इमरान-चिदंबरम भाई भाई!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |



इमरान खान आणि पी. चिदंबरम तथा काँग्रेसी विचारपद्धतींतला भाईभाईपणा दिसतो. दोघेही हिंदूंच्या, हिंदुत्वाच्या भयगंडाने पछाडलेले असून त्यातूनच ते अशी मुक्ताफळे उधळताना दिसते. परंतु, भारतीयांना आणि जगालाही यांचा खरेखोटेपणा माहिती आहे, त्यामुळे कितीही आरडाओरडा केला तरी त्यांची झोळी रिकामीच राहील.

 

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ‘कलम ३७०’ निष्प्रभ केल्यानंतर त्याचे पडसाद देश-विदेशात सर्वत्रच उमटले. देशांतर्गत विरोधकांसह पुरोगामी बुद्धीजीवी, विचारवंत तथा धर्मनिरपेक्षतेचा पुकारा करणार्‍या ढोंगबाजांनी यावरून मानवाधिकाराच्या पिपाण्या वाजवल्या, तर काही अतिरेक्यांनी हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस असल्याचे म्हणण्यापर्यंतही मजल मारली. परंतु, भारताच्या अनपेक्षित निर्णयाने सर्वाधिक जळफळाट झाला तो पाकिस्तानचा, मिरच्याच झोंबल्या जणू! तद्नंतर भारताने लगावलेल्या जोरदार ठोशाने झालेली दयनीय, विदारक अवस्था घेऊन त्या देशाचे पंतप्रधान देशोदेशी मदतीची याचना करू लागले. चीन, अमेरिका, मलेशिया, तुर्कस्तानसह संयुक्त राष्ट्रांसमोर इमरान खान यांनी आपले रडगाणे गायले. मात्र, भीक मागूनच आला दिवस ढकलण्याची वेळ आलेल्या या दिवाळखोर देशाला समोर उभे करण्याची तसदीही कोणी घेतली नाही.

 

तेव्हाच खरे म्हणजे इमरान खान यांनी आपली व आपल्या देशाची जगातली पत ओळखून शांत बसायला हवे होते, पण म्हणतात ना कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच! तद्वतच पाकच्या नापाकांनी भारताविरोधात पोकळ धमक्या सुरू केल्या, मोठ्या आवेशात यंव करू न् त्यंव करूचे इशारे दिले गेले. अर्थात, १९४७ पासून भारतासमोर केवळ नांगी टाकण्याचेच कर्तृत्व गाजवलेल्या पाकिस्तानच्या या दर्पोक्तीत गांभीर्याचा वा दूरदृष्टीचा लवलेशही नव्हता. दरम्यानच्याच काळात देशात झालेली छी थू आणि जगभरातल्या लाथाडीने इमरान खान यांचे पित्त खवळले व ते सैरभैर झाले. अशा बावचळलेल्या इमरान खान यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी व काँग्रेसी नेत्यांशी विचार जुळले. या विचारजुळणीतूनच मग इमरान खान यांनी रा. स्व. संघ व संघाच्या विचारधारेवर आगपाखड केली.

 

हिंदूंच्या प्रभुत्वाची संघाची विचारधारा जर्मनीच्या नाझी-आर्यन विचारसरणीप्रमाणे आहे. मला या विचारसरणीची भीती वाटते. ही विचारधारा केवळ भारतव्याप्त काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण देशात मुस्लिमांचे दमन-शिरकाण करेल. नंतर हीच हिंदू वर्चस्ववादी विचारधारा पाकिस्तानलाही लक्ष्य करेल,” अशी बेछूट बडबड इमरान खान यांनी केली. ‘कलम ३७०’ हटवल्याने बिथरलेल्या इमरान खान यांनी संघाची तुलना थेट जर्मन हुकूमशहा हिटलरशी केली. अर्थात हा, ‘उचलली जीभ अन् लावली टाळ्यालासारखा प्रकार भारतात डाव्यांसह काँग्रेसवाले अनेकदा करतात; नव्हे संघाच्या भारतीय राष्ट्रवादी, मूल्याधिष्ठित, सर्वांना सोबत घेण्याच्या विधायक कार्याची बरोबरी करण्याची वा तसे कार्य उभे करण्याची शक्ती नसलेली मंडळी शिव्याशाप देण्याव्यतिरिक्त काय करू शकतात म्हणा? म्हणूनच हिंदू संघटन करणार्‍या संघाला फॅसिस्टवादी ते मनुवादी-जातीयवादी ठरविण्याचा आटापिटाही हे लोक करत असतात.

 

त्यासाठी शेंडाबुडखा नसलेले, काडीचाही आधार नसलेले, तथ्यहीन आरोपही केले जातात. संघविरोधाची कावीळ झालेल्या देशी लोकांचे हेच शब्द आता पाकच्या म्होरक्यानेही उचलले. त्यानंतर इकडच्या संघविरोधी मुखंडांनी टाळ्याही पिटल्या असतील, अत्यानंदाने दोन-चार उड्याही मारल्या असतील म्हणा! कारण, संघविरोधाचे सूत्र इमरान खानने पाळले ना! पण, इमरान खान संघविरोधी बरळले त्याचवेळी त्यांनी स्वतःच्या देशाची विचारसरणी कोणती, हे मात्र सांगितले नाही. गेली ७३ वर्षे अवैधपणे कब्जा केलेल्या पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानातील अन्याय-अत्याचार हीच पाकची विचारसरणी! पाकिस्तानातील पंजाबी मुसलमान नेत्यांनी आपल्या वर्चस्वासाठी सिंध, पश्तून, फाटा वगैरे भागाची कायमच मुस्कटदाबी केली. पाकिस्तानी सरकार, आयएसआय, लष्कर आणि दहशतवाद्यांच्या दमनाला इथली लोकसंख्या सातत्याने बळी पडत आली.

 

पाकिस्तानने मात्र विरोध करेल तो संपला, या खाक्याने या सर्वच भागातल्या जनतेची गळचेपी केली, कित्येकांना आयुष्यातून उठवले तर अनेकांची कानोकान खबर न लागू देता विल्हेवाट लावली. पाकिस्तानच्या याच विचारसरणीमुळे तिथल्या कितीतरी भागांतून स्वातंत्र्याची वा भारतात सामील होण्याची मागणी होताना दिसते. तिथले नेते पाकिस्तानातून परागंदा होऊन आपली ही मागणी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही मांडतात-जे आजही सुुरू आहे. कारण, पंजाबी मुसलमान सत्ताधीश असलेल्या देशात कोणी ऐकून घेण्याची परिस्थिती नाही नि पाकी सरकार, लष्कराकडून जीवाला असलेली भीती. बांगलादेशी युद्धातही पाकिस्तानने आपल्या याच अमानवी विचारसरणीचा वापर केला होता. लोकांचा आवाज दाबून टाकणार्‍या आणि नरसंहाराचाच इतिहास असलेल्या विचारसरणीवरच पाक जगत आला.

 

भारताच्या कुरापती काढण्यात, जम्मू-काश्मिरातील फुटीरतावाद पोसण्यात या देशाची हयात गेली आणि आज हाच देश स्वतःचे झाकून दुसर्‍याचे वाकून पाहतो. परंतु, पाकिस्तानची ही नियत ओळखून असलेले जग मात्र त्याच्या कुईकुईकडे ढुंकूनही पाहत नाही. उलट पाकिस्तान जितकी बोंब ठोकेल, तितक्या अधिकच्या लाथा त्याच्याच पेकाटात बसतात. मात्र, असे असूनही सुधारण्याचे नाव काही तो देश घेत नाही. तेही बरोबरच आहे म्हणा, कारण आत्महत्या करायलाच निघाले म्हटल्यावर कोणी कितीही हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी ते कोणाला मान्य होईल? पाकिस्तानची ही गत तर त्याच्याच विचारांशी साम्य सांगणार्‍या काँग्रेसींची अवस्था निराळी कशी असेल? म्हणूनच ‘कलम ३७०’ हटवल्यापासून अधीर रंजन चौधरी, मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग यांच्यापासून पी. चिदंबरमपर्यंत प्रत्येकानेच आपल्या निष्ठा कुठे पेंड खातात, ते दाखवून दिले.

 

कोणी निलाजरेपणे काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्न नाही असे म्हटले तर कोणी काश्मीरचे पॅलेस्टाईन होईल, असे बरळले तर कोणी मोदी सरकारने आगीत हात घातल्याने काश्मीर हातून निसटेल, अशी भीती घातली. मात्र, इंग्रजांच्या फूटपाडू विचारांचे उकीरडे हुंगत वर्षानुवर्षे सत्तेचा गांजा ओढलेल्या पी. चिदंबरम यांनी ‘कलम ३७०’चा संबंध हिंदू धर्माशी लावला व मुस्लिमांना चिथावणारी भाषा वापरली. “जम्मू-काश्मीर मुस्लीमबहुल राज्य असल्यानेच ‘कलम ३७०’ हटवले. तेच जर हिंदुबहुल राज्य असते, तर मोदी सरकारने असे काही केलेच नसते,” असे ते म्हणाले. हिंदू धर्माला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून आपले उखळ पांढरे करण्याचे कारनामे याआधी पी. चिदंबरम यांनी केलेच होते.

 

हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करण्याचे कारस्थानही त्यांचेच, त्यात आता या विधानाचीही भर पडली. वस्तुतः जम्मू-काश्मीर हिंदुबहुल राज्य असते तर ‘कलम ३७०’ची खैरात करण्याची गरजच नसती. कारण, उर्वरित भारत फाळणीवेळी हिंदुबहुलच होता व अशा राज्यांना-संस्थानांना कोणतेही विशेषाधिकार दिलेले नव्हते, तर जम्मू-काश्मीर मुस्लीमबहुल अन् त्याचे नेते म्हणून शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंच्या जवळचे व्यक्तिमत्त्व होते. म्हणूनच शेख अब्दुल्लांना व त्यांच्या पाठीराख्यांना खुश करण्यासाठी नेहरूंनी ‘कलम ३७०’ राज्यघटनेत घुसडले. हे चिदंबरम यांना ठाऊक नाही का? अर्थात ठाऊक असले तरी नेहरू-गांधी घराण्याच्या गुलामीच्या चिखलात बरबटलेल्यांना हे कसे मान्य असेल? शिवाय इथेही इमरान खान आणि पी. चिदंबरम तथा काँग्रेसी विचारपद्धतींतला भाईभाईपणा दिसतो. दोघेही हिंदूंच्या, हिंदुत्वाच्या भयगंडाने पछाडलेले असून त्यातूनच ते अशी मुक्ताफळे उधळताना दिसते. परंतु, भारतीयांना आणि जगालाही यांचा खरेखोटेपणा माहिती आहे, त्यामुळे कितीही आरडाओरडा केला तरी त्यांची झोळी रिकामीच राहील.

 
 
@@AUTHORINFO_V1@@