चूक दाखवा पण राजकारण नको! : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2019
Total Views |


 


पूरग्रस्तांसाठी एकत्रितपणे उभे राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 

सांगली : "विरोधकांनी काही चूक होत असेल, तर ती जरूर दाखवावी, आम्ही ती दुरूस्त करू. परंतु, अशा आपत्तीच्या काळात राजकारण करू नये," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून केले. तसेच, आज पूरग्रस्तांसाठी सर्वांनी एकत्रितपणे मदतीसाठी उभे राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

सांगली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सांगलीतील विविध पूरग्रस्त भागांची पाहणी केली तसेच, पूरग्रस्तांच्या केंद्रावर जाऊन मदत व पुनर्वसन कार्याचा आढावा घेतला. पूरग्रस्त नागरिकांची विचारपूसदेखील त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित होते. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सांगली-कोल्हापूर भागातील पूरस्थिती, मदतकार्य आदींशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, "यंदाचा पाऊस अतिशय प्रचंड झालेला आहे. सांगलीत २००५ साली पूर आला, तेव्हा ३१ दिवसांत २१७ टक्के पाऊस झाला. २०१९ मध्ये ९ दिवसांत तब्बल ७५८ टक्के पाऊस झाल्याचे त्यांनी नमूद केले. कोल्हापूरमध्येही नऊ दिवसांत ४८० टक्के पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

कृष्णा, पंचगंगा, कोयना अशा नद्यांवरील धरणांच्या एकत्रित विसर्गामुळे ही परिस्थिती उद्भवली," असे फडणवीस यांनी सांगितले. बचाव व मदतकार्यासाठी ओरिसा, पंजाब, गुजरात, गोवा अशा अनेक राज्यातून पथके बोलावण्यात आली असून आजच (शनिवारी) नौदलाचे १५ चमू विशाखापट्टणम येथून दाखल होणार असल्याचे ते म्हणाले. तसेच, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पूर्ण मदत मिळते असून जितकी पथके मागितली जात आहेत, तितकी तातडीने प्राप्त होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ब्रह्मनाळच्या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला, तर ८ बेपत्ता आहेत. याव्यतिरिक्त कुठेही जीवितहानीचे वृत्त नाही. तसेच, नजर पाहणीनुसार, २७ हजार, ४६८ हेक्टर जमीन पुरामुळे बाधित झाली असून पाणी ओसरल्यावर नेमकी आकडेवारी हाती येईल. शिवाय, ४८४ किमीचे रस्ते बाधित झाले आहे. २ हजार, ६१५ रोहित्रांचे अंशत: वा पूर्णत: नुकसान झाले असून ते कमीत कमी वेळेत पूर्ववत करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. काही लोक बाहेर निघायला तयार नसून त्यांना त्याबाबत विनंती करण्यात येत आहे. तथापि, कोल्हापूर आणि सांगली मिळून ३ लाख, ७८ पूरग्रस्तांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

 

रोखीनेही मदत देणार

 

पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या सरकारी मदतीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, "पूर्वी २५०० ते ५ हजार रुपये इतकीच मदत दिली जात होती, आता १० हजार ते १५ हजार रूपयांपर्यंत मदत दिली जात आहे. तसेच, ज्यांना रोखीने मदत देण्याची गरज आहे, त्यांना रोखीने मदत देण्याचा निर्णय कालच घेण्यात आला असून, तसे निर्देशमुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. रोखीने मदत दिल्यास 'कॅग' आक्षेप घेते. पण, अशा प्रसंगात 'कॅग'चे आक्षेपसुद्धा सहन केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. मृतांना पाच लाख रुपये, अपंगत्त्व आल्यास दोन लाख रुपये, घर पडले तर एक लाख रुपये व जनावरांचे नुकसान झाल्यास ३० हजार रुपये मदत दिली जात असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतीतील गाळ काढण्यासाठी १३ हजार रुपये हेक्टरी मदत करण्यात येत असून खरडून गेलेल्या जमिनीसाठी ३८ हजार रुपये मदत दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

आलमट्टीबाबत कर्नाटकशी समन्वय

 

कर्नाटकातील आलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटक राज्य सरकारशी पूर्ण समन्वय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दोन्ही राज्य सरकारांमध्ये योग्य तो समन्वय असून सध्या आलमट्टीमधून ५ लाख, ५७ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याचे ते म्हणाले.

 

जीव धोक्यात घालून वायुदल कार्यरत

 

पूरग्रस्तांची सुटका करण्यासाठी सांगली, कोल्हापूरमध्ये भारतीय वायुदल, तसेच तटरक्षक दलाचे जवान अक्षरशः जीव धोक्यात घालून काम करत आहेत. लष्करी विमाने उतरवण्याआधी सुरक्षिततेसाठी धावपट्टीची पाहणी करावी लागते. मात्र, सांगली-कोल्हापुरात पुरामुळे पूर्वनिरीक्षण अशक्य होते. तशाही परिस्थितीत नौदल, वायुदल, तटरक्षक दलाच्या वैमानिकांनी जीव धोक्यात घालून धावपट्टीवर विमाने उतरवली. कोल्हापूरशी केवळ हवाई मार्गानेच संपर्क होऊ शकत होता. त्यामुळे राज्याने केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे हवाई मार्गाने साहाय्याची विनंती केली होती. त्यानंतर नौदल, वायुदल, तटरक्षक दलाचे वैमानिक व जवान खराब हवामानात, पावसात व धावपट्टीच्या पाहणीशिवाय मदतीसाठी धावून आले.

 

कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्येही पूर

 

महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू व केरळलाही पुराचा फटका बसला असून चार राज्यांत मिळून आतापर्यंत पुरामुळे ९३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या बागलकोट, रायचूर, बेळगाव आणि कलबुर्गी आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, केरळमधील अ‍ॅलेप्पी, एर्नाकुलम, पथनमथिट्टा, इडुक्की, मलप्पुरम, वायनाड, कन्नूर आणि कोझिकोड या ठिकाणी पुराचा मोठा फटका बसला आहे.

 

खानदेशही जलमय

 

पश्चिम महाराष्ट्रानंतर आता पावसाने आपला मोर्चा उत्तर महाराष्ट्राकडे वळवला आहे. खानदेशात धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी तुफान पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, कान आदी नद्यांना पूर आला असून यामुळे या तीन जिल्ह्यांतील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नंदुरबारमधील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी महामार्गही ठप्प झाले असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. सरकारतर्फे प्रशासकीय यंत्रणेला आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

कोकणातील स्थिती नियंत्रणात

 

कोकण विभागात मागील चार-पाच दिवसांपूर्वी उद्भवलेली पूरपरिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे प्रशासकीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. या भागात मुसळधार पाऊस आता थांबला असून आवश्यक ते मदतकार्य सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५००, रत्नागिरीतील ७५७, तर रायगडमधील तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. सध्या हे नागरिक आपापल्या घरी जात आहेत. त्यांना अन्न-धान्याचे वितरण व गरजेप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. तसेच, शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू केले असून शासकीय आर्थिक मदत वाटप करण्याचे काम सुरू करण्यात येत असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात सध्या दोन तात्पुरती निवारा शिबिरे सुरू असून जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सैन्यदलाची पथके अन्यत्र पाठविण्यात आली आहेत.

 
 

@@AUTHORINFO_V1@@