काश्मीरप्रश्नी नाक खुपसण्याचा प्रयत्न अमेरिकन खासदाराच्या अंगलट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |
 
 

न्यूयॉर्क : काश्मीरप्रश्नी नाक खुपसण्याचा प्रयत्न एका अमेरिकन खासदाराच्या चांगलाच अंगलट आला आहे. ९ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे काँग्रेसमन थॉमस सौझ्झी यांनी अमेरिकेचे सचिव पोम्पिओ यांना, "काश्मीर हा ट्रम्प प्रशासनाचा विशेष लक्ष देण्याचा विषय असावा," अशी विनंती करणारे पत्र लिहिले होते. 

 

सौझ्झी यांनी भारत सरकारने नुकतेच काश्मीरसंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल त्या पत्रात लिहिले होते की, "भारत सरकारचा काश्मीरसंदर्भातील निर्णय सामाजिक स्थिती बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतो. काश्मीरच्या स्वायत्ततेवर नव्याने लादण्यात आलेली बंधने दहशतवादी व अतिरेकी कारवायांना बळ देतील." या आशयाच्या पत्रामुळे न्युयॉर्क येथील भारतीय वंशाच्या नागरिकांनी निदर्शने करत विरोध केला. त्यानंतर समन्वयासाठी अमेरिकेतील भारतीयांसह बोलावलेल्या बैठकीतही त्या अमेरिकन खासदाराला भारतीयांनी चांगलेच धारेवर धरले.



 

भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे 'कलम ३७०' व '३५ ए'मध्ये सुधारणा केली होती. काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे. अमेरिकेतील प्रवासी-भारतीय (PIO), अनिवासी भारतीय (NRI) तसेच भारतीय वंशाचे नागरिक सौझ्झी यांच्याविरुद्ध एकवटले आहेत.

 

"आम्ही भारतीय सौझ्झी यांच्या वक्तव्याने नाखूश आहोत. आमची मागणी आहे की, त्यांनी अमेरिकेचे सचिव पोम्पिओ यांना लिहिलेले पत्र मागे घेतले पाहिजे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे; तसेच हा भारताचा अंतर्गत प्रश्न होता. सौझ्झी किंवा अमेरिकेला यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही," असे अमेरिकन इंडियन्स पब्लिक अफेअर्स कमिटीचे अध्यक्ष जगदीश सेह्वनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

सौझ्झी यांनी पोम्पिओ यांना लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. त्याचा परिणाम म्हणून ताबडतोब सौझ्झी यांच्या स्थानिक कार्यालयाला शेकडो निषेधाचे दूरध्वनी अमरिकेतील भारतीयांनी केले होते. सौझ्झी डेमोक्रॅटिक पक्षाचे असून, न्यूयॉर्कमधील एका जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व ते करतात. त्यांच्या जिल्ह्यात भारतीय वंशाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून संतापलेल्या भारतीयांसह संगनमत करण्याच्या उद्देशाने सौझ्झी यांनी ताबडतोब भारतीयांच्या प्रतिनिधींची रविवारी बैठक बोलाविली होती.

 

भारतीय प्रतिनिधीना पाठविलेल्या निरोपात सौझ्झी यांनी भारतीयांशी संवाद साधायला आवडेल, असे म्हटले होते. त्या अनुषंगाने रविवारी सौझ्झी यांच्यासह झालेल्या बैठकीत भारतीयांनी तीव्र निषेध व्यक्त केला. काश्मिरी पंडितांवर, हिंदूंवर काश्मीरमध्ये किती अत्याचार झाले, हे ज्यांना माहीत नाही, त्यांनी काश्मीरप्रश्नी नाक खुपसू नये, असा भारतीयांचा सूर होता. सौझ्झी यांची भारतीयांनी केलेल्या कान-उघडणीचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे.

@@AUTHORINFO_V1@@