पाली-सरड्यांचा सोबती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2019   
Total Views |



देशात उभयसृपशास्त्रामधील तरुण संशोधकांच्या फळीमध्ये सांगलीच्या अक्षय अधिकराव खांडेकरचा समावेश होतो. काही दिवसांपूर्वी त्याने महाराष्ट्रातून पालीच्या दोन नव्या प्रजातींचा उलगडा केला, त्यानिमित्ताने...

 
मुंबई ( अक्षय मांडवकर ) : काही माणसंचाकोरीबाहेरचं काम करून जगाला नवं देणं देण्यासाठीच जन्मास आल्यासारखी भासतात. असा भासणारा एक माणूस म्हणजे सांगलीचा गडी अक्षय खांडेकर. वन्यजीव संशोधन म्हणजे भिकेचे डोहाळेअशी धारणा आजही आपल्या समाजमनात काही अंशी आहे. त्यात उभयसृपशास्त्रहा तर आपल्याकडे वाळीत टाकलेला विषय. वाघ-बिबट्यांवरील संशोधनामध्ये प्रसिद्धी व पैसा मिळतो. त्यामुळे त्यासाठी हजारो संशोधकांची रीघ लागते. मात्र, समाजातील काही गैरसमजुतींमुळे साप, पाली आणि बेडूक अजूनही दुलर्क्षित राहिले आहेत. अशाच उभयसृपसंशोधनात मोलाची कामगिरी बजावून अक्षयने महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. उभयसृपशास्त्रामध्ये काम करणार्‍या देशातील मोजक्या तरुण शोधकर्त्यांच्या फळींमध्ये त्याचा समावेश होतो. उभयसृपांप्रति असणार्‍या सहानभुतीची कास धरत त्याने लहान वयातच २० हून अधिक पाली व सरड्यांच्या नव्या प्रजातींचा शोध लावला आहे.
 
 
 

 
 

सध्या पुराने वेढलेल्या सांगली जिल्ह्यातील हिवतड गावात अक्षयचा दि. १७ जुलै, १९९३ मध्ये जन्म झाला. हिवतड हे गाव सांगलीतील दुर्गम भागात. वडील अधिकराव खांडेकर पेशाने शिक्षक. त्यामुळे अक्षयच्या घरात शिक्षणाप्रति अनुकूल वातावरण होते. अधिकरावांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करत ज्ञानार्जनाचे काम सुरू केले. त्यामुळे आपल्या मुलानेही मन लावून अभ्यास करावा, अशी त्यांची इच्छा. परंतु, बालमित्रांमुळे अक्षयला जंगलाचा नाद जडला. अरण्यातील रानवाटांमध्ये तो रमू लागला. ही मुले सुट्टीच्या दिवसांमध्ये गावापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या कावड्याच्या डोंगरावर भटकायला जायची. तिथे सापडणार्‍या पशु-पक्ष्यांचे निरक्षण करायची. त्यावेळी अक्षयच्या मनात या जीवांसंबंधी पडलेल्या प्रश्नांचे काहुर माजायचे. ते काहुर शमविण्यासाठी कोणीच मार्गदर्शक नसल्याने अजून कुतूहल निर्माण व्हायचे. मग त्या कुतूहलाची पूर्तता करण्यासाठी अक्षय शाळेला बु्ट्टी मारून जंगल भटकायचा. पण, ही चोरून सुरू असलेली भटकंती फार काळ घरच्यांपासून लपून राहिली नाही. एकदा ती घरच्यांनी पकडली आणि वडिलांनी आठवी ते दहावीच्या शिक्षणाकरिता त्याची रवानगी तासगावला केली.

 

 
 
 

तासगावला राहत असताना अक्षयला अरण्याची हुरहूर वाटे. त्यावेळी व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकांनी त्याला साथ दिली. पुस्तकवाचनात अक्षय पुरता बुडला. माडगुळकरांनी केलेले वन्यजीवांचे वर्णन अक्षयला भावत होते. त्यामुळे पशु-पक्ष्यांप्रति असलेल्या त्याच्या कुतूहलाला खतपाणी मिळाले आणि त्याचे रुपांतर आवडीत झाले. ही आवड शिक्षणात रुपांतरीत करण्यासाठी त्याने जीवशास्त्रविषयातून पदवी मिळविण्याचे निश्चित केले. साहजिकच वडिलांना त्याचा हा निर्णय मान्य नव्हता. परंतु, वडिलांची मनधरणी करून त्याने जीवशास्त्र विषयातून शिक्षणास सुरुवात केली. अरण्यामध्ये रमणारा हा मुलगा महाविद्यालयाच्या वर्गात कसा बरं रमेल; कारण पुस्तकी शिक्षण त्याला कधीच आवडलं नाही. त्यामुळे इंटरनेटवरुन उभयसृपांविषयी माहिती मिळवण्यास त्याने सुरुवात केली. त्याविषयीचे वाचन सुरू केले. सांगलीचा आसपासचा परिसर हिंडून साप, सरडे आणि पाली शोधून त्यांचे निरीक्षण केले. याकाळात फौना ऑफ ब्रिटिश इंडियाहे पुस्तक अक्षयच्या हाती लागले आणि उभयसृपांच्या खर्‍या विश्वाचा उलगडा त्याला झाला. हे पुस्तक वाचून काढल्यावर भारतात दुर्लक्षित राहिलेला उभयसृपशास्त्रहा विषय त्याच्या प्रकर्षाने लक्षात आला. त्यामुळे त्याने या विषयामध्येच संशोधनकार्य करण्याचे मनी निश्चित केले.

 

 
 
 

बीएस्सीच्या शिक्षणादरम्यान त्याची ओळख स्वप्निल पवार या गृहस्थांशी झाली. पवारांनी अक्षयला समृद्ध अशा पश्चिम घाटाचे विश्व खुले करून दिले. त्यांच्याच ओळखीने पुढल्या काळात अक्षय ज्येष्ठ उभयसृपशास्त्रज्ञ डॉ. वरद गिरींना भेटला. ही भेट अक्षयसाठी महत्त्वाची ठरली. कारण, पुढे डॉ. गिरी त्याचे मार्गदर्शक बनले. गिरींबाबत बोलताना अक्षय सांगतो की, “चांगल्या संशोधकांबरोबरच उत्तम माणूस कसं बनावं, याचं बाळकडू डॉ. गिरींकडून मला मिळाले आहे.अक्षय एमएस्सीचे शिक्षण घेत असताना गिरींच्या मदतीने त्याची ओळखी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सया भारतातील नामांकित संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांशी झाली. यातील एक शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. इशान अग्रवाल. त्यांच्यासोबत अक्षयला भारतभर उभयसृपसंशोधनाच्या निमित्ताने भटकण्याची संधी मिळाली. या संधीचे सोनं करत अक्षयने पाली व सरड्यांच्या नव्या प्रजातींचा उलगडा करण्याकडे महत्त्वाची भूमिका बजावली. अक्षयने आजवर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधून सरडे आणि पालींच्या 20 नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. याच आठवड्यात त्याने महाराष्ट्रातून शोधून काढलेल्या पालीच्या दोन नव्या प्रजातींची संशोधन पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. सध्या तो बंगळुरू येथील नॅशनल सेन्टर फॉर बायोलॉजिकल सायन्स इन्स्टिट्यूटया संस्थेत साहाय्यक संशोधक म्हणून कार्यरत आहे. एवढ्या लहान वयात उभयसृपशास्त्रासारख्या दुर्लक्षित विषयात मोलाची कामगिरी बाजवूनही अक्षय नम्र आहे. त्याचे पाय अजूनही जमिनीवर असल्याचे पाहून उभयसृपसंशोधनाचे भविष्य उज्ज्वल असल्याची खात्री होते. त्याला पुढील वाटचालीकरिता दै. मुंबई तरुण भारतकडून शुभेच्छा !

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@