तो राजहंस एक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2019   
Total Views |




भारतीय संघात एकापेक्षा एक सुरेख, सरस फलंदाज असताना 'लेझीमॅन' म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोहित शर्माला जागाच शिल्लक राहत नव्हती. ती मिळाली, तेव्हा मात्र तो एक राजहंस असल्याचं कळून चुकलं!

 

"तो फारच आळशी खेळाडू आहे, त्याच्या खेळात सातत्य नाही, तो सुरुवातीला खूप बॉल्स खाऊन फलंदाजी करतो, त्याच्या फलंदाजीत अमक्या खेळाडूसारखी शिस्त नाही, तमक्यासारखी नजाकत नाही..." वगैरे वगैरे तो सलग आठ-दहा वर्षं ऐकत होता. तरीही शांतपणे आपला खेळ सुधारत, फलंदाजीतील उणिवा दूर करण्यासाठी मेहनत घेत तो पुढे वाटचाल करत होता. दरम्यानच्या काळात त्याने अनेकदा अक्षरशः नेत्रदीपक इनिंग्ज खेळून सर्वांना त्याने चकीतही केलं. परंतु, तरीही तो तसा 'नावडता'च राहिला. त्याची पहिली पाच-सात वर्षं तर भारतीय क्रिकेट संघात स्थान पक्कं करण्यातच वाया गेली.

 

२०११ च्या विश्वचषकातूनही त्याला वगळण्यात आलं. त्याच्यामागून आलेले केव्हाच पुढे निघून गेले, संघात 'परमनंट' झाले. तरी हा झगडतच होता. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला सलामीला उतरविण्यात आलं. तिथे तो काहीसा नजरेत भरला. मग हळूहळू तो संघात 'सेट' होऊ लागला. हा प्रवासही त्याच्या फलंदाजीच्या शैलीसारखाच. मग मात्र त्याने धावांचा रतीब घालायला सुरुवात केली. भल्याभल्यांना न झेपलेले विक्रम त्याने करून दाखवले. वनडेमध्ये तीन-तीन द्विशतकं करून दाखवत त्याने सगळ्यांना तोंडात बोटं घालायला लावलं.

 

एवढं होऊनही, तो लोकांची 'पहिली पसंती' काही बनत नव्हता. हेही स्वाभाविकच. कारण त्याच्यासोबत भारतीय संघाचा आणि जगातील 'सर्वोत्कृष्ट फलंदाज' विराट कोहली खेळत होता. त्यामुळे हा अद्याप लोकांच्या दुसर्‍या पसंतीचाच होता. अखेर २०१९ चा वनडे विश्वचषक उजाडला. अगदी पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत त्याने धावांची जणू टांकसाळच उघडली. सातत्य, शिस्त आणि एकाग्रता, शिवाय जोडीला नजाकत या सार्‍या गुणांचं त्याने प्रदर्शनच मांडलं. आठपैकी पाच सामन्यांत तर त्याने थेट शतकंच केली. अखेर त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंच.


 

इतकी वर्षं वेगवेगळी दूषणं ऐकणार्‍या त्याने आता धावांचा डोंगरच नाही, तर अक्षरशः हिमालय पर्वत उभा करून दाखवला. तोही अत्यंत शांतपणे. त्याने ऐकलेली दूषणं या हिमालयाखाली गाडली गेली. त्या हिमालयाच्या शिखरावर आता उरलाय फक्त तो आणि त्याचं बावनकशी, थक्क करणारं यश. त्याचं नाव रोहित गुरुनाथ शर्मा. 'एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख' या काव्यपंक्तीप्रमाणे तो भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत होता, तेव्हा एकापेक्षा एक सुरेख, सरस फलंदाज आपल्याकडे होते. त्यातून या 'लेझीमॅन'ला जागाच शिल्लक राहत नव्हती. ती मिळाली, तेव्हा मात्र लोकांना तो एक राजहंस असल्याचं कळून चुकलं!

 

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने आतापर्यंत ८ डावांत ५ सणसणीत शतकं ठोकली आहेत तर १ अर्धशतक. साखळी फेरीतील सर्व सामने संपले, तेव्हा स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित ८ डावांत ९२.४ च्या सरासरीने ६४७ धावांसह पहिल्या स्थानावर आहे. वनडे विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत रोहित हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे (एकूण ६ शतके प्रत्येकी). शिवाय एका विश्वचषक स्पर्धेत किंबहुना कोणत्याही एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनण्याचा बहुमान रोहितला (५ शतके) मिळाला आहे.



 

भारतीय फलंदाजी म्हणजे विराट कोहली आणि तो बाद झाला की भारतीय संघ संपला, हे गेल्या काही वर्षांतील समीकरण रोहितने या विश्वचषकातील आपल्या अप्रतिम कामगिरीने पार पुसून टाकलं आहे. विराटनेही या स्पर्धेत ५ सलग अर्धशतकं झळकावत उत्तम कामगिरी केली आहेच. परंतु, सलामीवीर रोहितचा खेळच इतका अप्रतिम राहिला की 'वन-डाऊन' उतरणार्‍या विराटला फारशी खळखळ करण्याची गरजच पडली नाही. भारताला क्रमवारीतील पहिल्या स्थानासह रूबाबात उपांत्य फेरीत पोहोचविण्यात रोहित शर्माच्या या अद्भुत कामगिरीचा सिंहाचा वाटा आहे. भारताचा 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा हा रोहित शर्मा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन सध्या करत असून भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्यास रोहित हा 'मालिकावीर' पुरस्काराचा दावेदार ठरेल, यात शंकाच नाही.



 

मुंबईकर असलेल्या ३२ वर्षीय रोहित शर्माचं क्रिकेट मुंबईच्या पारंपरिक क्रिकेटचं पाणी पिऊन वाढलेलं आहे. मुंबईने आतापर्यंत असंख्य जागतिक दर्जाचे खेळाडू घडवले. रोहित शर्मा हे त्यातील एक ताजं प्रकरण. हा फलंदाज खेळायला उतरल्या उतरल्या कधीच मारझोड करत सुटत नाही. संथपणे सुरुवात करत खेळपट्टीवर आधी आपलं बस्तान व्यवस्थितपणे मांडतो. एकदा 'सेट' झाला की, मग मात्र तो जो सुटतो, तो काही थांबत नाही.



 

वनडेत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या खेळाडूंना करता आलेलं द्विशतक त्याने तीनतीनदा करून फारच किरकोळ विषय बनवून टाकला आहे. त्याच्या फलंदाजीची शैलीही देखणी आहे. याच गुणांच्या जोरावर रोहितने आज २१४ एकदिवसीय सामन्यांतील २०८ डावांत ४९.१ च्या सरासरीने ९७६२ धावा केल्या आहेत. उपांत्य आणि अंतिम अशा दोन्ही सामन्यांत त्याची बॅट अशीच चालली तर तो याच स्पर्धेत आपल्या १० हजार धावाही पूर्ण करू शकतो. त्याने आजवर २७ शतकं आणि ४२ अर्धशतकं केली असून तीन द्विशतकं केली आहेत. कसोटीत अजूनही तो काहीसा चाचपडत असला तरी एकदिवसीय आणि 'टी-२०' प्रकारात जगातील आजघडीच्या सर्वोत्तम ५ फलंदाजांची यादी करायची झाली तर विराट कोहलीच्या सोबतीने भारताच्या रोहित शर्माचंही नाव घ्यावं लागतं.



 

एकेकाळी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडणारा रोहित, आता त्याच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे संघात 'सेट' झाला आहे. त्यामुळे त्याला रोखणं सध्यातरी अशक्य दिसत असून आता रोहितची बॅट उपांत्य, अंतिम फेरीतील सामन्यांतही चालली, तर मग विराटसेना विश्वचषकावर पुन्हा एकदा आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरेल, यात काहीच शंका नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@