समाज घडविणारे महापुरुष : अण्णा भाऊ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2019
Total Views |



साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माझे अल्प विचार मांडत असताना मला अतिशय आनंद होत आहे. अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी अनेक साहित्यिकांनी, समीक्षकांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांना अण्णा भाऊ जसे दिसले तसे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

 

कोणाला अण्णा भाऊंमध्ये 'शाहीर' दिसून आला. कोणाला 'साहित्यिक' तर कोणाला 'कामगारांचा नेता' दिसून आला. मात्र, अण्णा भाऊ साठे हे एवढ्यापुरते मर्यादित नसून जगाला वैश्विक विचार देणारे साहित्य विश्वातील दीपस्तंभ आहेत. अण्णा भाऊ यांचा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबात झालेला असून त्यांच्या जीवनाचा बहुतांश काळ हा कामगार वसाहतीत गेलेला आहे. अण्णा भाऊ साठे यांचे अतिशय अल्प शिक्षण झालेले असतानादेखील ते ज्या परिसरात राहिले तेथील रहिवासी विशेषत: गिरणी कामगार, गोदी कामगार, महानगर पालिकेतील कामगार यांच्या जीवनाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा विषय हा नेहमीच उपेक्षित आणि वंचितांचे जीवन हा राहिलेला आहे. अण्णा भाऊ साठे जे जीवन जगले त्याचे वास्तवदर्शी लिखाण केलेले आहे. अण्णा भाऊ साठे हे उपजत प्रतिभा लाभलेले साहित्यिक होते.

 

अण्णा भाऊंनी त्यांचे लिखाण एका बंद खोलीत बसून न करता त्यांनी प्रत्यक्षात जे अनुभवले, भोगले, सोसले, त्याग, कष्टकरी, पीडित जनतेचे दर्शन त्यांच्या लेखणीतून होत असते. त्यांची शाळा दीड दिवसाचीच झाली होती. पण, आयुष्याच्या शाळेत अण्णा भाऊंनी अनुभवांची डबल पीएच.डी केली होती, असेच म्हणावे लागेल. लहान वयात जगण्यासाठी अण्णा आपल्या कुटुंबीयांसोबत वाटेगावहून मुंबईला पायी चालत आले. हे चालणे नुसते चालणे नव्हते, तर तासागणिक बदलणार्‍या गावांच्या संस्कृतीचा अनुभव घेत जगणे होते. या प्रवासात अण्णा भाऊंचे कुटुंब वाटेतल्या खेड्यात, गावात आणि शहरातही थांबले. त्यावेळचे अनुभव अण्णा भाऊंच्या आयुष्याला सधन करून गेले. कारण, वंचित, शोषित, भटक्याच्या जगण्याचे चटकेच यावेळी अण्णा भाऊंनी अनुभवले. गावात आणि या प्रवासातही समाजातल्या भटक्यांचे जगणे अण्णा भाऊंनी जवळून पाहिले. भूक, तहान, थकवा आणि या सगळ्या गोष्टींकडे कधी 'आहे रे' समाजाने सहानुभूतीने पाहणे तर कधी कुत्र्या-मांजरासारखे झिडकारले असेल. हे सारे सारे अण्णा भाऊंच्या काळजात रूतले गेले. 'केल्याने देशाटन' अशी म्हण आहे. अण्णा भाऊंचा वाटेगाव ते मुंबईचा प्रवास अण्णा भाऊंच्या आयुष्याच्या प्रवासातला दिशादर्शक प्रवासच होता.

 

पुढे मुंबईला आल्यावर जातीयवादाच्या चटक्यापेक्षाही वर्गवादाची भयंकर विषमता अण्णा भाऊंनी पाहिली. गिरणी कामगार, हमाल, डोंबारी, मदारी, सफाई कामगार, घरकाम करणारे ते नाचकाम करणार्‍या, मजबुरीने देह विकणार्‍या स्त्रिया या सार्‍यांचे दु:ख मुंबईतल्या सोनेरी पिंजर्‍यात घुसमटताना अण्णा भाऊंनी जाणले. पैशांसाठी मरणारे, मारणारे लोकही इथे दिसले. मुंबईची मोहिनी त्यांनाही पडलीच. पण, ती केवळ पोटार्थी म्हणून नाही, तर मुंबईच्या मातीत जगण्याच्या दिशा मिळाल्या म्हणून मुंबईबद्दल आपलेपणा होता. 'मुंबईकर' म्हणून जगताना मुंबईच्या सार्‍याच प्रश्नांचा त्यांनी वेध घेतला. घाटकोपरच्या ज्या झोपडपट्टीत ते राहत होते, तेथे 'मच्छर' झाले म्हणून त्यावर त्यांनी पोवाडा लिहिला. हीच मुंबई ज्यावेळी महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे कारस्थान होत होते, त्यावेळी अण्णा भाऊंची लेखणी चवताळून उठली. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये पोवाडे लिहून जनजागृती केली. कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे,' असा विचार मांडला आणि कामगारांच्या श्रमाला देशाच्या प्रगतीमध्ये किती महत्त्वाचे स्थान आहे याची जाणीव करून दिली. अण्णा भाऊ साठे हे जे जगले तेच जीवन त्यांच्या लिखाणात चित्रित केले. त्यामुळे असे प्रतिभासंपन्न साहित्य निर्माण होऊ शकले.

 

अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या रशियाच्या प्रवासादरम्यान जे वास्तव अनुभवले, तेच वास्तवदर्शी चित्रण त्यांनी 'माझा रशियाचा प्रवास' यात रेखाटलेले आहे. अण्णा भाऊ साठे यांना मॉस्कोमध्ये पोहोचल्यानंतर रशियामध्ये काय पाहायचे आहे, याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते “मला फक्त या देशात फुटपाथवरून भटकायचे आहे,” असे म्हणाले. त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या इच्छा व्यक्त केल्या. परंतु, या मानवताप्रेमी माणसाने रशियाचे वैभव पाहण्याची इच्छा व्यक्त न करता तेथील फुटपाथवर राहणारे लोक, मजूर यांचे जीवन जवळून पाहाण्याची इच्छा व्यक्त केली. अण्णा भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू महत्त्वाचा आहे की, समाजाच्या जातीय विषमतेत निम्न उतरंडीवर असताना, आर्थिक परिस्थितीही प्रतिकूल असताना, शिक्षणही दीड दिवसांचे असताना अण्णा भाऊंमध्ये कधीही न्यूनगंड नव्हता. ते जिथे जातील तिथे 'अण्णा भाऊ'च होते. 'अण्णा' म्हणजे मोठा भाऊ. त्यामुळेच समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आदर्शस्थानी 'अण्णा भाऊ' आहेत.

 

माणसाचे माणूसपण मोठे असते. संवेदनशीलता जपून दुसर्‍याच्या दु:खाशी समरस होण्याची त्यांना विलक्षण हातोटी होती. त्यामुळेच केवळ मातंग समाजाचेच नव्हे, तर अठरापगड जातींचे भावविश्व त्यांच्या विचारांतून उमटत असे. समाजाला जागृत करताना त्यांनी कधीही आक्रस्ताळेपणा केला नाही. तसेच माझ्यावर हा अन्याय झाला, तो अन्याय झाला, असे रडगाणे गायले नाही. त्यांनी समाजाला विचार दिला की, “तू गुलाम नाहीस तर तू निर्माता आहेस. तुझे जगणे तूच घडवतोस.” आज असे चित्र दिसते की, अण्णा भाऊंच्या नावाने काही फुटीरतावादी लोक समाजातील भोळ्या तरुणांना उगीचच दिशाहीन करत आहेत. मात्र, अण्णा भाऊंना दैवत मानणारा समाज कधीही अण्णा भाऊंच्या देशप्रेमी आणि समाजनिष्ठ विचारांपासून दूर जाऊ शकत नाही. हीच अण्णा भाऊंना समाजाकडून आदरांजली आहे.

 

- बाबुराव मुखेडकर

9870318197

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@