अमरनाथ यात्रेचा काश्मीरी नागरिकांना त्रास; मेहबुबा मुफ्ती यांचे वादग्रस्त वक्तव्य

    08-Jul-2019
Total Views |
 
 
 
श्रीनगर : अमरनाथ यात्रेसाठी जी व्यवस्था आणि ज्या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत त्या सर्व काश्मीरच्या नागरिकांविरोधात आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य जम्मू आणि काश्मीर राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.
 

वर्षानुवर्षे अमरनाथ यात्रा सुरु आहे. १ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरु झाल्यापासून आतपर्यंत ९० हजारपेक्षा अधिक भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. यासंदर्भात बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, अमरनाथ यात्रेला आमचा पाठिंबा आहे. परंतु या यात्रेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात येतो. पवित्र यात्रेसाठी लागणाऱ्या पूर्वतयारी आणि एकंदर परिस्थिती पाहता याचे सर्वाधिक परिणाम हे काश्मीरच्या स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

 
अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ, जम्मू आणि काश्मीर पोलीस यंत्रणा, भारतीय सैन्यदल आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचे मोलाचे योगदान असते.
 

फुटीरतावाद्यांचा कळवळा

मेहबुबा मुफ्ती यांनी फुटीरतावाद्यांबद्दल कळवळा दाखवला आहे. त्या म्हणाल्या, फुटीरतावाद्यांचा एक गट चर्चेसाठी तयार असल्याचे बोलत आहे. फुटीरतावादी चर्चेसाठी तयार असतील तर केंद्र सरकारने ही संधी वाया जाऊ देऊ नये आणि त्यांच्यासोबत चर्चेला सुरुवात करावी, असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.

 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat