वसुंधरेकडेही लक्ष हवे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2019   
Total Views |



पंचमहाभूतांच्या तत्त्वातून सृष्टीची निर्मिती झाली आहे. या पंचतत्त्वात पृथ्वी अर्थात वसुंधरा हे तत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे. याच वसुंधरेच्या कुशीत आदिम काळापासून मानवी जीवन फुलले. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या युगात जेथे आपला अधिवास आहे, ते ठिकाण सोडून विश्वातील अन्य ठिकाणच्या प्रजातीचा, परिस्थितीचा तेथील हवामानाचा, पाण्याचा शोध घेण्याची सवय आपल्याला जडली आहे. असे जागतिक पटलावरील सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता वाटते.

नुकतेच मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेस ५० वर्षे पूर्ण झाली. अशा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटनेचा आनंदोत्सव अमेरिकेत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. तसा तो साजरा होणे हेदेखील अत्यंत स्वाभाविक होते. १९६९ मध्ये मानवाने प्रथम चंद्रावर पाऊल ठेवले, त्यानंतर अमेरिकेने नासाच्या मदतीने चांद्रमोहिमा आखत १९७२ पर्यंत सहा मानवी चांद्रमोहिमा राबविल्या आणि आता नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार अमेरिका नासाच्या मदतीने चंद्रावर २०२४ मध्ये पुन्हा मानव पाठविण्याच्या तयारीत आहे.

 

ज्या अमेरिकेने ५० वर्षांपूर्वी मानव चंद्रावर दाखल केला, तीच अमेरिका आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची तयारी करत आहे. यात नवल ते काय, असा प्रश्न या निमित्ताने अमेरिकेसह जगातील सुजाण नागरिकांना पडला नसेल तरच विशेष. तसेच २०२४ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठविला की, जगातील इतर देशदेखील या स्पर्धेतून स्वतःला बाहेर राखण्यापासून रोखू शकणार नाहीत, याची शक्यतादेखील जास्त आहे. अमेरिका, त्यांची नासा आणि नासाच्या चांद्रमोहिमा या संदर्भात एक गृहीत धरावे, असे समीकरण तयार झाले आहे. मात्र, आता पन्नास वर्षांनंतर अमेरिकेतील नागरिकांना याबाबत नेमके काय वाटते, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

 

यासाठी तेथील प्यू रिसर्च केंद्राद्वारे एक सर्वेक्षणदेखील नुकतेच करण्यात आले. त्यात सुमारे ६३ टक्के लोकांनी नासाने अंतराळापेक्षा पृथ्वीवरील बदलणार्‍या हवामानाचा अभ्यास करून त्यातील दुष्परिणा करणारे घटक कसे नियंत्रणात आणता येईल, याबाबत आपले निरीक्षण नोंदवावे, असे मत मांडले. तसेच, १८ टक्के लोकांच्या मते नासाने चंद्रापेक्षा आता मंगळ ग्रहाला प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे मत नोंदविले आणि याच पाहणीत केवळ १३ टक्के नागरिकांनी नासाने भविष्यातदेखील चांद्रमोहिमा सुरू ठेवाव्यात, असे मत व्यक्त केले.

 

मुळात जर, अमेरिकेच्या चांद्रमोहिमांच्या शुभारंभाचा इतिहास पाहिला तर, त्यास वर्चस्ववादाची किनार असल्याचे दिसून येते. तत्कालीन सोव्हियत युनियन आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धाचा परिपाक म्हणजे या अंतरिक्ष मोहिमा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र, आज जागतिक समीकरणेही बदलत आहेत. जगात मानवासमोर अनेकविध प्रश्न उभे ठाकले आहेत. ज्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर आपण वास्तव्यास आहोत, तेथील समस्या यादेखील जटिल आहेत, अशा स्थितीत कोट्यावधी किमी दूर अंतरावर असणार्‍या ग्रहांची सृष्टी अभ्यासण्यास पुन्हा प्राधान्य देण्याऐवजी जागतिक नेतृत्व करणार्‍या महासत्तेने आणि त्यांच्या नासाने वसुंधरेची समस्यांच्या विळख्यातून सुटका करण्यास प्राधान्य देणे, नक्कीच संयुक्तिक ठरेल.

 

जागतिक तापमानवाढीचा सामना आज संपूर्ण विश्व करत आहे. वधारणारे कार्बनचे प्रमाण हादेखील एक मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. हिमशिखरांची होणारी घट आणि त्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होऊ शकणारी वाढ हा पृथ्वीवरील मानवजातीच्या अस्तित्वासमोरी मुद्दा म्हणून उभा ठाकला आहे. तसेच, पर्यावरणीय परिसंस्थेमध्ये अनेक जीवांचे जीवन संकटात सापडले आहे.

 

काही नामशेष झाले आहेत तर, काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हीच स्थिती अनेकविध वनस्पतींच्या बाबतीतदेखील झालेली आपणास दिसून येते. पृथ्वीवर कोठे महापूर आहे तर, कोठे पिण्याच्या थेंबभर पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा भटकंती कारवी लागत आहे. आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असणारा युरोप आज तापत आहे. अशा विविध समस्यांनी वसुंधरा ग्रासत चालली आहे. नासासारख्या यशस्वी आणि मान्यवर संस्थेकडून अंतराळाच्या अभ्यासाबरोबरच जगातील लोक वसुंधरेच्या अभ्यासाची आणि तिच्याकडे लक्ष देण्याची अभिलाषा बाळगून आहेत.

 
 
@@AUTHORINFO_V1@@