देशातील पहिल्या ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’ आणि आरोग्य संमेलनाचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |



२२ ते २५ ऑगस्टला सिडको एक्झिबिशन सेंटर येथे कार्यक्रम

 
 

नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) या चिकित्सापद्धतींना आणि या क्षेत्रातील मान्यवरांना एकत्रित आणण्यासाठी दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान ’वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’ आणि आरोग्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे हे भारतातील सर्वात पहिले आयुष संमेलन भरणार आहे. नवी मुंबईत सिडको विश्रामगृह येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सचिव डॉ. विष्णू बावणे यांनी ही माहिती दिली.

 

केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय चिकित्सा परिषद, सिडको, नवी मुंबई महापालिका, डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ आदींच्या संयुक्त विद्यमाने आणि आ. प्रशांत ठाकूर व मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आयुर्वेद मंत्रालयाअंतर्गत होणार्‍या या संमेलनाला ’आयुष’ म्हणजेच आयुर्वेदातील विविध चिकित्सा पद्धतींविषयी पन्नासहून जास्त कार्यशाळा व दहा परिसंवादांचे आयोजन करण्यात येणार आहे. संमेलनाला भेटी देणार्‍या सर्वसामान्य नागरिकांसाठी ’मोफत भव्य महाआरोग्य शिबीर’ही घेण्यात येईल. दरदिवशी पन्नास हजार विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक या कार्यक्रमात सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. आयुर्वेदिक क्षेत्रातील वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

 

कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आयुषमंत्री श्रीपाद नाईक, परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. कार्यक्रमावेळी या क्षेत्रातील विद्यार्थी, संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह सर्वसामान्य नागरिक उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. विष्णू बावने यांनी केले आहे.

 

योगदौडमध्ये सहभाही व्हा !

राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन करण्यासाठी तसेच योगासनांबद्दल जनजागृती करण्यासाठी रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता योगदौडचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील गणपत तांडेल मैदान, सीवुड्स येथून या स्पर्धेला सुरुवात होईल. राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री आशिष शेलार यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून स्पर्धकांनी शुभम बोरसे (९९२२९५३६६३), स्वप्नील जायभाये (७८८८२२२१६०३), धनराज बिराजदार (७०२०५३१८०९), उमेश पवार (९०९६४१९५९८) आदी प्रतिनिधींशी संपर्क साधावा तसेच, ऑनलाईन नोंदणीसाठी https://www.worldayushexpo.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

शेतकरी-व्यापारी एकाच मंचावर

आयुर्वेदीक क्षेत्रातील गरजा आणि आव्हाने ओळखून ’वर्ल्ड आयुष एक्पो २०१९’ आणि आरोग्य संमेलनानिमित्त शेतकरी आणि आयुर्वेद औषध क्षेत्रातील व्यापारी यांचे एकत्रित चर्चासत्र घेण्यात येणार आहे. त्यानुसार, बाजारातील गरजा ओळखून कोणत्या औषधी वनस्पतींचे उत्पादन घ्यावे याचे मार्गदर्शनही शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय फार्मा कंपन्यांचाही सहभाग असणार आहे.

 

’आयुष’ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून नव्या संधी, आव्हाने, चिकित्सा पद्धती, वैद्यकीय पत्रकारिता तसेच वैद्यकीय पर्यटन आदी विषयांबद्दल विस्तृत माहितीवर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९आणि आरोग्य संमेलनाद्वारे मिळणार आहे.

- डॉ. विष्णू बावणे, सचिव, आयोजन समिती

 

नवी मुंबईत देशातील पहिले आयुष एक्स्पो संमेलन होणार असल्याबद्दल आनंद आहे. कार्यक्रमावेळी होणार्‍या विविध शिबिरे आणि मोफत वैद्यकीय चिकित्सापद्धतींची ओळख नागरिकांनी करून घ्यावी.

- प्रशांत ठाकूर, आमदार, अध्यक्ष, आयोजन समिती

 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा भव्य संमेलनाचा कार्यक्रम बेलापूर मतदार संघात आयोजित केल्याबद्दल आयुष मंत्रालयाचे आभार

- मंदा म्हात्रे, आमदार

 
@@AUTHORINFO_V1@@