ममतादीदी, उगाच कशाला लोकांना भडकविता?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019   
Total Views |



दुर्गापूजा मिरवणुकांवर निर्बंध, 'जय श्रीराम' घोषणा देणार्‍यांवर केली जात असलेली कारवाई, यामुळे हिंदू मतदार आपल्या पक्षावर नाराज होत असल्याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झाली आहे. त्यातूनच दुर्गापूजा मंडळांना प्राप्तिकर खात्याने पाठविलेल्या नोटिसांचे भांडवल करून, हिंदू मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे.

 

. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याने हादरून गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या, काही तरी निमित्त काढून प. बंगालमधील जनतेला केंद्र सरकारविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने 'बंगाली अस्मिता' यासारखे मुद्दे उभे करून लोकांना आपल्यामागे उभे करण्याचे त्यांचे प्रयत्न चालले आहेत. आता केंद्राने दुर्गापूजांचे आयोजन करणार्‍या मंडळांना, प्राप्तिकराच्या जाळ्यात आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे पाहून, हा बंगाली अस्मितेवर घाला असल्याचा 'साक्षात्कार' त्यांना झाला आहे. तसेच प्राप्तिकर खात्याने या मंडळांना ज्या नोटिसा बजाविल्या आहेत त्यावरून, केंद्र सरकार हिंदूविरोधी असल्याची आवई उठविण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे.

 

. बंगालमध्ये दुर्गापूजा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. त्या राज्यात लहानमोठी अशी सुमारे २८ हजार दुर्गापूजा उत्सव मंडळे आहेत. त्यांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा पाठविल्यानंतर, अशा उत्सवांवर कर लादता कामा नये, याचे स्मरण ममता बॅनर्जी यांना झाले. दुर्गापूजा उत्सव हा 'राष्ट्रीय उत्सव' असल्याने अशा उत्सवावर कर कसला लावता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जी यांनी जी भूमिका घेतली आहे, त्यामागे त्यांचे आतापर्यंतचे फसलेले राजकारण आहे, हे वेगळे सांगायला नको!

 

दुर्गापूजेच्या दरम्यान असलेला मोहरम लक्षात घेऊन ममता बॅनर्जी सरकारने दुर्गाविसर्जन मिरवणुकांवर कसे आणि किती निर्बंध घातले होते, हे जनता विसरलेली नाही. त्यावरून प. बंगालमधील हिंदू मतदारांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचा फटका लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला चांगलाच बसला. राज्यातील लोकसभेच्या ४२ जागांपैकी १८ जागा भारतीय जनता पक्षाने जिंकून त्यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. दुर्गापूजा मिरवणुकांवर निर्बंध, 'जय श्रीराम' घोषणा देणार्‍यांवर केली जात असलेली कारवाई, यामुळे हिंदू मतदार आपल्या पक्षावर नाराज होत असल्याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झाली आहे. त्यातूनच दुर्गापूजा मंडळांना प्राप्तिकर खात्याने पाठविलेल्या नोटिसांचे भांडवल करून, हिंदू मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे.

 

दुर्गापूजा उत्सवासारखे उत्सव हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. त्याचा आम्हास अभिमान आहे. असे उत्सव सर्वांचे आहेत. त्यांच्यावर कर लादता कामा नये. गंगासागर मेळ्यास जो कर होता, तो कर आम्ही रद्द केला,” हे सांगण्यास दीदी विसरल्या नाहीत. केंद्र सरकारच्या या भूमिकेविरुद्ध आज, मंगळवारी दिवसभराचे 'धरणे' धरण्याचा कार्यक्रम ममता बॅनर्जी यांनी आखला आहे. तृणमूल काँग्रेसच्या 'बंग जननी वाहिनी'तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये, ज्यांचे बंगालवर प्रेम आहे, त्या सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ममतादीदी यांनी केले आहे.

 

लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षास जो जबर धक्का बसला, तसा तो २०२१ साली होणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये बसू नये, हे ध्यानात ठेवून त्यांची पावले पडत आहेत. ममता बॅनर्जी यांनी आता, निवडणूक व्यूहरचना करण्यामध्ये प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर आणि त्यांच्या गटाची मदत घेण्यास प्रारंभ केला आहे. विधानसभा निवडणुकीत, भाजपकडे सत्ता जाऊ नये, यासाठी त्यांची ही सर्व धडपड चालली आहे. त्यातून दुर्गापूजेच्या निमित्ताने, केंद्राविरुद्ध हिंदू मतदारांना भडकविण्याचे त्यांचे उद्योग चालले आहेत. प्रशांत किशोर आणि गटाने सुचविलेला 'दीदी के बोलो' हा उपक्रम ममता बॅनर्जी सरकारने हाती घेतला आहे. जनतेने आपल्या समस्या आणि तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालाव्यात, हा त्यामागील हेतू आहे.

 

अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन, शारदा चिटफंड यासारखे घोटाळे, 'जय श्रीराम' सारख्या घोषणा देणार्‍यांवर दाखल केले गेलेले गुन्हे यामुळे आपली जी हिंदूविरोधी प्रतिमा तयार झाली आहे, ती पुसून टाकण्याचा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न चालला आहे. प्राप्तिकर खात्याने ज्या नोटिसा बजावल्या आहेत, त्या संदर्भात कसल्याही प्रकारची माहिती देऊ नये, असे ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूजा उत्सव मंडळांना सांगितले आहे. गेल्या जानेवारीतच त्यांनी असे 'आदेश' या मंडळांना दिले होते.

 

ममता बॅनर्जी यांची ही जी खेळी आहे, त्यावर प्रदेश भाजप नेत्यांनी टीका केली आहे. धार्मिक मुद्द्यावरून जनतेचे मन आपल्याकडे वळविण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. तृणमूल काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते विविध दुर्गापूजा उत्सव समित्यांशी थेट संबंधित आहेत. त्यांनी आपला काळा पैसा आणि शारदा चिटफंड, रोझ व्हॅली चिटफंड आणि अन्य फंडांच्या माध्यमातून मिळालेला पैसा या समित्यांमध्ये ओतला आहे. पूजा समित्यांवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे नियंत्रण आहे. अशा पैशाचा शोध घेण्यास केंद्राने सुरुवात केल्याने तृणमूल काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत, असे भाजप नेते सायंतन बसू यांनी म्हटले आहे.

 

ममता बॅनर्जी यांनी प. बंगालची धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपण्याच्या नावाखाली लोकसभा निवडणुकीनंतर 'जय हिंद वाहिनी' आणि 'बंग जननी वाहिनी' अशा दोन विभागांची निर्मिती केली होती. त्यातील 'बंग जननी वाहिनी'तर्फे आजचे 'धरणे' योजण्यात आले आहे. एकीकडे, आपण धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवायचे, दुसरीकडे हिंदू समाजास भाजपच्या विरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न करायचा, अशी ममता बॅनर्जी यांची दुहेरी नीती असल्याचे दिसून येत आहे. पण, प. बंगालमधील जनतेने तृणमूल काँग्रेसचे संधीसाधू राजकारण याआधीच ओळखले असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या पक्षास चांगलाच फटका बसला आहे.

 

तृणमूल काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेकडून 'कट मनी'च्या रूपाने जी कोट्यवधी रुपयांची माया जमा केली आहे, त्यावरूनही त्या राज्यातील जनतेत कमालीचा असंतोष आहे. अलीकडेच, सरकारी नोकरी मिळवून देण्याचे गाजर दाखवून लोकांचे सुमारे एक कोटी रुपये हडप करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या नातलगाची, गळ्यात चपलांच्या माळा घालून धिंड काढण्याचा प्रकार पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यामध्ये घडला. गेल्या चार वर्षांत त्याने गावकर्‍यांकडून ही रक्कम जमा केली होती. 'कट मनी' घेण्यावरून जनतेत किती नाराजी आहे, हे या एका उदाहरणावरून लक्षात येते.

 

ममता बॅनर्जी या, आपल्या कार्यकर्त्यांना 'कट मनी' परत करावा, असा दम देत असल्या तरी ते शक्य नसल्याची त्यांनाही कल्पना आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांचे सरकार यांच्याविरुद्ध जनतेत असलेली नाराजी लोकसभा निकालांमधून दिसून आली आहे. आता विधानसभा निवडणुकीत पानिपत होऊ नये, म्हणून प्रशांत किशोर यांच्या मदतीने त्यांची व्यूहरचना सुरू आहे. पण, त्या जाळ्यात फसण्याएवढी बंगालमधील जनता दुधखुळी राहिलेली नाही !

 

(९८६९०२०७३२)

@@AUTHORINFO_V1@@