श्रीनगरच्या लाल चौकात उद्या अमित शाह तिरंगा फडकविणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |
 


श्रीनगर : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ‘कलम ३७०’ हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाह लवकरच आणखी एका मोठ्या निर्णयाच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहेयेत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी अमित शाह श्रीनगर येथील प्रसिद्ध लाल चौकात तिरंगा फडकविणार आहेत, अशा चर्चा सध्या जोर धरत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या गोष्टीचे समर्थनही केल्याने याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.

 

काश्मीर संस्थान भारतात सामील झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी सर्वप्रथम १९४८ मध्ये लाल चौकात तिरंगा फडकवला होता. तेव्हापासून या जागेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. कलम ३७० लागू झाल्यानंतर काश्मीरला वेगळा झेंडा मिळाला. त्यानंतर काही ठराविक घटना वगळता लाल चौकात बराच काळ तिरंगा फडकविण्यात येत नव्हता. १९९२ मध्ये भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी लाल चौकात तिरंगा फडकविण्याची मोहीम हाती घेतली होती.

 

२६ जानेवारी, १९९२ रोजी त्यांनी लाल चौकात तिरंगा फडकवलाही होता. तसेच सत्तेत आल्यानंतर लाल चौकात ध्वजवंदन करू, अशी घोषणा भाजप नेत्यांनी अनेकदा केली होती. कलम ३७० रद्द केल्यानंतर भाजप सरकार लाल चौकात तिरंगा फडकवेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. आता १५ ऑगस्टला खुद्द गृहमंत्री श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवणार, अशी चर्चा असल्याने श्रीनगरमध्ये सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@