मुंबईच्या राखीव कांदळवनक्षेत्रात २०८ हेक्टरची भर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2019   
Total Views |

 

कांदळवन आच्छादित शासकीय जमीन वन विभागाच्या अखत्यारीत

 

मुंबई ( अक्षय मांडवकर ) - मुंबईच्या खाड्यांनजीक असलेली २०८ हेक्टर कांदळवन आच्छादित शासकीय जमीन राज्याच्या 'कांदळवन संरक्षण विभागा'च्या (मॅंग्रोव्ह सेल) ताब्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी व काही प्रमाणात 'महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणा'च्या (म्हाडा) जमिनींचा समावेश आहे. या जमिंनीवरील कांदळवनांना राखीव वनांचा दर्जा देण्यात आल्याने त्यावरील अनधिकृत बांधकामांना चाप बसणार आहे.

 
 
 
 
 

शहरातील खाड्यांनजीकच्या कांदळवन आच्छादित जमिनींची मालकी 'मॅंग्रोव्ह सेल', 'जिल्हाधिकारी' आणि 'म्हाडा' प्रशासनाकडे आहे. गेल्या काही वर्षांत जिल्हाधिकारी आणि म्हाडा यांच्या ताब्यातील जमिनींवर मोठ्य़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. मात्र, 'मॅंग्रोव्ह सेल'कडे या जमिनींचे मालकी हक्क नसल्याने त्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या जमिनींची मालकी मिळवण्याकरिता वन विभाग प्रयत्नशील होते. आता यामधील काही जमिनींची ताबा त्यांना मिळाला आहे. २०१७ च्या 'वन सर्वेक्षण अहवाला'नुसार मुंबईत ६,६०० हेक्टर कांदळवन क्षेत्र आहे. आता त्यामधील २०८ हेक्टर क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नव्याने समाविष्ट झालेल्या कांदळवन क्षेत्राला राखीव वनांचा दर्जा देण्यात आला आहे. हे वनक्षेत्र कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली या तालुक्यामधील आहे.

 

 
 
 

चारकोप येथील ५० हेक्टरचे सर्वाधिक क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारीअंतर्गत आले आहे. मिठी नदीलगतचे सुमारे ४० हेक्टरचे क्षेत्र राखीव वनक्षेत्रामध्ये समाविष्ट झाले आहे. तर वर्सोव्यातील ३५ हेक्टर, घाटकोपरमधील ४ हेक्टर, मंडाले येथील २ हेक्टर, मुलुंड पूर्वेकडील ४ हेक्टर, तुर्भातील ८ हेक्टर आणिक येथील ४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या संपूर्ण जमिनींची मालकी यापूर्वा जिल्हाधिकारी आणि म्हाडा प्रशासनाकडे होती. आता ती वन विभागाअंतर्गत आली आहे. म्हणजेच या जमिनींवरील अनधिकृत बांधकामांवर यापुढे थेट कारवाई करण्याचे अधिकार 'मॅंग्रोव्ह सेल'ला मिळाले आहे. राखीव दर्जाच्या वनक्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामे, वृक्षतोड किंवा डेब्रिज टाकून वनक्षेत्र नष्ट करण्यास मनाई आहे. तसे केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येते.


मुंबईतील २०८ हेक्टर शासकीय जमिनीवरील कांदळवनाचे क्षेत्र आमच्या ताब्यात आले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी आणि काही प्रमाणात म्हाडाच्या जमिनीचा समावेश आहे. या जमिनीच्या सीमा निश्चितीचे काम सुरू असून त्यांना राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. - निनू सोमराज, उपवनसंरक्षक, मॅंग्रोव्ह सेल

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@