पहा, जवळी तो त्र्यंबक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2019
Total Views |


त्रि+अम्बकम्हणजेच तीन कामे करणारी ती महान अंबा म्हणजे आई. ही जगदंबा आपल्या महनीय प्रसवशक्तीने संपूर्ण ब्रह्मांडाला जन्माला घालते. म्हणूनच ती ब्रह्माआहे. केवळ जन्म देऊन ती आपल्या बाळांना वार्‍यावर सोडत नाही, तर सर्वांचे पालन करणारी ती विष्णूआहे आणि शेवटी सर्वांना आपल्या कुशीत घेणारी म्हणजेच प्रलय करणारी ती महेशपण आहे.

अयमस्मि जरित: पश्य मेह,

विश्वा जातान्यभ्यस्मि मह्ना।

ऋतस्य मा प्रदिशो वर्धयन्ति,

आदर्दिरो भुवना दर्दरीमि॥

(ऋग्वेद-८.१००.४) अन्वयार्थ

(जरित:) हे स्तुती करणार्‍या मानवा! (अयम्) हा मी (अस्मि)प्रत्यक्ष(जवळ) उपस्थित आहे. (मा) मला (इह) या जगात, चराचरात (पश्य) पाहा! (मह्ना) मी आपल्या महान शक्तीद्वारे (विश्वानि जातानि) समग्र उत्पन्न झालेल्या सृष्टीत, जगात (अभि-अस्मि) अधिष्ठाता, नियंत्रक, पालक या रुपात विद्यमान, उपस्थित आहे (ऋतस्य) सृष्टीनियमांचा, सत्याचा (प्रदिश:) विशेष उपदेश करणारे विद्वान व ज्ञानी लोक (माम् वर्धयन्ति) मला, माझ्या कार्याला वाढवितात. (आदर्दिर:) नाश करण्याची शक्ती बाळगणारा मी (भुवनानि) समग्र विश्वसृष्टीला (शेवटी) (दर्दरीमि) अतिशय सूक्ष्मपणे विदीर्ण, नाहीसे करतो.

विवेचन

या मंत्रात परमेश्वर आपल्या अमृतपुत्रांना उपदेश करीत आहे. घरात एखाद्या कार्यक्रमात सगे-सोयर्‍यांच्या गर्दीत आईपासून दुरावलेला बाळ भयभीत होतो. आईच्या शोधात तो इतर सर्व स्त्रियांना न्याहाळतो. ही स्थिती पाहून आईसमोर येऊन म्हणते कशी... हे बाळा ! घाबरू नकोस, मी इथेच तर आहे!अगदी तीच स्थिती जगाच्या त्रिविध दु:खाने आर्त झालेल्या, काम-क्रोध-लोभ-मोह आदी षड्रिपूंच्या जाळ्यात अडकून शाश्वत सुखाची वाट हरवलेल्या तसेच अविद्या-अंध:काराच्या व अंधश्रद्धांच्या जाळ्यात अडकलेल्या आणि यामुळेच ईश्वरीय मातृछायेपासून वंचित झालेल्या मानवया अमरपुत्राची झालेली आहे. त्यांना जवळ करून ही जगदंबा (जगाची आई) म्हणते, “अरे, माझ्या नावाचा धाव करणार्‍या प्रिय पुत्रा, मानवा! पाहा, मी तर प्रत्यक्ष सर्वत्र आहे. मला शोधण्याकरिता तुला इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही. या संपूर्ण विश्वाच्या चराचरात मला पाहा! मी या जगातील महत्तर वस्तूंमध्ये स्थूलरूपाने, तर लघुत्तम अशा कणा-कणांमध्ये सूक्ष्मरूपाने प्रत्येक प्राणिमात्राच्या अंतर्बाह्य तत्त्वांमध्ये वास करते आहे. मग कशासाठी व्यर्थ भटकतोस? मथुरा, काशी, गया, हरिद्वार, पुरी, मक्का, मदिना, जेरूसलेम आदी तीर्थस्थळी?”

इकडे तिकडे शोधीत का रे

फिरसी वेड्यापरी,

वसे तो देव तुझ्या अंतरी...।

संत कबीरांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर -

मोको कहां ढूंढे बन्दे...

मैं तो तेरे पास हूँ!

असा हा सर्वव्यापक एकमेव त्र्यंबकेश्वर. त्रि+अम्बकम्हणजेच तीन कामे करणारी ती महान अंबा म्हणजे आई. ही जगदंबा आपल्या महनीय प्रसवशक्तीने संपूर्ण ब्रह्मांडाला जन्माला घालते. म्हणूनच ती ब्रह्माआहे. केवळ जन्म देऊन ती आपल्या बाळांना वार्‍यावर सोडत नाही, तर सर्वांचे पालन करणारी ती विष्णूआहे आणि शेवटी सर्वांना आपल्या कुशीत घेणारी म्हणजेच प्रलय करणारी ती महेशपण आहे. म्हणूनच तर ब्रह्मतत्त्व कसे आहे? हे जाणून घेण्याची इच्छा बाळगणार्‍या (अथातो ब्रह्मजिज्ञासा) जिज्ञासू मानवाला महर्षी व्यास आपला वेदांत दर्शनया शास्त्रात म्हणतात, ‘जन्माद्यस्य यत:।ज्या महान शक्तीद्वारे जगाचा जन्म होतो, पालन होते व शेवटी प्रलय होते, असा तो ब्रह्म जिज्ञासा करण्यायोग्य आहे. वेदमंत्रात उत्पत्ती (जन्म) व स्थिती (पालन) याविषयी म्हटले आहे -

विश्वा जातानि अभि अस्मि मह्ना।

माझ्या महान शक्ती व सामर्थ्याने हे सारे जग उत्पन्न झाले आहे आणि अशा या समग्र ब्रह्मांडावर मी अधिष्ठाता बनून स्थिर आहे. यावरून हे स्पष्ट होते की, ईश्वराचे हे सृष्टिनिर्मितीचे कार्य साधेसुधे नव्हे. ते पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे. प्रत्येक वस्तू विचारपूर्वक सुव्यवस्थित आणि सूक्ष्मरीत्या बनवली गेली आहे. त्याची निर्मिती करणारा विश्वकर्मा हा किती विवेकशील व विज्ञाननिष्ठ असेल? त्याने बनवलेली साधी मुंगीदेखील आजपर्यंतच्या असंख्य शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांना निर्मिता आली नाही. स्थूलांत स्थूल आणि सूक्ष्मांत सूक्ष्म अशा समस्त जड व चेतन तत्त्वांना उत्पन्न करणारा आणि त्या सर्वांचे अत्यंत चांगल्या प्रकारे संगोपन, पालन-पोषण करणारा तो मातृ-पितृ रूप परमेश सगळ्या जगावर आपले वर्चस्व गाजविणारा आहे. त्याचे उत्पत्ती, स्थिती व लयाचे हे कार्य अद्भुत आहे. हे त्रिविध कार्यचक्र तो इतक्या सहजपणे चालवितो की, या सृष्टीप्रक्रियेला आपण ओळखू शकत नाहीत.

या बाह्यसृष्टीकडे पाहा किंवा आपल्याच शरीररचनेकडे पाहा. बीजे अंकुरतात, मोठी होऊन ती झाडे बनतात, त्यांना पानां-फुलांचा बहर येतो. नंतर ती फलिभूतही होतात आणि शेवटी नाहीशी होतात. स्वत:कडे पाहा. डोक्यावरील केस, हातापायाची नखे उत्पन्न होतात, वाढतात व नाहीशी होतात. हे सर्व आम्हाला दिसत पण नाही. तद्वतच सार्‍या जगाचे आहे. खरेतर ही तिन्ही कार्ये एक-दुसर्‍यात परावर्तितत होताना अनुभवतादेखील येत नाही. त्याकरिता हवी असते पवित्र प्रज्ञा व ऋतम्भरा!

याच सद्बुद्धीच्या बळाने संतजन, विद्वान् भगवंतांच्या कार्याचा अनुभव घेतात. आपल्या शुद्धाचरणाने ते वृद्धिंगत करतात...! तेच ज्ञान जगासमोर मांडतात.

 

९४२०३३०१७८

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@