दिखाव्याची दिल्लीवारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2019
Total Views |


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इव्हीएममध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांच्या फैरी झाडत आगामी निवडणुका मतपत्रिकांच्या आधारावरच (बॅलेट पेपर) घेण्यात याव्या, या मागणीसाठी सोमवारी दिल्लीत मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेतली. अनेक निवडणुकांत सपाटून मार खाल्लेल्या इतर प्रादेशिक पक्षांप्रमाणे राज यांनीही इव्हीएम घोटाळ्याचे तुणतुणे पुन्हा वाजवले. असो, पराभवास कोणतेही कारण नसले, तर इव्हीएमकडे बोट दाखवणे याशिवाय विरोधकांकडे सध्या दुसरा पर्याय नाही, ही सध्याची वस्तुस्थिती. गेल्या ३० वर्षांपासून इव्हीएम मशीनवर अनेकांकडून शंका उपस्थित केली जात असल्याचे राज यांनी सोमवारी मागचा-पुढचा विचार न करता सांगितले. मात्र, सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ साली नाशिक महापालिकेत जेव्हा मनसेची सत्ता आली, ती ही या इव्हीएममुळेच. मग त्यावेळी इव्हीएमबाबत त्यांना शंका आली नव्हती का? तेव्हा राज यांनी इव्हीएमबाबत सवाल का उपस्थित केले नाहीत? २०१४ नंतर भाजपच्या सतत होणार्‍या विजयानंतरच केवळ हा मुद्दा उपस्थित करणे, हा राज यांचा रडीचा डावच! २०१४ नंतर भाजपलाही काही निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली ’आप’ची झाली, पंजाब काँग्रेसचे, पश्चिम बंगाल ममतांचे तर दाक्षिणात्य राज्यांत प्रादेशिक पक्ष. हे सत्य भाजपने सहज स्वीकारले. त्याचे खापर इव्हीएमवर फोडले नाही. पराभवाचे आत्मपरीक्षण करत भाजपचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागले. विरोधकांनीही असेच करणे अपेक्षित होते. याउलट पराभव अमान्य करत इव्हीएमवर शंका उपस्थित करणे म्हणजे धूळ चेहर्यावर तरी आरसा साफ करण्यासारखेच आहे. मनसेने भाजप सत्तेत आल्यानंतर इव्हीएमबाबत अनेकवेळा शंका उपस्थित केल्याचे सर्वांना ज्ञात आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार जवळपास १० वर्ष सत्तेत असताना याच मनसेने इव्हीएमबाबत सवाल उपस्थित केले नाहीत. भाजप सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अनेकदा इव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज ठाकरे यांनीही आता पवारांच्या पावलावर पाऊल टाकत इव्हीएमवर पराभवाचे खापर फोडले. लोकसभा निवडणुकीतील मनसे-राष्ट्रवादीची छुपी युती सर्वांनीच पाहिली. त्यामुळे ’जाणत्या मित्रा’ला बरे वाटावे म्हणून तर हा इव्हीएम विरोध नाही ना? तसे असेल तर ही दिखाव्याची दिल्लीवारीच झाली ना राजसाहेब !

 

दिल्लीवारी खरी कोणासाठी?

 

इव्हीएम घोटाळ्यावरुन आपल्या पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडण्याच्या नादात आपण लोकशाही व्यवस्थेलाच पायदळी तुडवित आहोत, याचे भानच विरोधकांना राहिलेले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिल्ली गाठत आगामी निवडणुका इव्हीएमऐवजी मतपत्रिकांवर घेण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली. एवढेच नाही, तर त्यानंतर यातून काही निष्पन्नही होणार नाही, हेही सांगून ते मोकळे झाले. म्हणजेच, ही भेट केवळ तोंडदेखलीच होती हे सिद्ध झाले. खरं तर मतपत्रिकांचा इतिहास चांगला नसल्यानेच तत्कालीन काँग्रेस सरकारने सर्वात आधी मतपत्रिकांऐवजी इव्हीएमद्वारे निवडणुका घेण्याचा प्रस्ताव देशासमोर आणला. निवडणुकांदरम्यान मतपेट्या पळवणे, पेट्या फोडणे, पेट्यांची अदलाबदल यांसारख्या अनेक गैरप्रकारानंतरच इव्हीएमद्वारे मतदानाचा पर्याय देशासमोर आला. मतपत्रिकांवरील विश्वासार्हता आणि मतमोजणी प्रक्रियेला होणारा विलंब यामुळे १९९०च्या दशकात देशात इव्हीएमद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी जोर धरू लागली. त्यानंतर १९८२ साली केरळातील परूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रायोगिक तत्त्वावर इव्हीएमने मतदान घेण्यात आले. कोणत्याही गोंधळाशिवाय मतदान, तसेच पारदर्शकता आणि झटपट निकालाची शाश्वती मिळाल्यानंतरच इव्हीएमद्वारे मतदानाची मागणी देशभरात वाढू लागली. त्यानंतर तामिळनाडूतही विधानसभेच्या काही जागांवर १९८९ साली इव्हीएमद्वारेच यशस्वीरित्या मतदान झाले. त्यामुळे १९९५ साली महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकाही त्याच आधारावर घेण्यात आल्या. यावेळी राज्यात सेना-भाजप युतीचे सरकार निवडून आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यावेळी शिवसेनेत होते. म्हणजेच, त्यापूर्वीपासून ते २०१३ पर्यंत इव्हीएम वापरुन केलेले देशभरातील मतदानाचे सर्व निकाल राज ठाकरेंना पटले असेच म्हणावे लागेल. मग आता २०१९ मध्ये भाजपची पुन्हा सत्ता आल्यानंतर इव्हीएमबाबत शंका उपस्थित करणे, हे कितपत व्यवहार्य? इव्हीएममधील फेरफारीच्या आरोपांनंतर आयोगाने २०१७ साली तसा आरोप सिद्ध करून दाखविण्याचे आव्हानही सर्व राजकीय पक्षांना दिले. मात्र, विरोधकांपैकी एकाही पक्षाला ते जमले नाही. तेव्हा अभ्यासू, चिकित्सक राज ठाकरेंनी इव्हीएमवरील आरोप सिद्ध करण्यासाठी आपला प्रतिनिधी दिल्लीला का पाठवला नाही? असो. त्यामुळे राज यांच्या कालच्या दिल्लीवारीचा खरा अजेंडा हा खरंच निवडणूक आयुक्तांना भेटीचाच होता की सोनिया गांधींशी राजकीय चर्चांचा, अशी शंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

- रामचंद्र नाईक 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@