राम मंदिर सुनावणी : अयोध्येत अनेक खांबांवर देवी-देवतांच्या आकृत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |



रामलला विराजमान’चा दाखला

 

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद परिसरातील खोदकामातून बाहेर आलेल्या अनेक खांबांवर देवी-देवतांच्या आकृत्या आढळून आल्या आहेत. नकाशे, छायाचित्रे आणि पुरातन काळातील पुरावे यावरून दोन हजार वर्षांपूर्वी या ठिकाणी राम मंदिरच होते, असा निष्कर्ष निघतो, असा दावा ‘रामलला विराजमान’च्या वतीने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.

 

अयोध्येवरील सुनावणीच्या सातव्या दिवशी ’रामलला विराजमान’ने पुन्हा एकदा आपली बाजू मांडली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आपला युक्तिवाद सादर करताना ’रामलला विराजमान’चे वकील सी. एस. वैद्यनाथन् यांनी, या वादग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांचा अहवाल वाचून दाखविला. या आयुक्तांनी १६ एप्रिल, १९५० रोजी अयोध्या परिसराची पाहणी केली होती. तेथील खांबांमध्ये भगवान शिवासह अन्य देवीदेवतांची चित्रेही आढळली असल्याचे त्यांच्या अहवालात म्हटले आहे.

 

देवी-देवतांची ही चित्रे मशिदीच्या नव्हे, तर मंदिराच्या खांबांवर आढळून आली आहेत, याकडे लक्ष वेधताना वैद्यनाथन् यांनी, खांबांवर देवतांची चित्रे असलेल्या जागेचा नकाशा आणि एक अल्बमही न्यायालयाला सोपविला. या नकाशावरही १९५० असे वर्ष नमूद आहे. यावरून हेच सिद्ध होते की, ही जागा हिंदूंच्याच मालकीची आहे आणि तिथे मंदिरच होते. या अल्बममध्येही तुम्हाला ती जागा, खांब आणि त्यावरील देवतांची चित्रेच दिसून येतील. कोणत्याही मशिदीत हिंदू देवतांची चित्रे नसतात, असा दावा त्यांनी केला.

 

मंदिराच्या वरील भागावर वादग्रस्त ढाचा तयार केला गेला. प्राचीन मंदिरांचे खांब आणि अन्य सामुग्रीचा उपयोग या ढाच्याच्या निर्मितीत करण्यात आला. अशा प्रकारची इमारत शरियतनुसार मशीद होऊच शकत नाही,” असे वैद्यनाथन् यांनी सांगितले.

 

मी सादर केलेल्या नकाशात स्पष्ट दिसत आहे की, वादग्रस्त भागात हिंदू विधिनुसार पूजा करीत आहेत, असे सांगताना त्यांनी या भागाची १९९० मध्ये घेतलेली छायाचित्रे सादर केली. हा भाग ज्या खांबांवर तयार केला गेला, त्यावर तांडवमुद्रेत शिव, हनुमान आणि कमळासोबत सिंहांच्यामध्ये बसलेली गरुडाची प्रतिमा दिसत आहे. अशा प्रकारच्या प्रतिमा इस्लामिक नाहीत आणि असे प्रतीक असणार्‍या इमारतींना मशीद म्हणत नाही,” असे ते म्हणाले.

या स्थानावर रामजन्मभूमीच आहे, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. तिथे हिंदूधर्मीय पूजा करायचे. काही वर्षे नमाज पठण करून कुठलीही जागा मशीद बनू शकत नाही. अनेकदा रस्त्यांवर नमाज पठण केले जाते. केवळ नमाज पठण केल्याने त्या जागेला मशिदीचा दर्जा मिळत नाही,” असे वैद्यनाथन् म्हणाले.

 

ज्या जागेच्या मालकी हक्कासाठी हा खटला सुरू आहे, त्या ठिकाणी आधी कुठलीही शेतजमीन नव्हती. दोन हजार वर्षांपूर्वी इसवी सन पूर्व २०० मध्ये या ठिकाणी ५० बाय ३० मीटरचे विशाल निर्माण केले होते आणि पुराव्यांच्या आधारावरून, हे निर्माण श्रीरामाच्या जन्मस्थळी बनलेले राम मंदिर होते, असा दावा त्यांनी केला. यावेळी घटनापीठातील एक सदस्य न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी प्रश्न केला की, संस्कृती नेहमी नद्यांच्या किनार्‍यांवर वसलेल्या आढळतात. मग आपण असा दावा कसा करू शकता की, या ठिकाणी दोन हजार वर्षांपूर्वी बनलेली इमारत मंदिरच होती? यावर वैद्यनाथन् म्हणाले की, पुरातन पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, ही इमारत सामान्य लोकांसाठी खुली होती.

 

कुठलीही व्यक्ती या ठिकाणी येऊ शकत होती आणि अशी इमारत केवळ मंदिरच असू शकते. भारतीय पुरातत्त्व सर्व्हे विभागाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खोदकाम केले होते. त्यांच्या अहवालात, या जागेवर जी इमारत होती, ती उत्तर भारतीय शैलीत बनलेले एक मंदिर होते, याकडे वैद्यनाथन् यांनी लक्ष वेधले.

@@AUTHORINFO_V1@@