, अस्पष्ट, अमूर्त संकल्पनांशी घालणे हे संशोधकाचे कौशल्य असते. प्राचीन भारतीय रांगोळी अथवा रंगावली ही प्रथा-परंपरा. मात्र, संस्कृतीची अल्पायुषी अथवा क्षणभंगुर व्यक्तता असेच म्हणायला हवे. 'आमच्या वेळी असे नव्हते,' असे उद्गार आपण आपल्या आधीच्या पिढीतील लोकांकडून नेहमीच ऐकत असतो. मात्र, प्रगत होणारी आणि बदल घडणारी कुठलीही संस्कृती कालचक्राप्रमाणे नसते तर ती नदीसारखी असते. नदीचा प्रवाह सतत पुढे जातो आणि जाताना दोन्ही किनार्‍यावरच्या गोष्टी आपल्यात सामावून घेतो. अगदी तसेच वैशिष्ट्यपूर्ण बदल सहस्र वर्षांपासून प्रगत होणार्‍या संस्कृतीमध्ये नियमित घडत असतात. अल्पायुषी रांगोळी अथवा रंगावली कला आणि त्याच्या प्रथा-परंपरासुद्धा त्याच 'क्षणभंगुरता' या वैशिष्ट्याने अलंकृत आहेत. या रांगोळी कलेला 'अल्पायुषी' म्हणण्याचे कारण इतकेच की, घराच्या अंगणात किंवा देवघरापाशी किंव देवळाच्या आवारात अशी रांगोळी दररोज नव्याने रेखाटली जाते म्हणून तिला 'अल्पायुषी' या संबोधनाने अलंकृत केले आहे. ही अल्पायुषी रांगोळी आणि त्यातील प्रवाही बदल कसे झाले ते पाहणे रंजक आहे. साधारण विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात नागरी आणि ग्रामीण समाजातील कुटुंबातील सर्व सदस्य जेवणासाठी मांडी घालून जमिनीवर आसनावर बसत असत. अलीकडच्या काळात बदललेल्या पद्धतीनुसार कुटुंबातील सर्व सदस्य खुर्चीवर बसून डायनिंग टेबलवर ठेवलेल्या ताटातून जेवतात. लग्न समारंभात आता ताट हातात घेऊन उभ्याने जेवण्याची बुफे पद्धती प्रचलित झाली आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मात्र, लग्न-मुंज अशा खास प्रसंगात जमिनीवर पंगत मांडली जात असे. त्या पंगतीत मुंज झालेला बटू किंवा लग्न समारंभात नवपरिणीत वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या पानासमोर खास रांगोळी कुशल हाताने रेखाटली जात असे. (चित्र क्र. १) अलीकडच्या काळात जेवणाच्या ताटाभोवतीची रांगोळी दुर्मीळ झाली आहे. अलीकडे ताटाभोवती पुठ्ठ्यावर काढलेली रांगोळी मांडली जाते आणि पंगत उठल्यावर पुन्हा वापरण्यासाठी कागदात गुंडाळून ठेवली जाते. कित्येक समारंभात या मराठी परंपरेतील रांगोळीचा वापर दुर्मीळ झाला आहे.

 

 
 

सामान्यत: परकीय संस्कृतीच्या आक्रमणानंतर आक्रमकांची संस्कृती जिंकलेल्या प्रजेवर राबवली जाते. मात्र, या प्राचीन भारतीय रांगोळी संस्कृतीचे दुसरे वैशिष्ट्य असे की, साधारण एक सहस्र वर्षांपासून झालेल्या परकीय आक्रमणांनंतरसुद्धा या रांगोळीतील मूळ रेखांकन आणि चिह्ने बदलली नाहीत. नागरी आणि ग्रामीण समाजात या रांगोळ्यांचा आणि त्यातील रेषा आणि आकृत्यांचा वापर कुटुंब पातळीवर नियमित होत राहिला, हे आपली रांगोळी संस्कृती टिकून राहण्याचे प्रमुख कारण असावे. (चित्र क्र. २) याचवेळी रांगोळी काढण्यासाठी वापरली जाणारी पूड, रांगोळी रेखाटण्याचे तंत्र आणि रंगसंगतीची शैली यात बदल होत राहिले होतेच. आता रांगोळीची पूड वापरण्याऐवजी खडूचा वापर केला जातो. पाण्याने भरलेल्या पसरट भांड्यात तरंगती रांगोळी रेखाटली जाते. मुघल राजवटीच्या वेळी आलेले पातळ पत्र्यावर कोरलेले साचे वापरले जातात. भाषा आणि प्रथा-परंपराचे वैविध्य असलेल्या आपल्या विशाल देशात, आधुनिक अणुविज्ञानाचा स्वीकार करताना त्याच वेळी प्राचीन प्रथा-परंपराही तितक्याच जाणीवपूर्वक वापरल्या जातात, हे आपल्या रांगोळी संस्कृतीचे तिसरे वैशिष्ट्य. आधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय कुटुंबजीवन आणि समाजव्यवस्थेत प्राचीन काळापासून रांगोळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 'रांगोळी,' गुजरातमध्ये 'रंगावली,' राजस्थानात 'मंडन,' तामिळनाडू आणि केरळमध्ये 'कोलम,' आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये 'मुग्गु,' बंगाल-ओडिशात 'अल्पना,' छत्तीसगढमध्ये 'चौकपूर्णा,' उत्तरप्रदेशमध्ये 'चौकपूजन,' बिहारमध्ये 'अरीपणा' या आणि अशा असंख्य संबोधनांनी रांगोळी भारतवर्षात सर्वपरिचित आहे. या प्राचीन भारतीय रांगोळी कलेचा प्रादेशिक चेहरा या वर्णनात स्पष्टपणे जाणवतो. जगभरातील संस्कृतींमध्ये रूढी, रिवाज, धार्मिक श्रद्धेच्या पद्धती, संस्कार विधी या सर्व व्यवहारात घराच्या भिंती, जमिनी, अंगण, दारे-खिडक्यांवर रंगीत चिह्ने आणि प्रतीके रेखाटण्याची पद्धत प्रचलित आहे. यातलाच एका प्रकार म्हणजे विविध नावांनी प्रदेशागणिक ओळखली जाणारी भारतीय रांगोळी कला. भारतीय संस्कृतीचा अपवाद वगळता, जगभरात या कलेला गौण-अल्प कलेचा दर्जा दिला गेला. प्राचीन काळापासून भारतीय रांगोळीला मात्र पूर्ण कलेचा दर्जा दिला गेला आहे.

 

आपल्या या रांगोळीचे चौथे वैशिष्ट्य असे की, ही सामूहिक अथवा सामाजिक स्वरूपाची कला आहे. एका कलाकाराच्या नावाने ती ओळखली जात नाही. सर्व परदेशातील भारतीय समाजात रांगोळी कला घराघरातील कुटुंबवत्सल महिलेची आणि तिच्या अंगभूत कौशल्याची ओळख आहे. याच्या निर्मितीचा काल शोधणे आवश्यक नाही. मात्र, याच्या व्यक्ततेच्या अनेक पद्धती आणि रीती याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. रांगोळीसारखी काही सहस्र वर्षे प्रचलित झालेली लोककला, आपल्याला त्या त्या समाजाच्या व्यक्तिमत्त्वाचा, कालपरत्वे परिचय देत असते. भारतातील प्रादेशिक रांगोळी कलेचे वैविध्य त्या त्या प्रदेशातील निसर्ग, झाडे, फुले, पक्षी, प्राणी, नद्या, डोंगर यातील रूपके वापरून समृद्ध होते. 'स्वस्तिक,' 'मंगल कलश,' 'ओंकार' ही प्रतीके तीच असली तरी प्रदेशागणिक त्याची शैली बदलत जाते. बंगालमधील 'शाक्त तांत्रिक अल्पना' या नावाने ओळखल्या जाणार्‍या रांगोळ्यांमधे फक्त घुबडाचे प्रतीक वापरले जाते. भारतातील अन्य कुठल्याही शैलीमध्ये या प्रतीकाचा वापर केला जात नाही. टिंब, रेषा, वर्तुळ, चौकोन, त्रिकोण या सर्व भूमितीय आकृत्यांचा वापर रांगोळीमध्ये केला जातो. उत्तरप्रदेशातील चौकोनी रांगोळ्या 'चौक' या संबोधनाने ओळखल्या जातात. लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती अशा देवतांच्या उपासनेसाठी 'चौक' रेखाटले जातात. (चित्र क्र. ३) चित्र क्र.३ या रांगोळीत टिंब वापरली गेली आहेत. ही टिंब देवतेच्या लौकिक आणि वास्तव जगातील सार्वभौम अस्तित्वाचे प्रतीक आहेत. यातील वर्तुळांची प्रतीके वृद्धी आणि प्रगतीचे संकेत देतात. ही चिह्ने समाजमनातील श्रद्धास्थाने आहेत. महाराष्ट्रात रामनवमी उत्सवात रेखाटल्या जाणार्या रांगोळीमध्ये चौकोनाचा वापर केला जातो. (चित्र क्र. ४) चित्र क्र.४ मध्ये काढलेली रांगोळी रामाच्या पाळण्याचे प्रतीक आहे. याच्या मध्यभागी अगदी प्राथमिक 'स्वस्तिक'चे चिह्न आहे. त्याच्या चारही कोनांमध्ये चार छोटे चौकोन अंकित झाले आहेत. समाजाची श्रीरामावरील श्रद्धा चारही दिशांनी वृद्धिंगत झाल्याचे संकेत हे चार चौकोन देतात. महाराष्ट्रातील काही समाजात मुंज, लग्न असे मंगल प्रसंग संपन्न झाल्यानंतर, बोडण विधीचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात कुमारिकांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले जाते. याप्रसंगी (चित्र क्र. ५) रेखाटली जाणारी रांगोळी फारच लयदार असते. प्राथमिक स्वस्तिकच्या आकारात असलेली ही रांगोळी गणितातील 'अधिक' चिह्नाचा आकार रेखाटताना सुंदर लयीत नक्षी काढते. मात्र, यात नक्षीची रेषा कुठेही तुटत नाही. सकारात्मक ऊर्जा परावर्तित करणारी ही रांगोळी, नवपरिणीत वधूला गुंतागुंतीचे, लयदार तरीही संपन्न वैवाहिक जीवन कसे असेल त्याची सचित्र संकल्पना स्पष्ट करते. अलीकडे मात्र बोडण समारंभ आणि त्याची रांगोळी दुर्मीळ झाली आहे. वैष्णव संप्रदायातील परंपरेनुसार आरेखित होणारी 'सांझी' रांगोळी स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये राखून आहे. ब्रजभूमीतील वृंदावनात आरेखित होणारी 'सांझी' रांगोळी, शेणाने अथवा मातीने सारवलेल्या जमिनीवर अष्टकोनात काढली जाते. वैष्णव परंपरेत या रांगोळीमध्ये श्रीकृष्णाच्या जीवनातील आख्यायिकांचे रेखाटन केले जाते. बारीक नक्षीदार नाजूक रेखाटन, आकर्षक रंगसंगती आणि प्राचीन चिह्न-प्रतीकांचा वापर ही 'ब्रजभूमी' शैलीतील 'सांझी' रांगोळीची वैशिष्ट्ये आहेत. 'चिह्ननिमित्त निमित्त चिह्न' या लेखमालेच्या अंतिम टप्प्यात अत्यंत समृद्ध अशा रांगोळी संस्कृतीचा वेगळा विस्तारित परिचय पुढील लेखात अवश्य वाचावा...

@@AUTHORINFO_V1@@