कांगाव्याचा कावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |


 


आप्तधर्मीयांची तळी उचलण्याचा मुश्रीफ यांचा हक्क कुणीच नाकारू शकत नाही. मात्र, त्यांच्या धर्मीयातील धर्मांधांकडून हिंसेचा जो काही नंगानाच चालू असतो, त्याचे कोणते स्पष्टीकरण मुश्रीफ मियाँ करणार आहेत?


देशाच्या राज्यघटनेला शीर्षस्थ मानून आणि धर्मनिरपेक्षतेचे धडे घेतलेल्या नोकरशाहीच्या अंगात धर्मांधता आणि जातीयवादाचा सैतान शिरला की माणसे कशी वागू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे निवृत्त आयपीएस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ. मुसलमानांवर अन्याय झाल्याची त्यांची भावना आहे. या फसव्या भावनेचे बळी असलेले अनेक लोक या देशात आहेत. त्यांचे बोलविते मदारी कुणी वेगळेच असतात, पण ते त्यांच्याकडून कसले कसले खेळ करून घेतात आणि त्यांच्या इशाऱ्यावर ही मंडळी कसल्या कसल्या कोलांटउड्या मारून दाखवितात, याचा प्रत्यय पुण्यात आला. 'ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केला आणि मुस्लीम अडकले,' या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन झाले. शमशुद्दीन मुश्रीफ यांचे हे दुसरे पुस्तक. आपल्या मनातील विकृत भयगंड पुस्तकाच्या रूपाने लिहून काढून अफवेच्या वावटळी पसरविण्याचे काम शमशुद्दीन मुश्रीफ अव्याहतपणे करीत आहेत. कधीकाळी त्यांच्या मांडीला मांडी लावून दिग्विजय सिंगांसारखे राजकारणीही हाच राग आळवत असायचे. राजकारण अळवाच्या पाण्यासारखे असते. मतदारांचा कौल ज्या दिशेने कलू लागतो, त्या दिशेने राजकारणी कलतात. आज मतदारांचा कौल कुठल्या दिशेला आहे, हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे एकेकाळी या लेखक-प्रकाशकाला साथ देणारे राजकारणी काढता पाय घेऊन मोकळे झाले आहेत. राजकारणी लोकानुनय करीत असतात. मात्र, सनदी अधिकाऱ्यांकडून तशी अपेक्षा नसते. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून सनदी अधिकाऱ्यांनादेखील जातीयवादाचे खूळ लागले आहे. काही रिकामटेकडे न्यायमूर्तीदेखील या कंपूत सहभागी झाले आहेत. अजमल कसाबच्या हल्ल्यात आपले प्राण गमावावे लागलेले हुतात्मा हेमंत करकरे यांच्या दुर्दैवी मृत्यूचे जितके करावे तितके राजकारण या मंडळींकडून केले जात आहे. या सगळ्याच्या मागे हिंदुत्ववादी शक्तींचा हात असल्याचा अचाट दावा यातील काहींनी केला होता.

 

'ब्राह्मण्यवादी शक्ती' असा काहीसा विचित्र आणि अचाट शब्दप्रयोग या मंडळींनी शोधून काढला आहे. वस्तुत: अशी काही संकल्पनाच अस्त्विात नाही. मात्र, ज्या समाजाचा हे टोळके द्वेष करते, त्या समाजावर थेट गरळ ओकली तर राहुल गांधींना आता तालुकावार न्यायालयीन सफरी घडत आहेत, तशा घडतील. त्यामुळे या द्वेष्ट्यांनी ब्राह्मणवादी शक्तींचे हे नवे खूळ काढले आहे. हसन मुश्रीफ, अजीज बरनवी, दिग्विजय सिंग यांनी 'हू किल्ड करकरे?' या पुस्तकाच्यावेळी असाच गदारोळ माजविला होता. आता हे दुसरे पुस्तक. यानिमित्त हिंदूंना 'दहशतवादी' ठरविण्याचे उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. तपास करीत असताना करकरेंना तीन लॅपटॉप सापडले. या लॅपटॉपमधील मजकुराच्या आधारावर त्यांनी असा निष्कर्ष काढला की, इथे कुठल्याही मुस्लिमाचा यात सहभाग नाही. आता शमशुद्दीन मुश्रीफना करकरेंनी हे केव्हा सांगितले? असे काही असते तर त्यांनी त्या संबंधित यंत्रणांना का सांगितले नाही? याबाबतचे काही अहवाल तयार केले गेले आहेत का? या प्रश्नांची उत्तरे देणे मुश्रीफ सतत टाळत असतात. कारण, त्यांना त्यांच्या भाईबंदांना क्लीन चीट देण्याचा अतोनात प्रयत्न करायचा असतो. मुश्रीफ यांची भावना समजून घ्यायचे ठरविले तरी ते करीत असलेल्या अजागळ तर्काची पाठराखण कुणीही करू शकत नाही. दहशतवादाला धर्म नसतो म्हणायचे आणि हिंदू दहशतवादाचे पिपाणे वाजवायचे, असा हा उद्योग होता. तो काही केल्या जमला नाही. मोदीलाटेत हे सगळे बुणगे धुतले गेले. मुश्रीफ यांचे पहिले पुस्तक आले ते असेच. त्यांनी सरळ 'न्यायालय का फसले?' असे आपल्या शीर्षकात म्हटले होते. आता ते, 'आयबी'सारखी संस्था त्यांच्या डोक्यातील ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात कशी गेली आहे, हे सांगत असतात.

 

ज्यांना काही समाजभान आणि घडत असलेल्या घटनाक्रमाचे तारतम्य आहे, त्यांना या गोष्टी मजेशीर वाटतात. मात्र, समाजात जातीच्या आणि धर्माच्या नावाने डोकी फिरवून घेणारा वर्ग हमखास असतो आणि तो अशा काव्यांना बळी पडतो. मुश्रीफ यांच्याबरोबर त्या दिवशी त्या व्यासपीठावर जी मंडळी बसली होती, त्यात दोन न्यायमूर्ती आणि दोन ज्येष्ठ सनदी अधिकारी होते. यातील रत्नाकर गायकवाड हे तर महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले होते. कोळसे पाटलांचा कोळसा जितका उगळावा तितका कमीच. 'मी टू' सारख्या लाटेत यांच्यावर घाणेरडे आरोप होऊनही ही मंडळी ज्या राजरोसपणे कार्यक्रमात फिरत असतात, ते पाहिले की यांचे निर्ढावलेपण लक्षात येते. खोटे बोलण्याची आणि समाजाचे स्वास्थ्य बिघडविण्याची कंत्राटे निघाली की, ही माणसे पहिली पोहोचत असावी. आडनावांवरूनही माणसे त्या- त्या जातीतल्या माणसांना आपले प्रतिनिधी वाटतात आणि या मंडळींनी पसरविलेली गरळ अधिक गडद करण्याचे प्रयत्न यशस्वी होतात. मुश्रीफ यांनी आजतागायत कुठल्या दहशतवादी कारवाईचा तपास केला आहे, हे कुणालाच माहीत नाही. सध्या 'इडी'चे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या आपल्या भावालाही ते वाचवू शकत नाहीत. मात्र, समाजात विद्वेष पसरविण्याचे त्यांचे काम जोरात सुरू असते. 'माध्यमातही ब्राह्मणवादी असून ते सत्य मजकूर दाबण्याचा प्रयत्न करतात,' असा दावा या मंडळींनी केला आहे. कोळसे-पाटील वगैरे मंडळींचा हा जुनाच दावा आहे. उलट मुश्रीफ यांच्या दाव्यांचे फिरवून का होईना, समर्थन करण्याचे उद्योग आपल्याकडील काही प्रमुख माध्यमातील डाव्यांनी केले होते. मुश्रीफ मांडत असलेली थिअरी अत्यंत बकवास आहे, याची या साऱ्यांना कल्पना असते. मात्र, हिंदूंवर आरोप करण्याची संधी मिळाली तर ती का सोडावी? मग त्यात आपल्या विश्वासार्हतेसमोर प्रश्न उभे राहिले तर काय फरक पडतो? मुश्रीफ यांचे दावे म्हणजे पतंगबाजी आहे, असा निर्वाळा यापूर्वीच अनेक तपासयंत्रणांनी दिला आहे. आप्तधर्मीयांची तळी उचलण्याचा मुश्रीफ यांचा हक्क कुणीच नाकारू शकत नाही. मात्र, त्यांच्या धर्मीयातील धर्मांधांकडून हिंसेचा जो काही नंगानाच चालू असतो, त्याचे कोणते स्पष्टीकरण मुश्रीफ मियाँ करणार आहेत?

@@AUTHORINFO_V1@@