पूर ओसरतोय, आता सामना रोगराईशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2019
Total Views |




साडेचार लाख पूरग्रस्तांसाठी ३७२ निवारा केंद्रे कार्यरत

 


कोल्हापूर/सांगली : कृष्णा, पंचगंगेसह अन्य नद्यांच्या पाण्यात घट होऊ लागल्याने सांगली-कोल्हापूरमधील पुराचे पाणी आता हळूहळू ओसरत आहेत. परंतु, पूरपरिस्थिती निवळल्यानंतर आता आव्हान रोगराईचे असणार आहे. पूरग्रस्त भागात अतिसार, कावीळ, विषमज्वर, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस, ताप आदी साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी प्रशासनासह सामाजिक संस्था-संघटना युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत.



 

 

पूरपरिस्थितीत ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ४८ हजार नागरिकांना हलविण्यात आले असून या पूरबाधित नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३२ पथकांसह भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल व तटरक्षक दलाची मिळून एकूण १०५ बचाव पथके कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक,धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहे.


 

 

राज्यातील १० जिल्ह्यांमधील ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातीलसर्वाधिक २ लाख ४५ हजार तर सांगली जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार नागरिकांचा समावेश आहे. पूरबाधित जिल्ह्यांमध्ये २२६ बोटींद्वारे नागरिकांना हलविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. बाधित नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना अत्यावश्यक सोईंसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुरामुळे कोल्हापूर,सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाले आहेत. बाधीत गावांची एकूण संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

 

सांगली व कोल्हापूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या आस्थापनांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासण्या केल्या जात आहेत. या आस्थापनांनी पूरग्रस्त भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याचा शुद्ध व गुणवत्तापूर्ण पुरवठा किफायतशीर किंमतीत करावा, अशा सूचना सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही विभागाच्या सहायक आयुक्तांकडून देण्यात आला आहे. 

 

महापुरामुळे पशुधनही मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. कोल्हापूर, सांगलीतील हजारो जनावरांचे तात्पुरत्या उघडण्यात आलेल्या छावण्यांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या पशुधनाची काळजी घेण्याचे पशुसंवर्धन विभागाने सुरु केले असून छावण्यांमध्ये व अन्य ठिकाणी विस्थापित झालेल्या पशुधनास आवश्यक औषधोपचार, लसीकरणास प्राधान्य देत असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार महापुरामुळे शंभरहून अधिक लहानमोठी जनावरे दगावली असून सहा हजाराच्या आसपास कोंबडया मृत्यूमुखी पडल्या आहेत. पुरामुळे वाहून गेलेल्या जनावरांची माहिती संकलीत करण्याचे कामही सुरु आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत सुमारे शंभरहून अधिक डॉक्टरांच्या मदतीने औषधोपचार आणि लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

महामार्ग बंदच राहणार

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय मार्ग सांगली-कोल्हापुरातील पूरस्थितीमुळे गेले काही दिवस बंद आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी किमान अवजड वाहतूक सुरू व्हावी, या उद्देशाने रविवारी महामार्गावर चाचणी घेण्यात आली. परंतु, पाण्याचा वेग जास्त असल्याने वाहतूक सुरू न करण्याचा व सध्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बोटीद्वारेच करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी पूरपरिस्थिती निवळल्यास पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. पूरग्रस्त भागात महामार्गावर पाण्याची पातळी रविवारपर्यंत पाऊण ते एका फुटाने कमी झाली होती. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी तीन ते साडेतीन फुटांपर्यंत पाणी महामार्गावर आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याहून बंगळूरूकडे जाण्यासाठी सोलापूरमार्गे वाहतूक करावी, असेही आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.






 

 

आलमट्टीतून ५ लाख ३० हजार क्युसेक विसर्ग

कर्नाटकातील आलमट्टी धरणातून सध्या ५ लाख ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित २ दरवाजे खुले असून त्यामधून ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच, कोयना धरणामधून ५३ हजार ८८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी रविवारी दिली.



 

 

कृत्रिम भाववाढ केल्यास कारवाई

जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पूर परिस्थिती निवळत असून शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. पाणी, इंधन, पालेभाज्या, दूध यासह अन्य जीवनावश्यक वस्तू एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत आहे. जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री करणारे आढळल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेशप्रशासनाने दिले आहेत.



 

 
 
@@AUTHORINFO_V1@@