देश बदल रहा है !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2019   
Total Views |


 



विकासाच्या दिशेने आगेकूच करत असणारा भारत पाश्चिमात्त्य राष्ट्रांच्या पंक्तीत क्षेपणास्त्र प्रक्षेपण, वैद्यकीय क्षेत्र, सुरक्षा यांसह इतर क्षेत्रांच्या रूपाने विराजमान झाला आहेच. मात्र, आता भारत सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा वैवाहिक जीवनाबाबतदेखील प्रगल्भ होत असल्याचेच संयुक्त राष्ट्राचा अहवाल नमूद करत आहे.


१५ ऑगस्ट
, १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यावर भारतासमोर अनेकविध आव्हाने उभी ठाकली होती. आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या आव्हानांचा त्यात समावेश होता. त्यात सामाजिक आव्हानेही मोठ्या स्वरूपाची होती. अठरापगड जाती-धर्म यांच्यासह विविधतेने नटलेल्या भारतात सामाजिक एकसंधता साधणे, हे एक मोठे आव्हानच होते. सामाजिक नीतीमूल्य आणि समाजरचनेत विवाह हा एक मोठा घटक असतो.

सुमारे १५० वर्ष भारतावर ब्रिटिशांनी राज्य केल्यावर त्यांच्या काही बाबी या आपल्या सामाजिक रचनेत समाविष्ट होणे स्वाभाविक आहे. मात्र, असे असतानाही भारतीय विवाह परंपरेचे दाखले जगभर देण्यात येत असत. भारतीय स्त्रिया या आपल्या पाल्यांच्या मर्जीशिवाय विवाह करू शकत नाही, असा रिवाज भारतात पाळला जात असे. हा रिवाज किती योग्य, किती अयोग्य हा चर्चेचा विषय आहे. मात्र, यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याबाबत नक्कीच मंथन केले गेले असावे. यामुळे महिलांची प्रगती हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला असावा. या सर्व गोष्टींचा ऊहापोह करण्याचे कारण इतकेच की, नुकताच संयुक्त राष्ट्र संघटनेमार्फत जगातील महिलांची प्रगती २०१९-२० हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार भारतात पारंपरिक विवाह पद्धतीचे प्रमाण घटत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सदर अहवालानुसार भारताच्या शहरी भागात पारंपरिक विवाहांचे प्रमाण घटत असल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. तसेच, भारतातील विवाहेच्छुक हे प्रेमविवाहासाठी आपल्या पालकांची संमती प्राप्त करून घेत विवाह करण्यास प्राधान्य देत असल्याचेदेखील नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या विवाहांना भारतीय समाज प्रोत्साहन देत असल्याने प्रेमविवाहांचे प्रमाण वाढत असून त्यामुळे घरगुती हिंसाचाराचे प्रमाण कमी होत असल्याचेदेखील संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, कुटुंबाशी संबंधित आर्थिक व्यवहार, कुटुंबनियोजन यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींत भारतीय महिलांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले असल्याचेदेखील नमूद करण्यात आले आहे.

भारतात पालकांनी पसंती दर्शविलेल्या तरुणाशी विवाह करण्याची प्रथा आहे. या परंपरेचे पालन भारताच्या काही ग्रामीण भागात होतेदेखील. या पद्धतीनुसार अनेकदा तर तरुणी विवाहाच्या दिवशीच आपल्या होणार्‍या पतीला पाहत. मात्र, भारतीय विवाह पद्धतीत कालपरत्वे बदल होत असून भारतातील शहरी भागांत मुलगा आणि मुलीने पसंत केलेल्या व्यक्तीला पालकांचेदेखील समर्थन मिळत असून अशा विवाहाच्या संख्येतदेखील वृद्धी होत आहे. तसेच, भारतीय तरुण हे प्रेमविवाह करताना आपल्या पालकांचा सल्ला विचारात घेत असल्याचेदेखील हा अहवाल नमूद करतो.



या अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणे प्रेमविवाह किंवा प्रेमाला संमती मिळून होणार्या विवाहांत खर्च, कुटुंबनियोजन किंवा अन्य महत्त्वाच्या निर्णयांत महिलांना तीनपट अधिक विचारात घेतले जात आहे, तर आप्तेष्टांच्या भेटी केव्हा घ्यायच्या, याबाबत त्यांना दुप्पट स्वातंत्र्य असल्याचेदेखील नमूद करण्यात आले आहे. तसेच, जागतिक पटलावरील दक्षिण व पूर्व आशिया, सहारा आफ्रिका आणि उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिया या भागांत विवाह हा सार्वभौमिक आणि सामाजिकदृष्ट्या अनिवार्य असल्याचेदेखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, दक्षिण आशियायी देशातील भारत आणि बांगलादेशमध्ये कायद्याने हुंडा प्रथा बंदी आहे. मात्र, तरीदेखील भारत आणि बांगलादेशसह ‘सार्क’ क्षेत्रात अजूनही हुंडा प्रथा असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.



विकासाच्या दिशेने आगेकूच करत असणारा भारत पाश्चिमात्त्य राष्ट्रांच्या पंक्तीत क्षेपणास्त्र प्रक्षेपण, वैद्यकीय क्षेत्र, सुरक्षा यांसह इतर क्षेत्रांच्या रूपाने विराजमान झाला आहेच. मात्र, आता भारत सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा वैवाहिक जीवनाबाबतदेखील प्रगल्भ होत असल्याचेच हा अहवाल नमूद करत आहे. त्यामुळे शहरी भागात दिसणारे हे बदललेले चित्र ग्रामीण भागातदेखील लवकरच दिसेल, अशी आशा आपण बाळगावयास हरकत नाही. भारतीय स्त्रीला तिच्या मर्जीने विवाह करण्यास कुटुंबव्यवस्थेतून अनुमती मिळत असल्याने खरोखरच देश बदल रहा है, असे म्हणावेसे वाटते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@