मातंग समाजासाठी १ लाख घरे ; मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2019
Total Views |



मुंबई : 'साहित्यरत्न' लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वंचितांसाठीच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मातंग समाजासाठी एक लाख घरे देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

'साहित्यरत्न' लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रंगशारदा सभागृह, वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, "अण्णा भाऊ साठे यांनी ४९ वर्षांच्या खडतर आयुष्यात वंचित शोषितांच्या व्यथांना आपल्या साहित्यातून आवाज दिला. अण्णा भाऊंची साहित्यनिर्मिती जगासाठी आकर्षण बिंदू होती. त्यांचे साहित्य २७ भाषांमध्ये भाषांतरित होण्याचा विक्रम आहे. यातच त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य दिसून येते. अण्णा भाऊंच्या या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे विचार, साहित्य शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील," असे त्यांनी स्पष्ट केले.

 

"मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी शासन पूर्ण ताकदीनिशी योगदान देईल. मातंग समाजाला एक लाख घरे देण्यात येतील. चिरागनगर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल." पुणे येथे लहूजी साळवे यांच्या स्मारकासाठी पाच एकर जमीन आरक्षित करण्यात आली असून या स्मारकासाठीही आवश्यक तो निधी दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते टपाल तिकिटाचे अनावरण, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरण कार्यक्रम, जन्मशताब्दी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, आ. दिलीप कांबळे, सुधाकर भालेराव, भाई गिरकर आदी उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@