गणेशोत्सवावर सावट धोकादायक पुलांचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2019
Total Views |



मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव महिन्याभरावर येऊन ठेपला असतानाच गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांपुढे मुंबईतील धोकादायक आणि नादुरुस्त पुलांबरोबरच, रस्त्यातील खड्ड्यांचे विघ्न उभे ठाकले आहे. त्यामुळे मोठ्या मूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका कशा पार पाडाव्या, याचा प्रश्न त्यांना सतावतो आहे.

 

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तिकार संघ व अन्य मंडळे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरुवारी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपमहापौर हेमांगी वरळीकर, सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समितीच्या अध्यक्षा अंजली नाईक, 'बेस्ट' समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर, महापालिका नगरसेवक/नगरसेविका, महापालिका अतिरिक्त आयुक्त, गणेशोत्सव मंडळ समन्वय समिती व महासंघांचे पदाधिकारी, सर्व परिमंडळीय उपायुक्त व संबंधित सहायक आयुक्त, खातेप्रमुख व पालिका अधिकारी तसेच मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी महापौर बोलत होते. करीरोड, चिंचपोकळी येथील पूल अवजड वाहनांसाठी बंद आहेत. रस्त्यांत खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्याबाबत काय उपाययोजना करणार, असे विचारता यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, "गणेशोत्सव समन्वय समिती, वाहतूक पोलीस, पालिका प्रशासन संयुक्तपणे धोकादायक पुलांचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यावेळी यातून मार्ग काढला जाईल," असे सांगत त्यांनी गणेशोत्सव मंडळांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. हिमालय पूल कोसळल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि धोकादायक वाटणारे पूल बंद करायचा सपाटा लावला. उपनगरासह मुंबईतील २९ पूल धोकादायक ठरल्याने ते बंद केले आहेत. एकापाठोपाठ पूल बंद केल्याने स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

 

सॅण्डहर्स्ट रोड येथील कर्नाक पूल, डिलाईल रोड, लोअर परळ पूल, मरिन लाईन्स पूल, करीरोड पूल, चर्नीरोड पूल बंद करण्यात आले आहेत. गणेशविसर्जन मिरवणुका पुलावरून आणि पुलाखालूनही जात असतात. मात्र धोकादायक पुलांना बॅरिकेट्स लावले असल्याने पुलाखालूनही मोठ्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक काढणे शक्य होणार नाही. त्यामुळे यंदा अनेक मंडळांना गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बदलावा लागणार आहे. याबाबत महिन्याभरापूर्वी महासभेत चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून प्रशासन सुस्तच राहिले. आता गणेशोत्सवाच्या तोंडावर महापालिका प्रशासन, वाहतूक पोलीस आणि गणशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी संयुक्तपणे धोकादायक पुलांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका पुलांवरून नेणे शक्य आहे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसे शक्य नसल्यास पर्यायी व्यवस्था सुचवण्यात येणार आहे, असे महापौर म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@