हिंदूंच्या न्याय्य व नागरी अधिकारांचे संरक्षण म्हणजेच हिंदुत्व : सावरकर अभ्यासक अक्षय जोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2019
Total Views |


 


लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प


मुंबई : "स्वातंत्र्यपूर्व काळात प्रत्येक संस्था-संघटना आपापल्या धर्मानुयायांच्या बाजूने उभी होती. परंतु, हिंदूंच्या बाजूने कोणीही उभे नव्हते. अशावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्व ही संकल्पना मांडली. सावरकरांनी हिंदुत्व मुस्लिमांचा वा ख्रिश्चनांचा द्वेष करण्यासाठी मांडलेले नव्हते. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हिंदुत्व विचार मांडला. म्हणूनच सावरकरांचे हिंदुत्व हे हिंदूंच्या न्याय्य व नागरी अधिकारांच्या संरक्षणासाठीच असल्याचे स्पष्ट होते," असे प्रतिपादन अक्षय जोग यांनी केले.

 

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाची स्थापना १९२३ साली झाली, तर तत्पूर्वी १९२० साली लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले. यंदा टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे, तर २०२३ साली लोकमान्य सेवा संघाची स्थापना शताब्दी आहे. यानिमित्ताने लोकमान्य सेवा संघाने दर महिन्याला एक अशा बाराही महिने चालणाऱ्या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. शनिवारी या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांनी गुंफले. 'महानायक सावरकर' हा विषय यावेळी त्यांनी विशद केला. दरम्यान, या व्याख्यानमालेचे मुख्य प्रायोजक सारस्वत बँक असून माध्यम प्रायोजक दै. 'मुंबई तरुण भारत' आहे. आजच्या कार्यक्रमावेळी मंचावर सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर तसेच दै. 'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार उपस्थित होते. सोबतच लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दै. 'मुंबई तरुण भारत'च्या फेसबुक पेजवरून करण्यात आले.

 

'महानायक सावरकर' हा विषय मांडताना अक्षय जोग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निरनिराळ्या भूमिकांची, मतांची व विचारांची माहिती दिली. सोबतच सावरकरांवर घेतल्या जाणाऱ्या अनेक आक्षेपांचेही सप्रमाण खंडण करत वस्तुस्थितीही समजावून सांगितली. सावरकरांच्या हिंदुत्वाबाबत ते म्हणाले की, "सावरकरांनी ज्याची पितृभू व पुण्यभू भारत आहे तो हिंदू अशी व्याख्या केली. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत हिंदूंतील सर्व पंथ-संप्रदाय, बौद्ध, शीख, जैन, लिंगायत, महानुभाव, शैव-वैष्णव येतात. त्यात मुस्लीम वा ख्रिश्चनांचा समावेश नाही म्हणून त्यावर आक्षेप घेतला जातो. मात्र, ही व्याख्याच मुळी हिंदू कोण, याची असल्याने त्यात इतरांचा समावेश का केला जावा, हा माझा प्रश्न आहे. तसेच सावरकरांनी हिंदूंची व्याख्या केली पण ती भारतीयत्वाची व्याख्या नव्हे. त्यामुळे भारतीयत्वात इतर पंथांचाही समावेश होतो. त्यामुळे सावरकरांच्या व्याख्येवर आक्षेप घेणे चुकीचे आहे. सावरकरांनी कधीही आपल्या व्याख्येतून मुस्लिमांचा वा ख्रिश्चनांचा द्वेष शिकवला नाही. तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार हिंदूंचा कैवार घेतला. कोणीही हिंदूंच्या बाजूने बोलण्यास तयार नसताना हिंदुत्वाची संकल्पना मांडली. ही संकल्पना हिंदूंच्या न्याय्य व नागरी अधिकारांच्या संरक्षणासाठीच होती," असे जोग म्हणाले.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा गांधींबद्दलही अक्षय जोग यांनी महत्त्वाची माहिती दिली. "दोन्ही नेते आपापल्या ठिकाणी महान आहेत. परंतु, आपण 'सावरकरवादी' असलो म्हणजे गांधींचा व 'गांधीवादी' असलो म्हणून सावरकरांचा द्वेष करणे योग्य नाही. मतभेद नक्कीच असावेत, पण त्यात वैयक्तिक दुर्भावना आणू नये," असे ते म्हणाले. तसेच सावरकर व गांधीजी दोघेही एकमेकांची काळजी करत व भेटीगाठीही घेत असत. मात्र, सावरकरांची कार्यपद्धती कमी लोकांनी अधिक त्याग करून स्वातंत्र्य मिळवावे, अशी होती तर गांधींची कार्यपद्धती अधिकाधिक लोकांनी कमीत कमी त्याग करून स्वातंत्र्य मिळवावे अशी होती, असे सांगितले. तसेच गांधींचा मार्ग लोकजागृतीचा परंतु, निकाल न देणारा होता व सावरकरांचा मार्ग निकाल देणारा होता. अखेर सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या विचारांनुसार सिंगापूरमध्ये भारतीय ब्रिटिश सैन्याने उठाव केला. नाविकांनी बंड केले व भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले. याची कबुली इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमंट टली यांनीही दिली होती," असेही अक्षय जोग यांनी सांगितले. सावरकरांवरील अन्य आक्षेप जसे की, माफीनामा, गांधीहत्येतील सहभाग व स्वातंत्र्यासाठी मोठे आंदोलन उभारले नाही, याचेही अक्षय जोग यांनी यावेळी खंडण केले. तसेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सावरकरांचे नाव घेत नाही किंवा सावरकरांना 'भारतरत्न' दिला जात नाही, अशी ओरड सावरकरवादी करतात. परंतु, मोदी सावरकरांचे नाव घेत नसले तरी नाव गांधींचे व वाटचाल सावरकरांकडे, अशीच त्यांची कृती असल्याचेही जोग यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आजच्या कार्यक्रमात अक्षय जोग यांचे 'सावरकर : आक्षेप आणि वास्तव' या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह महेश काळे यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष उदय तारवाडकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्वेेता सोपारकर यांनी आणि आभारप्रदर्शन रश्मी फडणवीस यांनी केले.

 

'नव्या पिढीत सावरकर विचार रुजण्यासाठी...'

 

दै. 'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार यांनी आपली भूमिका आजच्या कार्यक्रमातून मांडली. ते म्हणाले की, "गेल्या दोन वर्षांपासून दै. 'मुंबई तरुण भारत' 'कालजयी सावरकर' हा विशेषांक प्रकाशित करत आहे. या अंकाचा उद्देश सावरकर विचार वाचून नव्हे, तर लिहून नवीन पिढीमध्ये रुजावा हा आहे. यासाठी वय वर्षे ३० च्या आतील तरुणांना सावरकरांच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी, पुस्तके, संदर्भग्रंथ अभ्यासण्यासाठी व नंतर त्याआधारित लेख लिहिण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो. 'कालजयी सावरकर' या विशेषांकातून अशा नव्या दमाच्या सावरकर अभ्यासकांच्या लेखांना प्रसिद्ध केले जाते व नंतर त्याचे पुस्तकही प्रकाशित केले जाते," असे त्यांनी सांगितले. तसेच सध्या सर्वच महापुरुषांना विशिष्ट जातीत बंदिस्त करण्याचे काम सुरू आहे. परंतु, आपण जातीपलीकडे जाऊन महापुरुषांकडे पाहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सोबतच, "दै. 'मुंबई तरुण भारत' लोकमान्य सेवा संघाच्या कार्यात माध्यम प्रायोजक म्हणून नव्हे, तर आम्ही सर्व कार्यकर्ता म्हणून सहभागी आहोत," असेही शेलार यांनी सांगितले.

 

'विचार एकत्र करतात, दूर नव्हे'

 

सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यावेळी अक्षय जोग यांचे कौतुक करत म्हणाले की, "सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात कोणतीही माहिती गुगलवर उपलब्ध होते. परंतु, अक्षय जोग यांनी अस्सल ग्रंथ, संदर्भ व पुस्तके वाचून आपले पुस्तक लिहिले, ही मोठी गोष्ट आहे. त्यांचे पुस्तक वाचताना त्यामागचा अभ्यासही आपल्याला दिसतो, म्हणून हे पुस्तक सर्वांनी वाचायला हवे," असे त्यांनी सांगितले. तसेच, "विचारांची देवाणघेवाण सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाची असून विचारांच्या आधारावर चाललो की, जीवनाला योग्य दिशा मिळते. विचार कधीही माणसांना एकमेकांपासून दूर करत नाहीत तर एकत्र आणतात. म्हणूनच सारस्वत बँक अशा उपक्रमांच्या मागे सातत्याने उभी राहत आली आहे," असे ते म्हणाले.

 

आपण काय शिकलो हे महत्त्वाचे

 

लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी यावेळी कार्यक्रमाचा समारोप करताना संस्थेची व्याख्यानमाला आयोजित करण्यामागची भूमिका सांगितली. तसेच टिळकांच्या स्मृतिशताब्दी व्याख्यानमालेची सुरुवात सावरकरांवरील व्याख्यानाने होत आहे, यासारखा उत्तम योग नसेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, लोकमान्य टिळक वा स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान होतेच, परंतु आपण त्यांच्यापासून, त्यांच्या जीवनातून काय शिकतो, हे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. सोबतच आजचे व्याख्यान ऐकल्यानंतर कोणालाही हिंदू असणे हे संकुचितपणाचे लक्षण वाटणार नाही, उलट हिंदू असल्याचा अभिमान वाटेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

@@AUTHORINFO_V1@@