होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग - भाग २७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |



रुग्णाच्या रोगाचा 'गाभा' जाणून घेत असताना, त्या आजाराची प्रदर्शित होण्याची प्रवृत्ती जाणून घेण्याचा मुख्य प्रयत्न असतो. जसा शारीरिक बांधा हासुद्धा माणसाची प्रकृती दर्शवत असतो, तसेच अजून काही महत्त्वाचे घटकही असतात.

 

वैयक्तिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

आजाराचा गाभा जाणून घेत असताना वैयक्तिक व कुटुंबातील आजारांचा इतिहास पाहून त्यानुसार आपल्याला आजाराचा कल व गंभीरता कळू शकते. म्हणून काही आजार जे जनुकीय पातळीवरून दुसर्‍या पिढीकडे आलेले असतात, त्यांचा 'जुनाट आजाराच्या सिद्धांता'द्वारे (Theory of Chronic Disease) अभ्यास करावा लागतो.

 

तसेच, आजार बळावण्याला वा कमी होणार्या सर्वसाधारण घटकांचा अभ्यास हादेखील गाभा जाणून घेण्यातील महत्त्वाचा घटक असतो. यालाच 'General Modalines' असे म्हटले जाते. याचबरोबर आजारपणात रुग्णाला येणारी सर्वसाधारण संवेदना जाणून घ्यावी लागते.जसे शरीरात येणारा घट्टपणा, सर्व सांध्यांमध्ये येणारे जडत्व किंवा शरीरात होणारी आग इ. हे सर्व गुणधर्म वेगळे नसतात, तर एकाच स्थितीतून आलेले असतात व त्याच गाभ्याचा अभ्यास करण्याकरिता हे गुणधर्म तपासणे महत्त्वाचे असते. यालाच आपण 'Deductive logic' असे म्हणतो. याच लॉजिक किंवा तर्कशास्त्राचा अभ्यास करून अनुमान काढता येते.

 

एकदा केसटेकिंगमधून आपण 'Genius' किंवा 'गाभा' शोधून काढला की, मग औषध देण्यासाठी औषधाचा गाभा जाणून घेणे उपयुक्त असते. 'गाभा'ही कुठलीही तांत्रिक बाब नाही, तर साधारण पातळीवर औषधाचे जे गुणधर्म दिसून येतात, त्याचा केलेला अभ्यास होय. जेव्हा हे सर्व गुणधर्म एकत्रितपणे अभ्यासले जातात, तेव्हा ते एकप्रकारचा विशिष्ट 'पॅटर्न' तयार करतात. हा 'पॅटर्न' म्हणजेच 'Genius' किंवा 'गाभा.'

 

एखाद्या रुग्णाची लक्षणे बघून व 'गाभा' न बघता जे औषध दिले जाते, ते औषध रुग्णांच्या आजाराच्या मुळापर्यंत जाऊन कार्य करत नाही व त्यामुळे आजाराचे मुळापासून उच्चाटन होऊ शकत नाही.आजाराच्या लक्षणांचा गाभा कळला की, चिकित्सकाचे अर्धे कार्य पार पडते. या गाभ्याच्या अभ्यासानंतर असे लक्षात येते की, या गाभ्याच्या गुणधर्मानुसार जी लक्षणे व चिन्हे दिसून येतात, ती निसर्गातील कुठल्या ना कुठल्या गोष्टींशी समरूप असतात.

 

जसे आपले शरीर व निसर्ग हे दोन्ही पंचमहाभूतांनी बनलेले असते. त्यामुळे शरीर व मनाला बरे करण्यासाठी निसर्गाचीच मदत होते. होमिओपॅथीची औषधे ही संपूर्णपणे नैसर्गिक साधनांपासून तयार केलेली असतात. याचे कारण मानवातील पंचमहाभूतांमध्ये होणारा आजार बरा करायचा असेल, तर त्याचे मोठे रूप असलेल्या निसर्गातील पंचमहाभूतांचा उपयोग होतो. निसर्गातील पंचमहाभूतांमध्ये जसे नैसर्गिक बदल होत असतात, तसेच शरीरातील पंचमहाभूतांमध्येही होत असतात. होमियोपॅथीक चिकित्सकाला याच दोन बदलांची एकमेकांशी व्यवस्थित सांगड घालायची असते. एकदा का 'सम' असे नैसर्गिक साधन मिळाले की मग तेच आजार बरे करण्यासाठी संजीवनी ठरते. पुढील भागात याचा आपण अजून अभ्यास करू.

 
- डॉ. मंदार पाटकर  

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

९८६९०६२२७६

@@AUTHORINFO_V1@@