दुसऱ्या तळ्याच्या शोधात...

    01-Aug-2019   
Total Views |



सत्तेवर असताना शरद पवार यांनी पक्षफोडीचे राजकारण केले नाही काय? छगन भुजबळ यांना शिवसेनेतून कोणी फोडले? गणेश नाईक यांना कुणी पळविले? जसे कर्म करावे, तसे कर्मफळ मिळते. कधी ना कधी याची सव्याज परतफेड केली जाईल, हे लक्षात ठेवावे लागते. हा सृष्टीचक्राचा अबाधित नियम आहे. जे पेराल तेच उगवेल.


शरद पवार यांनी २८ जुलैला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर पक्षफोडीचे गंभीर आरोप केले. पक्ष फोडण्यासाठी ईडी, सीबीआय आणि सत्तेचा गैरवापर केला जातो. मंत्री फोन करून धमकावतात. चित्रा वाघ यांच्या पतीला धमक्या देण्यात आल्या. मुश्रीफ यांनादेखील धमकविण्यात आले. भुजबळ यांच्यावर खोटा आरोप ठेवून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले, इत्यादी आरोप शरद पवार यांनी केलेले आहेत. या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ उत्तर दिले. "कोणावर दबाव टाकून आमच्या पक्षात या, असे म्हणण्याची आमची इच्छा नाही. ज्यांची ईडीमार्फत चौकशी चालू आहे, त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. निवडक लोकांनाच आम्ही आमच्या पक्षात घेऊ," असे देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तरादाखल म्हटले. याला 'राजकीय कलगीतुरा' म्हणतात. एकाने आरोप करायचे, दुसऱ्याने ते खोडून काढायचे, राजकीय खेळाचा हा एक भाग आहे. शरद पवार यांनी जे आरोप केले आहेत, त्यांना या लेखात काही स्वतंत्र उत्तर देण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आरोप-प्रत्यारोप याची चर्चा करण्याऐवजी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून जी पळापळ सुरू आहे, ती गंभीर आहे आणि तिची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. शरद पवार यांनी विषयाला सुरुवात केली, म्हणून त्यांच्याच पक्षाविषयी लिहिले पाहिजे. शरद पवार हे मूळचे काँग्रेसचे. त्यांनी दोनदा काँग्रेस सोडली. एकदा वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात करून मुख्यमंत्रिपद मिळवले, पक्ष फोडला. दुसऱ्यांदा सोनिया गांधींना विरोध करून त्यांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. पक्षफोडीचा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांवर पक्षफोडीचे आरोप करू नयेत. काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत.

 

सत्तेवर असताना शरद पवार यांनी पक्षफोडीचे राजकारण केले नाही काय? छगन भुजबळ यांना शिवसेनेतून कोणी फोडले? गणेश नाईक यांना कुणी पळविले? जसे कर्म करावे, तसे कर्मफळ मिळते. कधी ना कधी याची सव्याज परतफेड केली जाईल, हे लक्षात ठेवावे लागते. हा सृष्टीचक्राचा अबाधित नियम आहे. जे पेराल तेच उगवेल. पवारांनी जे पेरले, ते आता चांगल्या प्रकारे उगवू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशाला राहायचे? असा प्रश्न जर अनेकांना पडला तर त्याचा दोष शरद पवार यांच्याकडेच जाईल. पक्षाचे नाव आहे 'राष्ट्रवादी काँग्रेस.' त्यांचे 'राष्ट्र' बारामतीचा परिसर सोडून अन्य कुठे नाही. त्यांचा पक्ष म्हणजे 'पवार प्रा. लि. कंपनी' झालेला आहे. मुलगी खासदार आहे, पुतण्या अजित पवार आमदार आहेत, एक नातू खासदारकीसाठी उभा होता, तो पडला. असे परिवारातील एक-एक सदस्य सत्तेची पदे भूषवित आहेत. नाव आहे 'राष्ट्रवादी', रूप आहे 'घराणेवादी.' तेथे नंबर एक, दोन आणि तीनच्या जागेवर पवार सोडून अन्य कुणालाच जागा नाही. सर्वांनी आपआपल्या मर्यादेत राहिले पाहिजे. पूर्वी लोक म्हणत असत, आपली पायरी सांभाळून राहा. पवारांच्या पक्षात पायरी सांभाळून राहावे लागते. पक्ष उभा करण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट तत्त्वज्ञान आणि दुसरी गोष्ट संघटन. राष्ट्रवादीचे तत्त्वज्ञान कोणते? 'राष्ट्रवाद' हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे का? असल्यास राष्ट्रवाद म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्राची अस्मिता कशात असते? राष्ट्र केव्हा उभे राहते? केव्हा त्याचे पतन होते? राष्ट्राचे राष्ट्रीय पुरुष कोण? आणि ते का आहेत? अशा अनेक प्रश्नांची स्पष्टता असावी लागते. विचार स्पष्ट असले की, ते विचार घेऊन कुठे जायचे, त्याचा मार्गदेखील स्पष्ट असतो. विचारात गोंधळ असेल तर या मार्गाने जाऊ की त्या मार्गाने अशी गोंधळाची अवस्था असते.

 

ज्या पक्षाशी भांडण केले आणि तो पक्ष सोडला, त्याच पक्षाशी पुन्हा घरोबा केला. म्हणजे बायकोशी काडीमोड घ्यायचा आणि मग पुन्हा तिच्याशीच संसार करायचा, यात आणि शरद पवारांच्या चालीत फरक काय? पक्षाचे तत्त्वज्ञान असेल आणि तेही राष्ट्रवादाचे असेल तर पक्षाचा नेता राज ठाकरेशी कधीही घरोबा करणार नाही. कारण, राज ठाकरे यांची विचारसरणी दोन भाषिकांना आपआपसात लढविण्याची आहे. राष्ट्रवादात दोन भाषा, भाषाभगिनी असतात आणि प्रादेशिक वादात एक भाषा दुसऱ्या भाषेच्या विरोधात असते. लोकसभा निवडणुकीत सुपारी देऊन राज ठाकरेला तुम्ही फिरविले. त्यामुळे लोकांनी तुम्हाला तुमच्या जागेवरून फिरविले. शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी विचारसरणी मानणाऱ्यांचा, कट्टर राष्ट्रवाद्यांचा पक्ष झाला नाही. त्यांच्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक फार मोठ्या प्रमाणात आले. उल्हासनगरचा पप्पू कलानी, विरारचे ठाकूर अशी तालुका पातळीपर्यंतची मंडळी पक्षात आली. 'बाहुबली आणि धनबली यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस' असे समीकरण झाले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. या भूमीत गुंडशाही आणि झुंडशाही अल्पकाळ विजयी होऊ शकते, चिरकाल विजयी होऊ शकत नाही. असे म्हणतात की, काही लोकांना तुम्ही काही काळ फसवू शकता, काही काळ सर्व लोकांना फसवू शकता, परंतु सर्वकाळ सर्व लोकांना फसवू शकत नाही. त्या स्थितीत आता राष्ट्रवादी काँग्रेस आलेली आहे. पक्षाचे संघटन मजबूत असावे लागते. पक्षाचे संघटन मजबूत होण्यासाठी समर्पित कार्यकर्ते लागतात. कार्यकर्त्यांची जडणघडण करावी लागते. एक काळ असा होता की, शरद पवार खेडोपाडी असलेल्या कार्यकर्त्यांचा ज्ञानकोश होते. पक्षातील कार्यकर्त्यांची त्यांना इथ्यंभूत माहिती असे. त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी शरदराव तेथे जात. असा कार्यकर्ता पक्षाशी बांधलेला राहतो. ही प्रथा दुसऱ्या-तिसऱ्या पिढीनेदेखील पाळावी लागते. बहुधा त्याबाबतीत पक्षात खूप कमतरता राहिली असेल. त्यामुळे दिशाहीन झालेले कार्यकर्ते दिशा शोधण्यासाठी अन्य पक्षांत जाऊ लागले आहेत.

 

आपण उभ्या केलेल्या पक्षाची ही पडझड शरद पवारांना बघावी लागत आहे. मोठ्या कष्टाने बांधलेले घर जर आपल्या डोळ्यादेखत कोसळू लागले, तर खूप दुःख होते. आयुष्याची सर्व कमाई गेल्याचे दुःख झाल्याशिवाय राहत नाही. पक्षाची पडझड शरद पवार थांबवू शकतील असे वाटत नाही. त्यांनी किती जरी म्हटले की, पक्ष सोडणाऱ्यांना विजय मिळत नाही, जनता त्यांना धडा शिकवते. यावेळी हे होईलच असे नाही. ज्यावेळी जनतेच्या मनात पक्षाविषयी आस्था असते, नेत्याविषयी जिव्हाळा असतो आणि त्याच्याविषयी विश्वास असतो, तेव्हा पक्ष सोडणाऱ्यांना जनता माफ करीत नाही. आज जर कुणी भाजप सोडून गेला तर त्याला जनता माफ करणार नाही. तो स्वतंत्र उभा राहिला किंवा दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर उभा राहिला तर त्याला त्याच्या घरातील मते मिळतील की नाही, याची शंका आहे. जेव्हा पक्षाची विश्वासार्हता आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांची विश्वासार्हता यांच्यावर शेकडो प्रश्न निर्माण होतात, तेव्हा जनता आपल्यापासून दूर गेली आहे, हे समजले पाहिजे. एक गोष्ट खरी आहे की, एकाच प्रकारची राजकीय परिस्थिती कायम राहत नाही. भाजप स्वबळावर सत्तेवर येईल, असे १५-२० वर्षांपूर्वी कुणालाही वाटत नव्हते, परिस्थिती बदलली आणि आता भाजप सत्तेवर नसेल अशी परिस्थिती कधी येईल, असे लोकांना वाटत नाही. परंतु, ही परिस्थितीदेखील कायमस्वरूपी राहणार नाही.

 
राष्ट्रवादीचे आताचे भविष्य अंधकारमय असले तरी भविष्यात ते पुन्हा उभे राहू शकतात- नवीन नावाने, नवीन नेतृत्त्वाने. आताचा प्रश्न फक्त एवढा आहे की जुने, नव्यांना संधी देणार का? मुंबई सर्वोदय वेबसाईटवर मार्टिन ल्यूथर किंग यांच्यावरील 'Walter Earl Flukert' लेख वाचण्यात आला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील लेखकाची गोष्ट सांगितली आहे. बदकांची आई आपल्या पिलांना घेऊन एका छोट्या तळ्यात जात असे. अनेक वर्षे असे चालले. तिसऱ्या-चौथ्या पिढीची बदके घेऊन ती छोट्या तळ्यात निघाली. ते तळे सुकले होते. घट्ट होणारा चिखल तिथे राहिला होता. तिची मुले मागे राहिली. मुलांना ती तळ्यात येण्याचा आग्रह करू लागली. आवाज करू लागली, परंतु तरुण रक्त तिच्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. त्यांना थोड्याशा दूर अंतरावर बांधलेले एक मोठे धरण दिसत होते. त्यात पाणीच पाणी होते. आजूबाजूला हिरवीगार वनस्पती होती. या सुकलेल्या डबक्यात जाण्याऐवजी त्या मोठ्या धरणात आपण गेले पाहिजे, असे सर्वांनी ठरविले आणि ते आपल्या आईला सोडून आपल्या मार्गाने निघून गेले. लेखकाचे शेवटचे भाष्य सांगितल्याशिवाय राहवत नाही की, "हे चांगल्या आई, जग बदललं आहे, हे तू पाहू शकत नाही का? सुकलेल्या तलावात तू पाणी आणू शकत नाही. जेव्हा त्यात पाणी होतं तेव्हा ते आनंददायी होतं. पण आता त्यात पाणी कधीच येणार नाही. त्यामुळे तेथे तू पोहू शकणार नाहीस. पोहण्यासाठी दुसरे तळे शोधले पाहिजे."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.