आप्पा पाटणकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2019
Total Views |



आठवड्याच्या मधल्या वारी सकाळी जरा लवकरच आमच्या कोपर्‍यावरच्या इराण्याकडे चहा घेत बसणं हा माझा तरुण वयातला छंद...छंद कारण ते करताना मला एक छान फिलिंगयेतं. हातात शोभेला एक वर्तमानपत्र घेऊन चांगलं तास-दीड तास बसता येतं. रविवारी ती मुभा नसते. बर्‍याच हौशागौश्यांची गर्दी असते. शिवाय कामधंदे असणारी मंडळी रविवार पकडून इकडे चहा-नाश्त्याला येतात. मला काम-धंदे नाहीत असं नाही. पण, असो... आज सकाळी सहा- साडे सहाच्या सुमारास असाच जाऊन बसलो होतो. दोन-एक मिनिटं झाली असतील, तितक्यात मागून खांद्यावर हात पडला. ’‘काय डॉक्टर, आज काय पेशंट बिशंट नाय वाटतं?” त्या हाताच्या वजनाने माझी उरलेली झोप उडाली होती. ते वजन आणि तो विशिष्ट आवाज यावरून मागे कोण उभं असेल, हे न वळताच मी ओळखलं होतं. आप्पा पाटणकर. आप्पा, आप्प्या, अप्पुशेठ... या माणसाला तशी बरीच बिरुदं होती. त्याच्या रातराण्यांसाठी तो लंब्यासुद्धा होता. भारदार नाही, पण उठून दिसतील अशा मिशा. छान भांग पाडलेले केस. डोळ्यात रात्रीच्या झोपेअभावी म्हणा किंवा न उतरलेल्या दारूने म्हणा साठलेला एक तारवटलेपणा. अंगावरचे कपडे मात्र दिवस असो की रात्री एकदम टापटीप, कडक इस्त्रीचे, दोन्ही हातात प्रत्येकी चार बोटात सोन्याच्या अंगठ्या, त्याला शोभेल असं सोनेरी रंगाचेच घड्याळ आणि विशेष म्हणजे पायात पूर्ण व्हाईट चपला... एखादा कर्दनकाळ वाटावा तसा पण मनाने अत्यंत हळवा. आप्पा माझ्याहून वयाने चांगला पंचवीस एक वर्ष मोठा, पण त्याला दादा’, ‘काकाबोललेलं आवडत नसे. ’‘काय आप्पा, आज एवढ्या सकाळी सकाळी ते पण चहा?” मी थोडं टोमणा मारल्यासारखंच विचारलं. लेका सकाळी हे उत्तेजक पेय रात्री. ते कसंय मग आपलं....असं म्हणत आप्पा समोर विराजमान झाला. 


 

तो बसताच हॉटेलमधील एका पोराने त्याच्यासमोर एक पानीकम आणून ठेवला. आप्पा, वठ सॉलिड आहे तुझी... बिना ऑर्डर पानीकम!त्यावर थोडासा अभिमानाने ’‘देईल नायतर काय. दर आठवड्याला गुरुवारचा हा इराणी फिक्स असतो. सोमवार ते शनिवार आपले इराणी फिक्स असतात. शनिवार रात्र जोरात होते मग रविवारची सकाळ आपण काय बघत नाही. हाहाहाहा...आप्पाच्या या दांडपट्ट्याला मीच काय पण साक्षात बाजीप्रभू जरी आले असते तरी थोपवू शकले नसते. आप्पाचं एक वाक्य ठरलेलं नागड्याला लाज कसली!आता यापुढे तुमच्या आमच्या सारखे लोक काय बोलणार... अहो विवस्त्र होऊन आपण साधं मोरीतून बाहेर पडायला कचरतो. त्यात हा वीर म्हणजे भलत्याच टोकाला पोहोचलेला. आप्पाचं पण तसं बरोबच आहे म्हणा. नियती आणि मानवी इच्छा याची सांगड बसणं तसं कठीणच असतं. आप्पाच्या नियतीनंसुद्धा त्याच्या सोजवळ सुसंस्कृत आयुष्याचा पट पंचवीस एक वर्षांपूर्वी उधळला. लग्नानंतर गावी देव दर्शनाला जाताना अपघातात अख्खी बस उलटली. त्यात आप्पाचं सगळं कुटुंब गेलं. आई बाप गेले. नवी नवरी गेली. धाकटा भाऊ काय तो याच्यासोबत वाचला. एखाद्याने निराश होऊन खाट पकडली असती, पण आप्पाने वर्षभरातच भावाला बोर्डिंगला पाठवून त्याच्या शिक्षणात खंड असा पडू दिला नाही. आज भावाने शिक्षणावर चांगली नोकरी मिळवून तो स्थिरावला आहे. अधूनमधून आप्पाला भेटायला येतो. पण बर्‍याचदा त्यात औपचारिकपणा असतो. आप्पाची राहणी त्यालाही खटकते. पण आप्पाशेठ समोर त्यानेही केव्हाच हात टेकले आहेत. आप्पाच्या डोळ्यात हल्ली खूपदा सल जाणवते. वयामुळे असेल किंवा आणखी कशाने कोणास ठाऊक; पण कर्दनकाळ भासणारा आप्पा त्याच्या समवयीन लोकांना नातवंडांसोबत खेळताना पाहून, त्यांच्या जीवनाच्या साथीदाराबरोबर संध्याकाळचे मरिन ड्राइव्हला चालताना पाहून थोडासा हळवा होतो. म्हणजे तसं बोलत नाही तो, पण त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतात. त्या व्हायच्याच हो! शेवटी पैसा पैसा तो किती काळ आणि कुठवर तुम्हाला आनंद देणार... मायेची ऊब नसेल तो पैसा हा एखाद्या कागदी तुकड्यापेक्षा वेगळा तो काय? माणसाला मन आहे. ते आहे म्हणूनच ते मन रमेल असं घरही असावं नाहीतर अशी फकिराची जिंदगानी फोल आहे,” आप्पाच्या नुसत्या दोन-तीन वाक्यांनी इतके विचार माझ्या डोक्यात खेळ करू लागले, हेच आप्पाचं सामर्थ्य...

मी काऊंटरला बील द्यायला गेलो असता आप्पाशेठने बील दे दिया तुम्हाराअसा तो माणूस उद्गारला. काय करावं तरी काय या माणसाचं... त्याच्या अवलियेपणाला शब्दात उतरवावं एवढंच काय ते माझ्यासारख्याच्या हाती!

- डॉ. अमेय देसाई
@@AUTHORINFO_V1@@