उभयसृपांचा अवलिया पालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2019   
Total Views |

 

सिंधुदुर्गातील आंबोलीच्या जंगलात सापडलेल्या पालीच्या नव्या प्रजातीचे नामकरण ज्येष्ठ उभयसृपशास्त्रज्ञ डाॅ. वरद गिरी यांच्या नावे 'हेमिडॅक्टिलस वरदगिरी' असे करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने......

 

मुंबई (अक्षय मांडवकर) : स्वअध्ययन आणि स्वत:ला पडलेल्या प्रश्नांचा मागोवा घेत 'ते' भारतातील नामांकित संशोधकांच्या पंगतीत जाऊन बसले. उभयचर-सरीसृप हे त्यांचे सखेसोबती. पाली, सरडे, साप, बेडूक यांच्याशी गट्टी करून त्यांचे विश्व समृद्ध करणारा, मैत्रीला जागणारा, स्वच्छंदी आणि विनम्र असा हा ’माणूस.’ आज भारतातील उभयसृपशास्त्रामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. उभयचरांच्या मागे रानवाटा तुडवणार्‍या या माणसाचे नाव आजवर चार सरीसृपांना देण्यात आले आहे. आजतागायत त्यांनी ६०-६५ उभयसृपांचा शोध लावला असून पन्नासच्या वर शोधनिबंध लिहिले आहेत. असा उभयसृपांचा अवलिया पालक म्हणजे डॉ. वरद भगवान गिरी !

 

 
 

गेल्या दोन वर्षांपासून मी गिरींना ओळखतोय. खरं सांगायच म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांच्यामुळेच मी पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाविषयी लिहिता झालो. मात्र, आमची ओळख केवळ भ्रमणध्वनीवरील संभाषणापुरतीच मर्यादित होती. त्यांना महिन्याभरापूर्वी मुंबईत भेटण्याचा योग आला आणि एका जगावेगळ्या माणसाला भेटल्याचा आनंद मला मिळाला. एक मिनिटात आपल्याशी दोस्ती करुन स्वत:च्या प्रेमात पाडून घेणारा हा 'माणूस'. डॉ. वरद गिरी यांचा जन्म १३ मार्च, १९७१ साली कर्नाटकातील ’अंकली’ या छोट्याशा खेडगावात झाला. त्यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण खेडेगावात मराठी माध्यमातून झाले. मात्र, कर्नाटकात मराठी भाषेविषयी असलेल्या उपेक्षित वातावरणामुळे त्यांच्या पालकांनी पुढील शिक्षणकरिता त्यांना महाराष्ट्रात धाडले. त्यांचा सांगली, कराड आणि कोल्हापूर असा फिरता शिक्षणप्रवास झाला. घरची परिस्थिती तशी हलाखीची. त्यामुळे रसायनशास्त्रातून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीच्या शोधात होते. परंतु, त्यांनी ‘प्राणिशास्त्र’ विषयातून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत गिरींचा निसर्ग आणि वन्यजीव हा आवडीचा विषय नव्हता. शिक्षणादरम्यान त्यांना काही वरिष्ठ सहकार्यांमुळे जंगलात भटकण्याचा छंद जडला. पक्षिनिरीक्षणामध्ये रस निर्माण झाला. तसेच निसर्गातील लहान आणि उपेक्षित गोष्टींवर अभ्यास करण्यासाठी सत्यजित माने यांनी त्यांना प्रोत्साहित केले.
 

 
 

 

कोल्हापूर विद्यापीठामध्ये एम.एस्सीचे शिक्षण घेत असताना मित्र अनिल शिंगारे यांच्या समवेत गिरी साप पकडण्यास जात असत. यामुळे गिरींच्या सरीसृपांना जाणून घेण्याच्या इच्छेला चालना मिळाली. सरीसृपांना जाणून घेण्याचे निर्माण झालेले कुतूहल त्यांनी ’बुक ऑफ इंडियन रेपटाईल्स’ हे पुस्तक डोळ्यात तेल घालून वाचून शमवले. त्यामधील प्रत्येक प्रजातीची माहिती ज्ञानार्जित केली. पण, त्यांना पडणार्‍या प्रश्नाचे शमन करण्यासाठी त्यावेळी कुणीच नव्हते. मग स्वअध्ययनाने त्याविषयाची माहिती शोधून सखोल विचार करून अभ्यासाला सुरुवात झाली. या सगळ्या प्रकारामुळे गिरींना उभयसृपशास्त्रात संशोधन करण्याचा मार्ग गवसला. त्यामुळे या क्षेत्रात संशोधन करण्याचा निर्णय त्यांनी पक्का केला.

 

 
 

१९९५ साली एम.एस्सी उत्तीर्ण झाल्यावर ते चार वर्ष कामाच्या शोधात भटकत होते. पुढे त्यांना १९९९ साली ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’मध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. संशोधनाच्या ध्येयाने त्यांनी या संधीचं पुढे सोनं केलं. ’बीएनएचएस’मध्ये काम करत असताना तेथील विठोबा हेगडे या कर्मचाऱ्यानो गिरींना बेडूक कसे पकडावे, याविषयीची माहिती दिली. पुढे त्यांची भेट ज्येष्ठ संशोधक अशोक कॅप्टन यांच्याशी झाली. कॅप्टन यांनी गिरींसमोर उभयसृपांच्या वर्गीकरण तत्त्वांच्या शास्त्रीय जगाचा उलगडा केला. सरडे आणि पालींचे वर्गीकरण कसे करावे, याची इत्यंभूत माहिती त्यांनी देण्यास सुरुवात केली. गिरींनीदेखील यासंदर्भातील पुस्तकांचे वाचन केले. अरण्यात भटकून सरीसृपांचे निरीक्षण केले. यातूनच अनेक प्रश्न-शंका निर्माण झाल्या. त्याचे निरसन ’फॉना ऑफ ब्रिटिश इंडिया’ या पुस्तकाने केले. निर्माण झालेले प्रश्न त्यांनी लिहून घेतले. तज्ज्ञ उभयसृपशास्त्रज्ञांकडून ते पडताळले. पुढे ‘सिसिलियन’वर (देवगांडूळ) अभ्यासाला सुरुवात केली. त्यावेळी ‘सिसिलियन’च्या निरीक्षणांकरिता गिरींकडे काहीच साधने नव्हती. छोट्या भिंगाच्या आधारे निरीक्षण करून त्यांनी २००३ साली ’आंबोली सिसिलियन’ या नव्या प्रजातीचा शोध लावला. पुढे २०१३ साली महाराष्ट्रात सापडणार्या प्रदेशनिष्ठ उभयचर आणि सरीसृप विषयातून पीएच.डी केली.

 
 
 

२०१३ साली त्यांनी ’बीएनएचएस’मधील नोकरी सोडून उभयचर आणि सरीसृपांविषयी शैक्षणिक व जनजागृती कार्यक्रमांना सुरुवात केली. सध्या ते पुण्यात वास्तव्यास असून उभयसृपशास्त्रात काम करणार्‍या तरुणांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात. शिवाय पाली, बेडूक, सापांविषयी समाजात जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंडत असतात. देशात आज उभयसृपशास्त्रात संशोधन करणार्‍या संशोधकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. त्यामुळे ती फळी निर्माण करण्याचे काम गिरी करत आहेत. “मी स्वत: जे काही शिकलो ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे माझे कर्तव्य आहे,” अशी भावना ते व्यक्त करतात. गिरी हे आजवर नव्याने उलगडा केलेल्या सरीसृप प्रजातींविषयीच्या अभिमानाचे ओझे कधीच वाहत नाहीत. उलटपक्षी “देशात उभयसृपांचे वर्गीकरण 50 टक्केच झाल्यामुळे, मी जे काही केले ते जगाला साहजिकच नवीन होते,” असे म्हणत आपल्या कर्तृत्वापासून चार हात लांब राहणे पसंत करतात. अशा अवलियाला दै. ’मुंबई तरुण भारत’चा सलाम...!

@@AUTHORINFO_V1@@