'शिक्षणाय नमः'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2019
Total Views |



‘शिक्षण’ म्हटले की, आपसुकच शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आलेच. पण, या शैक्षणिक संस्थांशिवायही स्वानुभवातून, मातृभाषेतून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयोग करणार्‍या प्रमोद काटे आणि त्यांच्या कार्याविषयी...

 

शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क. पण, आजही कितीतरी मुलं या मूलभूत हक्कापासून वंचितच आहेत. त्यांना शाळेपर्यंत आणण्याबरोबरच, थेट शाळाच त्यांच्यापर्यंत नेणारे सामाजिक कार्यही आपण अनुभवत असतो. मात्र, भांडुपचे भाजप कार्यकर्ते प्रमोद काटे यांनी शिक्षणासंबंधी काहीसा नवीनच प्रयोग सर्वांसमोर आणला आहे. त्यांनी आपल्या मुलीला शाळेतच घातले नसून तिचं शिक्षण घरच्या घरीच सुरू आहे. त्यामुळे या प्रयोगामागील काटे यांची नेमकी भूमिका जाणून घेण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमीही समजून घ्यावी लागेल.

 

प्रमोद काटे यांचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले. नवव्या इयत्तेेत असताना प्रमोद हिंदी विषयात नापास झाले. त्यांना हिंदी विषयात फक्त 2 गुण मिळाले होते. नापास झाल्याने प्रमोद यांनी पुन्हा नववीतच प्रवेश घेतला. त्याच वेळी त्यांचा मित्र सचिन देवळे याने त्यांना ‘राष्ट्रीय सेवा संघा’चे ‘स्वदेशी जागरण’चे पत्रक दिले. याविषयी कुतूहल जागृत झाल्याने त्यांनी संघाच्या शाखेत जाण्यास सुरुवात केली. तिथे त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण झाली. त्यानंतर मात्र त्यांना शिक्षणात कुठेही अडथळा आला नाही आणि याच आत्मविश्वासाने त्यांनी त्यांचे पुढील सर्व शिक्षण विनाअडथळा पूर्ण केले.

 

पुढे संघाच्या कार्यालयातच अभय जगताप आणि कमलाकर इंदुलकर या सहकार्यांशी त्यांची ओळख झाली. या तिघांची मातृभाषेतील शिक्षणावर नेहमी चर्चा होत असे. त्यामुळे मातृभाषा आणि स्वानुभवावर आधारित शिक्षण देण्याचे त्यांनी ठरविले. प्रमोद काटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एक शैक्षणिक संस्था सुरू केली. या संस्थेअंतर्गत मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण दिले जाते. यात प्रथम गटात पाच मुलांनी भाग घेतला होता. यात प्रमोद यांची मुलगी ‘हिंदवी’ हीचाही समावेश आहे. पहिल्या गटातील मुले आता पाचवीच्या वयोगटातील आहेत. या मुलांचे - संस्कृत, उर्दू आणि तामिळ या भाषांवर प्रभुत्व आहे. शिवाय श्लोक, महापुरुषांची चरित्रे त्यांना तोंडपाठ आहेत.

 

या शाळेमार्फत वेगवेगळ्या प्रदर्शन भेटी, वेगवेगळ्या राज्य भेटी दिल्या जातात. पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवाने मिळालेले शिक्षण मुलांना जास्त उपयोगी पडते, असे यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष ज्ञान मुलांना खूप शिकवते. किराणा दुकानदार, फळवाला, वडापाववाला यांना भेट देऊन मुले तेथील कामे स्वतः अनुभवतात. त्यांच्या अनेक शंकांचे निरसन सहज होते. दरवर्षी प्रमोद काटे आणि त्यांचे सहकारी आपल्या मुलांना प्रत्येक राज्याची ओळख होण्यासाठी त्या त्या राज्यात जाऊन काही दिवस राहतात. नुकतेच त्यांनी गोवा राज्याला भेट देऊन तिथले लोक, त्यांचे राहणीमान, तिथला भूगोल, वातावरण, खाद्यपद्धती, बोलीभाषा यांचा परिचय मुलांना करून दिला. गुजरात आणि केरळ या राज्यांनादेखील त्यांनी भेट दिली आहे.

 

याविषयी सांगताना प्रमोद काटे म्हणतात की,”आजची शिक्षणपद्धती फक्त मुलांवर बोझा टाकत असून त्यामुळे मुलांचा योग्य विकास होत नाही. आपल्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी पालकांची असून त्यांनी स्वतः ते दिले पाहिजे. महागड्या ट्यूशन आणि शाळांमध्ये टाकून पालक स्वतःची जबाबदारी झटकत आहेत. मुलांना शाळेत ना पाठवतासुद्धा पालक त्यांना योग्य शिक्षण देऊ शकतात.”

 

महाराष्ट्र राज्याच्या कायद्यानुसार सातवीला परीक्षा द्यावी लागते. तेव्हा मुलांनी सातवीची परीक्षा आणि त्यानंतर थेट दहावीची परीक्षा द्यावी, असे ठरविण्यात आले आहे. मुलांचे शिक्षण मातृभाषेतच व्हावे, हा या संस्थेचा आग्रह असून फक्त प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शाळेत न जाता मौल्यवान शिक्षण मुलांना मिळावे, यावर संस्थेचा जोर आहे. ‘शिक्षणाय नमः’ हा उपक्रम विदेशातही नावाजला गेला असून फिनलंड येथील शिक्षणसंस्थेच्या चर्चेत या संस्थेचे कमलाकर इंदुलकर यांनी सहभाग घेतला होता. या ठिकाणी त्यांनी त्यांच्या संस्थेतील शिक्षणपद्धतीची माहिती दिली.

 

एकूणच शैक्षणिक पद्धतीचा वेगळा प्रयोग करताना, या सर्व मुलांना खूपच मजा येते. त्यांचा आनंद दांडगा असून त्यांना या पद्धतीचे शिक्षण आवडते. प्रमोद काटे व त्यांच्या सहकार्‍यांना या शिक्षण पद्धतीचा अधिक विस्तार करावयाचा आहे. या शिक्षणपद्धतीने मुलांना योग्य शिक्षण मिळेल, प्रत्येक मुलाने आपले शिक्षण मातृभाषेतूनच करावे, असा या संस्थेचा आग्रह असून यामुळे आपली संस्कृती, विचार यांचा वारसा जोपासला जाईल. आजच्या इंग्रजी शाळांमुळे मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा नाश होत असून यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचेही प्रमोद काटे आवर्जून सांगतात.

 

प्रमोद काटे यांच्या या आगळ्या शिक्षणपद्धतीने नक्कीच आपली मराठी भाषा जोपासली जाऊन मुलांना वेगळ्या शिक्षण पद्धतीने शिक्षण घेता येईल. घोकंपट्टीने शिक्षण न घेता, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असणारे शिक्षण मुलांसाठी उत्तम असेल. प्रमोद काटे यांच्या या शैक्षणिक उपक्रमाच्या वाटचालीला अनेक शुभेच्छा!

- कविता भोसले 

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@