'मर्त्य' बुद्धी अमर्त्यांची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2019
Total Views |



रामनामाच्या नुसत्या उच्चाराने दगडधोंडेही चक्क पाण्यावर तरंगतात. मात्र, जे दगडही नाहीत अन्धोंडेही नाहीत, असे अमर्त्य सेन यांसारखे विद्वान वा ममतांसारखे विक्षिप्तजन आपल्या 'मर्त्य' बुद्धीच्या प्रभावातून रामनामाच्या जयघोषाला विरोध केल्याने तरणार तर नाहीतच उलट स्वतःच बुडतील, असे वाटते.

 

साहित्य अकादमी वा नोबेल पुरस्कार मिळाला म्हणजे वाह्यात विधाने करण्याचा परवाना मिळतो का? आपल्याला मिळत असणार्‍या मान-सन्मानाच्या आणि आदराच्या कैफात बुडालेल्या नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन (आणि कंपूतील इतरही नग) यांच्याकडे पाहून तरी असेच वाटते. नुकतेच अमर्त्य सेन यांनी आपल्या 'मर्त्य' बुद्धीला साजेसे वक्तव्य करत, “जय श्रीराम घोषणेशी बंगालच्या संस्कृतीचा संबंध नाही,” अशी मुक्ताफळे उधळली. सोबतच “आजकाल कोलकात्यामध्ये रामनवमी मोठ्या प्रमाणावर साजरी होताना दिसते. पण, यापूर्वी असे कधी झालेले दिसले नाही,” असे म्हणत स्वतःच्या नातीचे उदाहरण दिले. “मी एकदा माझ्या चार वर्षांच्या नातीला तुझी आवडती देवी कोणती? असा सवाल केला. त्यावर तिने दुर्गामाता असल्याचे उत्तर दिले. दुर्गामातेचे बंगालमध्ये प्रचंड महत्त्व आहे, त्याची तुलना रामनवमीशी केली जाऊ शकत नाही. दुर्गामाता आमच्या आयुष्याचा एक भाग आहे,” असे सांगत, “केवळ लोकांना मारहाण व त्यांच्यावर हल्ले करण्यासाठीच 'जय श्रीराम' घोषणेचा आधार घेतला जातो,” असे सेन यांनी म्हटले. अर्थातच ही बडबड ऐकल्यानंतर अमर्त्य सेन यांचा इथल्या मातीशी संबंध कितीसा हाच प्रश्न निर्माण होतो. कारण स्वदेशात येऊन-जाऊन असलेल्या आणि परकीय भूमीशीच अधिक नाळ जुळलेल्या अमर्त्य सेन यांना भारत आणि हिंदू धर्म अजूनही कळला नसल्याचेच दिसते.

 

हिंदूंमध्ये विविध देव-देवता, पंथ, संप्रदाय, उपासना पद्धती, धार्मिक श्रद्धा आहेत, हे खरेच. पण उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पूर्वेपासून पश्चिमेकडे पसरलेल्या हिंदू धर्मीयांतच विविधतेतील एकतेची अनुभूती येते, हेही वास्तवच! म्हणूनच वेद वा पुराणांतही उल्लेख असलेल्या आणि नसलेल्याही संत-महंतांना, अवतारी पुरुषांना देवत्वाचे स्थान इथला हिंदू समाज देत आला. विशेष म्हणजे त्यावरून कोणी 'अमक्याला मानू नका' वा 'तमक्यालाच माना,' असे आदेशही कधी दिले नाहीत. उलट इतरांनाही आपलेसे करत आपण सर्व एकाच ईश्वराला भजणारे आणि एकाच ईश्वराचे अंश असल्याचेच हिंदूंनी दाखवून दिले. सोबतच या एकतानतेत भारतालाच आपली पुण्यभू आणि पितृभू मानण्याची निखळ भावनाही आहेच. परंतु, हिंदूंच्या याच सर्वांना एक मानण्याचा अडथळा भारत विखंडन शक्तींच्या दुष्ट हेतूंत येत असतो. म्हणूनच हिंदूंत वरवर दिसणार्‍या भेदांच्या आधारे दुफळी माजवण्याची कारस्थाने जमात-ए-पुरोगामी प्रवृत्तीकडून सातत्याने होतात. हिंदू वेगळे, वैदिक वेगळे, आर्य निराळे, द्रविड निराळे, राम-कृष्णाला पुजणारे वेगळे आणि काली-दुर्गेला भजणारे वेगळे असल्याचे ही मंडळी आपल्या विघातक षड्यंत्रांच्या सिद्धीसाठीच सांगत असतात. आताचे अमर्त्य सेन यांचे वक्तव्यही याच मालिकेतील एक भाग.

 

खरे म्हणजे, अमर्त्य सेन यांच्या विधानातून ते कोणाची बाजू घेतात, तेही स्पष्ट होते. काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामाच्या नावाचा उपयोग राज्यात बाहेरून आलेले लोक करतात, असे म्हटले होते. ममतांचा रोख तिथे राहणार्‍या उत्तर प्रदेशी आणि बिहारी लोकांकडे होता. अमर्त्य सेन यांनीही आपल्या बोलण्यातून ममतांच्या याच विधानाला अनुमोदन दिल्याचे स्पष्ट होते. सोबतच इथे मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी हिंदूंंना दूर लोटणार्‍या आक्रस्ताळ्या ममतांमुळे अमर्त्य सेन यांना बुद्धीमांद्य झाल्याचेही दिसते; अन्यथा स्वतःला विद्वान आणि बुद्धीमान समजणारे अमर्त्य सेन स्वतःच्याच मायभूमीचा इतिहास विसरले नसते. वस्तुतः कृत्तीदास ओझा या १४ व्या शतकातल्या कवीने ६०० वर्षांपूर्वीच 'कृत्तीवासी रामायण' नावाने वाल्मिकी रामायणाचे बंगाली भाषेत भाषांतर केलेले आहे. कृत्तीदासांनी आपल्या रामायणात रामाने शक्तीपूजा म्हणजेच देवीची उपासना केल्याचेही लिहिले. विशेष म्हणजे बंगालमधील दुर्गापूजेच्या लोकप्रियतेचा काळही हाच मानला जातो. शिवाय थोर कवी, गीतांजलीकार-नोबेलविजेते रवींद्रनाथ टागोर यांच्यावरही 'कृत्तीवासी रामायणा'चा प्रभाव होता. परंतु, अमर्त्य सेन यांना हा इतिहास माहिती नसावा किंवा आपल्या फुटपाडू धोरणांत त्याची बाधा येत असल्याने त्यांच्या मेंदूने हा इतिहास गाळला असावा. अमर्त्य सेन यांचे आताचे बरळणे हा त्याचाच परिणाम.

 

अमर्त्य सेन यांनी दुर्गापूजा आणि रामनवमी उत्सवाचीही तुलना केली. परंतु, बंगालमध्ये दुर्गापूजा काही माणसाचे पहिले पाऊल पडले तेव्हा तत्काळ सुरू झालेली नाही. जेव्हा-केव्हा तिथे दुर्गापूजा सुरू झाली, त्यावेळी जुन्यापुराण्या माणसांनी आता रामनवमीवरून अमर्त्य सेन ज्या प्रकारची विधाने करतात, तशीच केली असतील का? तसेच रामाने दुर्गापूजा केली आणि आता दुर्गापूजक जर रामनवमी पहिल्यापेक्षा अधिक उत्साहाने साजरी करत असतील तर अमर्त्य सेन यांच्या पोटात का दुखते? अमर्त्य सेन यांना त्यामुळे कसली समस्या भेडसावते की अमर्त्य सेन यांच्या जन्मावेळी जो काळ अस्तित्वात होता, तोच काळ आताही जिथल्या तिथे थांबलेला राहावा, असे त्यांना वाटते? याला बिनडोकपणा नव्हे तर काय म्हणणार? इथे अमर्त्य सेन यांनी आपल्या नातीच्या संदर्भाने केलेल्या विधानाचाही समाचार घेतला पाहिजे. गेल्याच महिन्याच्या अखेरीस 'जय श्रीराम' घोषणा न दिल्याने मुस्लीम युवकाला चोपल्याच्या अफवेवरून दिल्लीच्या चांदनी चौकातील दुर्गामंदिरात धर्मांधांच्या टोळक्याने तोडफोड केली. परंतु, धर्मांधांनी अमर्त्य सेन यांच्या नातीच्या आवडत्या दुर्गादेवीचे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करूनही सेन आजोबांच्या तोंडातून एक शब्दही फुटला नाही. म्हणजेच या लोकांना दुर्गामातेची आठवण कधी येते तर रामाचा अपमान करायचा असतो तेव्हाच. रामायणाची आठवण कधी होते तर हिंदूंंचे हिंसक चित्रण करायचे असते तेव्हाच, हेच यातून स्पष्ट होते.

 

दुसरीकडे 'जय श्रीराम'चा वापर लोकांना हाणामारी करण्यासाठी होत असल्याची भाषाही अमर्त्य सेन यांनी केली. मात्र, 'जय श्रीराम' घोषणेवरून पसरणार्‍या अफवा आणि खोट्या घटनांमुळेच मुस्लिमांचा जमाव हिंदूंवर, पोलिसांवर हल्ल्यासाठी उद्युक्त होत असल्याचे सेनसारख्यांना कळत नाही. अमर्त्य सेन असो वा अन्य कोणी बोलभांड, ही सगळीच मंडळी 'जय श्रीराम' वरून गदारोळ माजवण्याचे हत्यार मुस्लिमांच्या हाती देत आहेत. अशा लोकांच्या निराधार विधानांमुळेच खोट्यानाट्या घटनांनंतरही धर्मांध मुस्लिमांचे जत्थेच्या जत्थे किमान कालावधीत एकत्र येताना दिसतात. म्हणजेच आपल्या विधानांतून, अफवा पसरविण्यातून दंगलखोरांना भडकविण्याचे कामच अमर्त्य सेन यांच्यासारखी माणसे करत असल्याचे दिसते. अर्थातच, देशात सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानेच अमर्त्य सेन यांनी ही विधाने केल्याचे लक्षात येते. आता तर भाजपने बंगालमध्येही चांगलीच मुसंडी मारत ममतांच्या हिंसक आणि भ्रष्ट कारभाराला आव्हान दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत ममतांचे तिथले सिंहासन गडगडणार, हेही निश्चितच! म्हणूनच दिल्लीसह कोलकात्यातही भाजपचे कमळ उमलणार हे पाहून मोदी, संघ व हिंदूद्वेषी अमर्त्य सेन आता 'जय श्रीराम'वरून हिंदूंतच वाद लावण्याचा डाव आखत असावेत. असे म्हणतात की, रामनामाच्या नुसत्या उच्चाराने दगडधोंडेही चक्क पाण्यावर तरंगतात. मात्र, जे दगडही नाहीत अन् धोंडेही नाहीत, असे अमर्त्य सेन यांसारखे विद्वान वा ममतांसारखे विक्षिप्तजन आपल्या 'मर्त्य' बुद्धीच्या प्रभावातून रामनामाच्या जयघोषाला विरोध केल्याने तरणार तर नाहीतच उलट स्वतःच बुडतील, असे वाटते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@