संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत भारताला रशियाची साथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |



चीनचा पुन्हा खोडसाळपणा; पाकच्या सुरात सूर

 
 

वॉशिंग्टन : जम्मू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटविण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत चीनच्या मागणीनुसार बोलावण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रातील बैठकीत भारताला शुक्रवारी रशियाने चांगलीच साथ दिली. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविणे हा आमचा अंतर्गत विषय असल्याचे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी दूत सय्यद अकबरूद्दीन यांनी या परिषदेत सर्वांसमोर ठणकावून सांगितले. ते म्हणाले, “काश्मीरच्या मुद्द्यावर बाहेरच्या लोकांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. जिहादच्या नावावर पाकिस्तान हिंसा पसरविण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला आधी दहशतवाद पोसणे थांबवावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.

 

भारताच्या या मुद्द्याचे रशियासह काही इतर देशांनी समर्थन केले. मात्र, पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रात चीनचे पाकच्या सुरात सूर मिसळत भारताचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. चिनी राजदूताने यावेळी सांगितले की, “भारताने जे संवैधानिक संशोधन केले आहे, त्यामुळे सध्याची परिस्थिती बदलली आहे. काश्मीरची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाने एकतर्फी निर्णय घेऊ नये. अशा प्रकारे निर्णय घेऊन त्याला वैध ठरवता येणार नाही,” अशी भूमिका चीनने घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानने हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला. परंतु, चीन सोडल्यास इतर कोणत्याही देशाने त्याला प्रतिसाद दिलेला नव्हता.

 

संयुक्त राष्ट्राच्या परिषदेतही आता चीन सोडल्यास इतर सर्वच देशांनी भारताला समर्थन दिले आहे. संयुक्त राष्ट्रासारख्या संस्थेला बंद खोलीत बैठक घ्यावी लागली, हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात ही दुसर्‍यांदा बैठक झाली आहे. तत्पूर्वी पहिली बैठक १९७१ मध्येही याच मुद्द्यावर झाली होती. यूएनएससीची सदस्य संख्या १५ आहे, ज्यात ५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य देश आहेत. अस्थायी सदस्य देशांचा कार्यकाळ काही वर्षांचा असतो, तर स्थायी सदस्य हे कायम राहतात. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे संयुक्त राष्ट्रातले स्थायी सदस्य आहेत. अस्थायी सदस्यांमध्ये बेल्जियम, कोट डिवोएर, डॉमनिक रिपब्लिक, इक्वेटोरियल गुएनी, जर्मनी, इंडोनेशिया, कुवेत, पेरू, पोलंड आणि दक्षिण आफ्रिकेसारखे देश आहेत.

@@AUTHORINFO_V1@@