पक्षांतरांमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2019
Total Views |



पवारांचा सातारा दौरा, निवडक नेत्यांसोबत खलबत

 

सातारा : भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची एक लाटच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पसरली आहे. यामध्ये अनेक वरिष्ठ नेते, आमदार, नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरत आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत भलतीच अस्वस्थता पसरली आहे. यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कारकीर्दीच्या व वयाच्या या टप्प्यात पक्षाला पडणारी भगदाडे बुजवण्यासाठी वणवण करावी लागताना दिसत आहे.

 

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही नुकताच भाजपप्रवेश केल्याने पवारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यामुळेच बुधवारी रात्री उशिरा पवार स्वतः साताऱ्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात तळ ठोकत जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बंद खोलीत खलबते केली. तसेच, तालुकानिहाय संघटनात्मक बांधणीचाही त्यांनी आढावा घेतला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवेंद्रराजे भोसले भाजपात गेल्याचा कोणताही परिणाम राष्ट्रवादीवर होणार नसल्याचा दावा केला. परंतु, स्वतः पवारांना साताऱ्यात येऊन बैठका घ्याव्या लागाव्यात याचाच अर्थ राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे, असाच होत असल्याचे मत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते तसेच साताऱ्यातील पत्रकार मंडळी व्यक्त करत आहेत.

 

सदर पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, साताऱ्यातून आणखी किती लोक पक्ष सोडून जाणार आहेत, याची मला कल्पना नाही. परंतु, यशवंतराव चव्हाणांचा विचार ज्यांनी स्वीकारला आहे, ते असे काही करणार नाहीत. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी माझ्याकडे तीन-तीन अर्ज आले असल्याचा दावाही त्यांनी केला. सत्ताधारी सूडबुद्धीने वागत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. नुकताच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र व आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या चित्रा वाघ, साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले, ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे पुत्र आ. संदीप नाईक आदींसह अनेक नेते-पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 

साताऱ्यातील त्रांगडे, पवारांची डोकेदुखी

 

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान या दोघांनी उघडपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. शरद पवारांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला होता. उदयनराजे व त्यांचे चुलत बंधू आ. शिवेंद्रराजे यांच्यामध्येही वितुष्ट आहे. आता शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्येच प्रवेश केला आहे तर दुसरीकडे खा. उदयनराजे हे पक्षनेतृत्वाला जुमानतच नाहीत, स्वतःचीच धोरणे पुढे राबवतात. त्यामुळे एकीकडे अंतर्गत गटबाजी दुसरीकडे पक्षांतर अशा गर्तेत साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सापडली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेतही सातारा जिल्ह्यातील ८ पैकी ५ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला होता तर भाजपला जिल्ह्यात एकही जागा जिंकता आलेली नव्हती. अशा या बालेकिल्ल्यात पक्ष असा गटांगळ्या खाऊ लागल्याने आता स्वतः शरद पवारांना वयाच्या ७८ व्या वर्षी जिल्ह्यातील बारीकसारीक राजकारणात धावाधाव करावी लागत आहे.

 

शिवेंद्रराजेंनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादीवर काहीही परिणाम होणार नाही. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी माझ्याकडे तीन अर्ज आले आहेत. मला उमेदवारांची चिंता नाही, ही जागा राष्ट्रवादी नक्कीच राखेल.

 

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

@@AUTHORINFO_V1@@