गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2019
Total Views |


 


गाढवे एकत्र जमली की, परस्परांना आणि इतरांना शिव्या घालण्याचे (लाथा झाडण्याचे) काम करत असतात. त्यांच्या जमण्यातून चांगली गोष्ट कधीच साध्य होत नसते. इव्हीएमला विरोध करणाऱ्यांची गत अशीच झाली आहे.


"इव्हीएमच्या मुद्द्यावर आपल्याला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयुक्तांकडून अजिबात अपेक्षा नाही," असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या शर्टाची बाही पकडून झाली नाही, तोच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पदराआड लपण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते बोलत होते. खरे म्हणजे राज ठाकरेंनी कोणाकडून अपेक्षा करावी वा अपेक्षा नाही, असे म्हणणे हा प्रकारच मजेशीर आहे. कारण, इतरांच्या आशा-अपेक्षांचा चुथडा करूनच राज ठाकरेंची आजची ही दारुण अवस्था झाली आहे. १३ वर्षांपूर्वी मनसेची वाजतगाजत स्थापना केली तेव्हा, मुंबई-पुणे-नाशिकसह अनेक ठिकाणी राज ठाकरेंबद्दल सहानुभूती वाटणारा काही एक वर्ग होता. पुढे याच वर्गाने पहिल्याच तडाख्यात मनसेला मतांचे भरभरून दान दिले व पक्षाचे १३ आमदार विधानसभेत पाठवले. सोबतच नाशिक महापालिकेची सत्ताही मतदाराने राज ठाकरेंच्याच पक्षाकडे सोपवली. अर्थातच, राज ठाकरे नक्कीच आपल्या पक्षाच्या नावाला जागतील, नवनिर्माणाचे कार्य करतील, अशी अपेक्षा त्यांच्यावर विश्वास टाकणाऱ्या मतदारांना होती. परंतु, राज ठाकरेंनी रिकामटेकड्यांची सेना स्थापन केलेली असल्याने विकासाला, नवनिर्माणाला फाट्यावर मारण्याचेच काम केले. तोडपाणी, हाणामारी, गुंडगिरी, दहशतीच्या मार्गाचा अवलंब करत स्वतःची एक निराळीच प्रतिमा निर्माण केली. मनसे स्टाईल 'बघून घेऊ, ठोकून काढू' अशी भाषा या काळात स्वतः राज ठाकरे यांनी आणि त्यांच्या सैनिकांनी वापरली. आमदारांना आपापल्या मतदारसंघातील आणि नगरसेवकांना शहरातील प्रश्नांची सोडवणूक करता न आल्याने अखेर जनतेनेच राज ठाकरेंना बघून घेतले. परिणामी, यशाचा उडालेला उंच झोका कधी अपयशाच्या खडकावर आदळला, हेही त्यांना कळले नाही. मतदाराची नस ओळखू न शकलेला हा नेता मग पक्षात एकटाच उरला आणि त्याचे सखे-सवंगडी त्याला एक एक करून सोडून जाऊ लागले. आज तेच राज ठाकरे देशाच्या संवैधानिक संस्थांवर अविश्वास दाखविण्याचा, त्यांच्या कारभारावर संशय घेण्याचा उद्योग करत आहेत. अर्थात, राज ठाकरेंचेही बरोबरच आहे म्हणा. कारण, स्वतःच्या मनगटात बळ नसले की, अपयशी माणसे इतरांवर आरोपबाजी करण्याचा, जबाबदार धरण्याचा सोपा मार्ग निवडत असतात. तो त्यांना व त्यांच्या कार्यकर्ते-समर्थकांनाही सुखावणारा असतो. पण, त्यातून हाती काही लागण्याची, निष्पन्न होण्याची शक्यता अजिबात नसते. राज ठाकरे हे याचे उत्तम उदाहरण, पण एकमेव नव्हे!

 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून देशात अशा अपयशी नमुन्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. हे सगळेच नमुने समदुःखी असल्याने एकमेकांच्या सांत्वनासाठी भेटीगाठी घेण्याचा तमाशाही वेळोवेळी रंगवत असतात. अर्थातच राजकीय व्यक्ती असल्याने मग हात उंचावून दाखवणे, यंव करू अन् त्यंव करूच्या फुशारक्या मारणे, सत्ताधारी किती नालायक आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करणे आदी उठाठेवी या मंडळींना कराव्याच लागातात. जेणेकरून आपण कुठेतरी हातपाय मारत आहोत, असे त्यांना पाठीराख्यांना व माध्यमांनाही दाखवता येते. राज ठाकरेंनी ममता बॅनर्जींची कोलकात्यात जाऊन घेतलेली भेट ही त्याच मालिकेतील एक अंक. तत्पूर्वी त्यांनी शरद पवारांशी गट्टी जमवत हा प्रयोग केलाच होता. त्यावेळी पवारांना अशी आशा होती की, राज ठाकरेंमुळे आपला जनाधार वाढेल, जागांत वाढ होईल. पण, राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सान्निध्यात आले आणि त्या पक्षाची अवस्थाही मनसेसारखीच करून टाकली. राज ठाकरेंच्या सातत्यपूर्ण कामगिरीचीच ही कमाल. पण, हे मान्य नसलेल्या राज ठाकरेंनी ही कमाल आपण केलेली नसून ती मोदी-शाह यांनीच केल्याच्या बोंबा ठोकायला सुरुवात केली. म्हणून मग कधी इव्हीएमद्वारे मतदान नको, बॅलेट पेपरचाच वापर केला जावा, निवडणुकीवर बहिष्कार वगैरे वगैरे मुद्दे मांडत लक्ष वेधून घेण्याचे कामही त्यांनी केले. शरद पवारांशी सख्य जमल्यानंतर आणि ममतांची भेट घेण्याआधी मधल्या वेळेत राज ठाकरे दिल्लीलाही चक्कर मारून आले. तिथे त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतली. विषयही तोच इव्हीएमचाच. पण, या भेटीनंतर वास्तवाचे भान नसलेल्या वेडपटांनी त्याची तुलना बाळासाहेब ठाकरेंच्या इंदिरा गांधींच्या भेटीशी केली. खरे म्हणजे या तुलनेला बिनडोकपणाशिवाय दुसरे काय म्हणणार? कारण, राजा भोजाची तुलना गल्लीतही किंमत नसलेल्याशी कशी करता येईल? पण ती केली गेली. आता राज ठाकरे सर्वच संवैधानिक संस्थांवरचा विश्वास उडाल्याचे दाखवत असताना त्यांनी ममतांची भेट कशाला घेतली? की ममतांकडून महाराष्ट्रातल्या निवडणुकीत चमत्कार घडवला जाईल, अशी राज ठाकरेंना अपेक्षा आहे? म्हणूनच राज यांनी ममतांना मुंबईतील एका मोर्चाचे आमंत्रण दिले असावे. मात्र, परप्रांतियांच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या भय्यांवर हात उगारणाऱ्या राज ठाकरेंना बंगाली नेत्या कशा चालतात? तसेच ममता बॅनर्जी बांगलादेशी घुसखोरांच्याही समर्थक आहेत, राज ठाकरेही आता त्यांचाच कित्ता गिरवणार का? अशावेळी मुंबईतील मनसैनिकांचे काय होणार?

 

शरद पवार, सोनिया गांधी, ममता बॅनर्जींनंतर राज ठाकरे दिल्लीच्या अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशातल्या चंद्राबाबू नायडू, कर्नाटकातील देवेगौडा पिता-पुत्र यांचीही भेट घेऊ शकतात. विषय इव्हीएमचाच असेल आणि त्यावर आगपाखडही केली जाईल. सोबतच मोदी-शाह, भाजपच्या नावाने रेकण्याचे कामही हे सगळेच लोक करतील. हा इतरांवर दोषारोप करण्याचा, स्वतःचे नाकर्तेपण झाकण्याचा केविलवाणा प्रकारच. खरे म्हणजे राज ठाकरेंसारख्या कलेच्या, व्यंगचित्राच्या प्रांतात वावरणाऱ्या माणसाची दुर्दशा याहून वेगळी ती काय असू शकते? पण, बुद्धीचा वापर करण्यापेक्षा कोणीतरी उठवलेल्या वावड्यांवर विश्वास ठेवला की असेच होणार म्हणा. उलट राज ठाकरेंसारख्या तरुण नेत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार करायला हवा. कारण, काळाची चाके पुढेपुढेच जात असतात, मागे नव्हे. पण, म्हणतात ना मूर्ख आणि क्षुद्र विचारांच्या माणसांच्याच गोतावळ्यात जायचा निर्णय घेतला की, त्या व्यक्तीची स्थितीही तशीच होते. तिथे चांगल्याला कधी चांगले म्हटले जात नाही; त्यात खोडा घालण्यालाच ते शहाणपणा समजत असतात. राज ठाकरे वा इतरांकडून इव्हीएमसारख्या उत्तम यंत्रणेला केला जाणारा विरोध हा त्याचाच दाखला. यालाच 'गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ' असे म्हणतात. गाढवे एकत्र जमली की, परस्परांना आणि इतरांना शिव्या घालण्याचे (लाथा झाडण्याचे) काम करत असतात. त्यांच्या जमण्यातून चांगली गोष्ट कधीच साध्य होत नसते. इव्हीएमला विरोध करणाऱ्यांची गत अशीच झाली आहे. आपल्या एकत्र येण्याने काहीतरी स्वार्थ साधला जाईल, असे त्यांना वाटते व म्हणून ते परस्परांना पाठिंबा देताना तर इतरांच्या नावाने खडे फोडताना दिसतात. मात्र, मोदी वा भाजपला लक्ष्य करून घातलेल्या लाथा अखेर त्यांच्याच पेकाटात बसणार आहेत. कारण, जगात गाढवपणाला कोणी विचारत नसतो, त्याला सत्ता सोपवली जात नसते, तर त्याची खिल्ली उडवली जात असते, अवहेलना केली जात असते.

@@AUTHORINFO_V1@@