पुन्हा गांधीच : सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : नेहरू-गांधी घराण्याच्या पलीकडे जाऊन नेतृत्वबदल करण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसने अखेर पुन्हा ‘गांधी’राग आळवण्याचाच निर्णय घेतला. शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष खा. सोनिया गांधी यांची अंतरिम अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत सोनिया गांधी याच अध्यक्षपदी राहतील. सोनिया या यापूर्वी १९९८ ते २०१७ अशा तब्बल १९ वर्षांच्या कालावधीत काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या.

 

त्यानंतर त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद आले परंतु, २०१९ लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवामुळे राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर पुढील काँग्रेस अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरचा असेल आणि या निवड प्रक्रियेत नेहरू-गांधी कुटुंबीय हस्तक्षेप करणार नाहीत, असा दावा राहुल यांनी केला होता. यामुळे कधी नव्हे ते काँग्रेस नेहरू-गांधी घराण्यापलीकडे जाऊन नवी वाट चोखाळेल, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, शनिवारी दिवसभर चाललेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सोनिया यांचीच पुन्हा एकदा अध्यक्षपदी ‘निवड’ करण्यात आली. काँग्रेसच्या पुढील अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया अध्यक्षपदी राहतील, असे पक्षाने म्हटले आहे. काँग्रेस संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.

 
@@AUTHORINFO_V1@@