विश्वआदराचे स्थान भारत आणि रा. स्व. संघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2019   
Total Views |

 

 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क मंडळाचे सदस्य, ‘विश्व अध्ययन केंद्र फॉर ग्लोबल स्टडिज’ (चेन्नई सेंटर)चे मार्गदर्शक, भारताबाहेर कार्य करणार्‍या हिंदू स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले आणि ज्यांनी मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, मलेशिया, फिजी, थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग आणि इतर युरोपियन राष्ट्रांमध्ये काम केले आहे, असे रवीजी अय्यर यांच्याशी जागतिक स्तरावरील भारताची स्थिती आणि रा. स्व. संघाबाबत जगातील लोकांचे मत, याबाबत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा खास संवाद...
 
 

आपण भारताबाहेर इतर देशांमध्येही भ्रमंती करतात. लोकांशी संवाद साधता. तेव्हा, सद्यस्थितीत जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे?

 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर आंतरराष्ट्रीय पटलावर भारत अत्यंत मजबूत स्थितीत आहे, असे मला वाटते. याची आपल्याला अनेक उदाहरणे पाहता येतील. २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, तेव्हा त्यांनी जगातील अनेक देशांना भेटी दिल्या. त्यांच्या प्रत्येक भेटीमध्ये जगभरातील विकसित आणि विकसनशील देशांच्या प्रमुखांनी मोदींचे मोठ्या आदराने स्वागत केल्याचे आपण सर्वांनीच पाहिले आहे. ज्या देशात भारतीय नाही, अशा देशांतील लोकदेखील आज भारताचे म्हणणे ऐकून घेण्यास उत्सुक आहेत. आज जगातील जवळपास सर्वच देशांना आपले भारताशी आपुलकीचे नाते आहे, असे वाटते. डोकलाम संघर्षात चीन केवळ ७२ दिवसांमध्ये माघारी गेला. भारत आंतरराष्ट्रीय पटलावर मजबूत असल्याचेच हे द्योतक आहे. हे यश भारताचे नसून आमचे आहे, असे अनेक देशांना वाटते आहे, हे विशेष. भारताचे अंतरिक्ष कार्यक्रम यशस्वी होत असून त्याचा आनंद जग साजरा करत आहे. सौदी अरेबिया आणि येमेन संघर्षात जगभरातील अनेक देशांनी येमेनमध्ये अडकलेले आपले नागरिक बाहेर काढण्यासाठी सौदीला बॉम्बवर्षाव थांबविण्याची विनंती केली होती. मात्र, सौदीने केवळ भारताची विनंती मान्य केली आणि एका तासात भारताने आपले आणि इतर देशांचे नागरिक येमेनच्या हवाईपट्टीवरून ‘एअर लिफ्ट’ करून बाहेर काढले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास इस्लाम राष्ट्रे मदत करणार नाहीत, असा एक सूर लावला जात होता. मात्र, अनेक इस्लामिक राष्ट्रांनी भारताला मदत केल्याचे २०१४ नंतर दिसून आले. अफगाणिस्तानमध्येदेखील भारतीय व्यापार करमुक्त झाला. आज इराण-इराक यांच्यात संघर्ष कायम असला तरी, त्यांचे भारताशी असणारे संबंध सलोख्याचे आहेत. त्यामुळे जगात भारताचे स्थान आदराचेच आहे. 

 
 
अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या मनात पाकिस्तानबद्दल द्वेष आहे, हे अलीकडे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.भारताची अफगाणिस्तानबद्दल काय भूमिका असावी आणि त्याचा फायदा पाकसंबंधी धोरणांमध्ये भारताला होईल, असे आपल्याला वाटते का?
 

भूराजकीय व्यवस्थेत कायमच बदल होत असतात. त्यामुळे राजकीय संबंधांची शाश्वती देणे तसे अवघड आहे. मात्र, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध हे शाश्वत ठरू शकतात. अफगाणिस्तान-भारत संबंधांमध्ये हे संबंध नक्कीच मैलाचा दगड ठरतील. भारत आणि अफगाणिस्तान यांचे प्राचीन काळापासून संबंध आहेत. इतिहासात डोकावले तर आपल्या लक्षात येईल की, अफगाणिस्तानमध्ये अनेक हिंदू राज्यकर्त्यांनी राज्यकारभाराची धुरा सांभाळली आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या अनेक मूर्ती अफगाणिस्तानमध्येदेखील आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या कालगणनेतदेखील साम्य आहे. काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करझाई यांनी मध्य आशियातील मुस्लीम राष्ट्रांच्या परंपरेनुसार सहा मुस्लीम देशांमधील राष्ट्रपतींना बोलवून ‘नवरोज’ साजरा केला. तेव्हा करझाई यांनी, “ ‘नवरोज’ साजरा केल्यामुळे माझे सहा हजार वर्षे आयुष्य वाढते आणि इस्लामी मतानुसार, पंधराशे वर्षांनी माझ्या आयुष्यात वृद्धी होते,” असे मत व्यक्त केले होते. ‘नवरोज’ साजरा करण्याची संकल्पना आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे अफगाणिस्तानची विचारधारा ही प्रगल्भ आहे, हे यावरून दिसून येते. त्यामुळे अफगाणिस्तानबाबत आपण याच ऐतिहासिक वारशाचा दाखला घेत भूमिका स्वीकारणे जास्त संयुक्तिक ठरेल, असे मला वाटते. पाकिस्तानबाबत म्हणाल तर पाकिस्तान हा भारताचाच एक भाग होता. स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंग, पाणिनी, शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांच्यासारखे थोर क्रांतिकारी आणि अनेक भारतीय धुरिणांनी आजच्या पाकमध्येच आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे तेथील जनतेसाठी आपण एक रेडिओ स्टेशन सुरू करून पाकच्या जनतेला त्यांचे पूर्वज कोण होते, त्यांचा गौरवशाली इतिहास सांगणे आवश्यक आहे. पाकच्या नागरिकांना मोहेंजोदडो, पाणिनी, भगतसिंग यांच्या ऐतिहासिक कार्याचे अवलोकन करून देण्याची गरज आहे.

 

 
दक्षिण पूर्व आशियाई देशांमधील हिंदू संस्कृती आणि हिंदूंचे स्थान याविषयी काय सांगाल?
 

जगातील मोठे आश्चर्य म्हणून मी दक्षिण पूर्व आशियाकडे पाहतो. आपल्या देशातील पल्लव, चोल, कलिंग अशा अनेक राज्यकर्त्यांनी तेथे आपला साम्राज्य विस्तार केल्याच्या नोंदी आहेत. मात्र, दक्षिण-पूर्व आशियामध्ये या राज्यकर्त्यांनी साम्राज्यविस्तार करताना तेथील जनतेस कधीही कोणत्याही यातना दिल्या नाहीत, हे विशेष. त्यामुळे तिथे आजही भारतास पवित्र देश मानले जाते. याचे एक उदाहरण मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आहे. मी मलेशियात असताना तेथील राजाचा राज्यारोहण सोहळा होता आणि त्याचे प्रक्षेपण टीव्हीवर सुरू होते. तेथील त्या सुलतानाचा राज्यारोहण सोहळा संस्कृतमध्ये झाला. त्यावेळी वंशावळीची जी नावे घेतली, त्यात सात ते आठ नावे ही मुस्लीम होती आणि बाकीची संस्कृतमध्ये होती. हे सर्व आपल्यासाठी अनुकूल आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला संबंधांची वीण विणणे आवश्यक आहे. तसेच, मलेशियातील एक मुस्लीम नागरिक ‘भरतनाट्यम’ या नृत्यकलेत पारंगत झाला असून त्याने जगभरात अनेक कार्यक्रम केले आहेत. तसेच, त्याने विरोधाचा सामना करत नटराजाचे पूजन करूनच नृत्याविष्कार सादर करणे सुरू ठेवले आहे. आपल्या संस्कृतीत ताकद असून ती आपण पुढे नेणे आवश्यक आहे. तसेच, ‘जकार्ता’चे नाव ‘जय कर्ता’ आहे. ‘सोरो बाय’ हे जावा बेटावर एक शहर असून तेथे एका मशिदीच्या नूतनीकणाचे कंत्राट रवी मेनन या कंत्राटदारास देण्यात आले. राष्ट्राध्यक्ष अब्दुल रहेमान यांनी या मशिदीच्या उद्घाटनास येण्यासाठी मशिदीची पूजा केरळमधील नंबूदरायी पुजार्‍याकडून करण्याची अट घातली. कारण, केवळ हेच पुजारी श्रीचक्रास केंद्रस्थानी ठेवून पूजा करतात. मी केरळमधील ते पुजारी उपलब्ध करून दिले. तेथे राष्ट्रपती रहेमान यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. त्या दिवसापासून तेथे प्रतिवर्षी नंबूदरायी पुजारी पूजा करतात. आपण (हिंदूधर्मीय) ज्या ज्या देशांमध्ये गेलो, तेथे आपण कधीही कोणाला गुलाम बनविले नाही. इंडोनेशिया, मलेशियामध्ये ‘चोल’ म्हणजे ‘श्रेष्ठ व्यक्ती’ असा उल्लेख आहे, असे हिंदूंचे दक्षिण-पूर्व आशियामध्ये स्थान आहे.

 

  
आधुनिक काळात वेद किती महत्त्वपूर्ण ठरू शकतात, असे आपल्याला वाटते?
 

वेद हे अचल, स्थायी आणि नियामाधारित आहेत. त्यांच्या ऋचांमध्ये एकसमानता आहे. त्यात बदल झालेला नाही. ते जसे आहेत, तसेच एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित झाले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते संस्कृत भाषेत आहेत. आधुनिक काळात संस्कृत भाषेमुळेच माहिती-तंत्रज्ञान युगात प्रगती होण्यास मदत झाली आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ‘कॉम्प्युटर फ्रेंडली भाषा’ म्हणून संस्कृत भाषा ओळखली जाते. संस्कृत भाषेत कमी चुका आहेत. ती जशी बोलली जाते, तशीच लिहिली जाते. तसेच, इंग्रजी भाषा चित्ररूप नसून भारतीय भाषा चित्ररूप आहेत. जगाला सॉफ्टवेअर इंजिनिअर भारतीय हवे आहेत. कारण, भारतीय हुशार आहेत आणि हुशारी भाषेमुळेच वाढते. पाणिनीने योग आणि व्याकरण यात मोठे कार्य केले आहे. १९८०च्या दशकात ‘बीकास नॉयर फॉर्म’ ही संगणकीय भाषा आली. मात्र, तिचे नियम पाणिनीने अनेक वर्षांपूर्वी आधीच मांडले असल्याचे लक्षात आल्यावर तिला ‘पाणिनी बीकास नॉयर फॉर्म’ असे संबोधले गेले. हे सर्व संस्कृतमुळे शक्य झाले. विदेशात संस्कृत श्लोक तोंडपाठ करतात. सुजाण नागरिक होण्यासाठी भारताच्या धार्मिक भाषेत शिक्षण देणे आवश्यक आहे. भारताच्या सर्व भाषांमध्ये धर्म आहे. वेद संस्कृतमध्ये असल्याने आणि संस्कृतला जगात स्थान असल्याने आजच्या काळात वेदांचे महत्त्व हे खूप मोठे आहे. विश्वातील मनुष्याचा पहिला श्लोक वेदात आढळतो. वेदसंस्कृतीत अग्नीला महत्त्वाचे स्थान आहे. कारण, बाकी सर्व घटक हे गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतात. केवळ अग्नीच वरच्या दिशेला जातो. यातून आपण आपल्यातील कमजोरी लक्षात घेऊन त्यातून उच्चावस्था प्राप्त करावी, असा संदेश वेद देतात. आजच्या स्पर्धात्मक युगात तोच उपयोगी ठरणारा आहे. वेदांमध्ये असणारी १३ वेळा एकच शब्द उपयोजण्याची कृती म्हणजे ‘घनपाठ’ ही तिच्यातील अचूकतेमुळे ई-मेलची पद्धती झाली आहे. वेदांमध्ये संगीत आहे आणि संगीताचे जगाला जवळ आणण्यात मोठे योगदान आहे. विदेशात ‘भजन’ हे मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी गायले जाते. लोकप्रिय असणार्‍या ‘प्राणायमा’चादेखील वेदांमध्ये उल्लेख आहे. लवकरच भारतीयांना वेदांचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी विश्वभ्रमंती करावी लागणार आहे. त्यासाठी हिंदूंनी जागे होण्याची खरोखर आवश्यकता आहे.

 

 
‘रामायण’ आणि ‘भगवद्गीता’ आजच्या युगातही महत्त्वपूर्ण आहेत, असे आपल्याला वाटते का?
 

रामानंद सागर यांनी चित्रीत केले ‘रामायण’ सर्व जगाने पाहिले आहे आणि आजही पाहत आहेत. मात्र, ‘रामायण’ हा एक वैश्विक संदेश आहे, असे मला वाटते. ‘भगवद्गीते’चे वाचन जागतिकस्तरावर झाल्यावर तेथील साहित्यिकांनादेखील प्रेरणा मिळली. त्यांच्या वैचारिक पातळीत वृद्धी झाली. युरोपच्या साहित्यवर्तुळात गीतेमुळे मोठी क्रांती झाली. युरोपियन क्रांतीच्या वेळी तेथील विद्यार्थी कार्ल मार्क्सच्या विचाराने प्रेरित झाले होते. रशियात त्यावेळी गीतेवर प्रतिबंध लादण्यात आले होते. मात्र, नंतर भारताने कार्ल मार्क्सच्या विचारांचे प्रतिप्रेरक गीता आहे, हे त्यांना सांगितले. ‘गीता’ हा चरित्र निर्माणाचा मोठा ग्रंथ आहे, हे भारताने पटवून दिल्यावर गीतेवरील प्रतिबंध दूर केले गेले. गीतेत मोठी ताकद आहे, ती अनेक देशांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. ‘अनेकतामध्ये एकता’ या शब्दाचे महत्त्व भारताने गीतेच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याचा आफ्रिकेलादेखील फायदा झाला आहे. त्यामुळे आजच्या आणि कोणत्याही काळात ‘रामायण’ आणि ‘भगवद्गीता’ कायमच महत्त्वपूर्ण आहेत.

 

 
 
हिंदू, इस्लाम आणि ख्रिश्चन या धर्मांमध्ये साम्य आणि फरक काय आहे?
 

हिंदूंनी आपल्या धर्मात जे चांगले आहे, जे समाजात एकता आणि एकोपा टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरेल ते सर्व आत्मसात केले. इतर धर्मांनी जे आहे ते योग्यच आहे, त्यात बदल करणे अयोग्य आहे, ही नीती अवलंबात आणली, हाच फरक आहे. इस्लामने त्यांच्या धर्मात जे चांगले आहे ते घ्यावे, पण तसे होत नसेल तर मात्र चिंतन होणे आवश्यक आहे. आज जगात शिया-सुन्नी युद्ध सुरू आहे. तिथे हिंदूसंबंधित मुद्दे नाहीत. इस्लामिक राष्ट्रांच्या आपापसातील संघर्षात ‘हिंदू’ हा मुद्दाच नाही. जगात शांतता निर्माण होणे, गरिबी हटविणे, शिक्षणात नैतिकता असणे, धर्माच्या नावावर चालणारा धंदा बंद होऊन त्यांनी आध्यात्मिक धर्म जाणणे आणि त्याचा प्रसार करणे आवश्यक आहे. या तीनही धर्मांमध्ये ईश्वराला मानण्यात आले आहे, हे यांच्यातील साम्य आहे.

 

 
आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क मंडळ सदस्य आहात, तरी संपर्क करताना संपूर्ण भारत आणि जागतिक स्तरावर नागरिकांचे संघाविषयीचे काय मत आहे, असे आपणास जाणवले?
 

जागतिक स्तरावर रा. स्व. संघास आदराचे स्थान असून संघास मोठे मानले जाते. यामागे रा. स्व. संघाच्या सर्वच स्वयंसेवकांनी आजवर केलेले कार्य आणि योगदान यांची तपश्चर्या आहे. याची अनेक उदाहरणे मी स्वतः पाहिली आहेत. एक उदहरण असे आहे की, काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात ‘जी-१९’ परिषदेच्या रुपाने जागतिक नेत्यांचे मोठे संमेलन पार पडले. त्यावेळी तेथील सहभागी नेत्यांना ऑस्ट्रेलियातील विविध शहरांमध्ये भेटी देण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेलबर्न आणि कॅमरन येथे जाण्याचे निमंत्रण दिले गेले. आम्ही स्वयंसेवकांनी भारतीय लोक सिडनीत जास्त असल्याने मोदी यांनी सिडनीत यावे, असे पत्र तेथील सरकारला दिले. आधी सरकारने नाही म्हटले. मात्र, पत्र रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी मोदी यांना सिडनीत येण्याचे आमंत्रण दिले. यावरून असे दिसते की, जगात रा. स्व. संघाचे योगदान जाणले जाते. रा. स्व. संघाच्या बॅनरखाली जगात सर्व भारतीय एकत्र येतात. त्यामुळे जगात संघाचे स्थान मोठे आहे. रा. स्व. संघाला प्रतिष्ठा आहे. विविध भारतीय सणांना जगात तेथील राजकीय नेते येत असतात. काही राजकीय नेत्यांनी जगात भारतीय सणांना प्रायोजकत्व दिल्याचीदेखील उदाहरणे आहेत. विवेकानंद यांचे विचार हे जगात मानले जातात. ‘धर्म’ या विषयावरील विवेकानंदांचे विचार जगात आज मान्यताप्राप्त आहेत. जेथे जेथे संघाचे स्वयंसेवक शिकण्यास जातात, तेथील इंग्रज दाम्पत्याची मुले स्वभावाने सौम्य असतात. कारण, त्या मुलांवर तसे संस्कार आपोआप होतात, असे इंग्लंड स्कॉटलंड यार्डच्या अधिकार्‍यांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना नमूद केले आहे.

 

 
भारताने विश्वाला दिलेले योगदान काय आहे, असे आपल्याला वाटते?
 

धातुशास्त्राचा उपयोग भारताने जगाला मोहेंजोदडो काळातच दाखवून दिला. भारताने जगाला जोडले होते. भारताने जगाला बुद्ध, सी. व्ही. रामन दिले. सॉफ्टवेअर्स दिली. पेंटियम चीप विनोद धाम या भारतीयाने जगाला दिली. युएसबी पोर्ट हे बडोद्याचे अजय भट यांनी दिले. ‘एमपी ४’ याच्यात बेळगाव येथील अरुण नेत्रावली यांनी योगदान दिले. डेटा स्पीड फायबर ऑप्टिक्स नरेंद्र सिंग कापणी या भारतीयाने दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताने जगाला अध्यात्म दिले आहे. भौतिक आणि आध्यात्मिक जगात भारताचे योगदान मोठे आहे. ऐतिहासिक काळ ते आधुनिक काळ यामध्ये भारताने जगाला योगदान दिलेलेच आहे.

@@AUTHORINFO_V1@@