शौक करावे पुस्तकांचे, व्यसन करावे वाचनाचे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2019   
Total Views |



नाशिक येथील विजय निपाणेकर यांच्याकडे जवळपास 8 ते 10 हजार संदर्भ ग्रंथांचे संकलन आहे. त्यांच्या या ग्रंथप्रेमाबद्दल त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ समोर आपला प्रवास कथन केला.

 

विजय निपाणेकर यांना चाळीसगाव येथे ए. बी. हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना तेथील वाचनालयाचे आकर्षण होते. त्यांच्या या आकर्षणामागे आई अहिल्या यांची प्रेरणा होती. त्यांची आई अशिक्षित असूनदेखील त्यांना पुस्तकांची आवड होती. आई विविध पुस्तके आणावयास पाठवायची व आईच पुस्तकांची नावं सांगायची. अशाप्रकारे वाचनाची आवड निपाणेकर यांच्यात निर्माण झाली. इयत्ता 5 वी पासून वाचनाची सवय लागली. 8 वी पासून वाचन मनन सुरू झाले. यातच निपाणेकर यांना शाळेत अमृतकर नावाचे ग्रंथपाल लाभले. त्यांनी शिक्षक वाचनालयातील पुस्तके देणे सुरू केले. मुख्याध्यापक पी. बी. देशपांडे यांनी शिक्षक वाचनालयातील पुस्तके घेताना निपाणेकर यांना पाहिले असता त्यावेळी निपाणेकरांच्या हातामध्ये ज्योत्स्ना देवधर यांचे ‘घरगंगेच्या काठी’ हे पुस्तक होते. तेव्हा देशपांडे यांनी त्यांची वाचनाची आवड लक्षात घेत निपाणेकर यांना विद्यार्थी वाचनालयाचे काम दिले. त्यामुळे निपाणेकर यांची वाचनाची क्षुधातृप्ती होऊ लागली. त्यानंतर निपाणेकर यांनी डीएड्ला प्रवेश घेतल्यावर त्यांना बाबा आमटे लिखित ‘ज्वाला आणि फुले’ या पुस्तकाची वि. स. खांडेकर लिखित प्रस्तावना भावली. ती प्रस्तावना वाचून निपाणेकर यांना जीवनाची नेमकी दिशा सापडली. त्यानंतर, त्यांनी कुष्ठरोग निर्मूलन या क्षेत्रातच काम करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी 5 वर्ष या कार्याला दिली. धुळे एसटी स्थानकावर पेपरविक्री करताना ‘जला वतन’ हे अमृता प्रीतम यांचे पुस्तक वाचनात आले. त्यानंतर 12 एप्रिल, 1982 रोजी अमृता प्रीतम यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्याच दिवशी अमृता यांचे नाव निपाणेकर यांनी स्वतःच्या हातावर गोंदवून घेतले. अशातच निपाणेकर यांच्या जीवनात पुस्तकांच्या रूपाने अनेक लेखक आले. त्यात ओशो, निकोस काझानजाकीस, नित्शे, फ्रांझ काफ्का, भारत सासणे, जी. ए. कुलकर्णी, कवी ग्रेस आदी लेखकांचा धांडोळा घेत निपाणेकर यांचा जीवनाचा वाचनप्रवास सुरू झाला.

 

शौक करावे पुस्तकांचे, व्यसन करावे वाचनाचे’ या त्यांच्या ब्रीदवाक्यानुसार साधारणत: 30 ते 40 वर्षांपासून निपाणेकर यांच्याकडे 8 ते 10 हजार संदर्भग्रंथांचा संग्रह आहे. त्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथांचा समावेश आहे. या संदर्भग्रंथांमुळे श्रीमंतीचा फील येतो, असे निपाणेकर आवर्जून नमूद करतात. कवी आनंद जोर्वेकर यांना ‘बॉम्बे पोएट्री’ विषयावर एम्. फील करावयाचे होते. ते पुण्याला दिलीप चित्रे यांच्याकडे गेले असता, चित्रे यांनी जोर्वेकर यांना प्रीतीश नंदी यांचे ‘स्ट्रेंजर टाइम’ हे पुस्तक संदर्भासाठी सुचविले. यावेळी जोर्वेकर यांनी पुस्तक कुठे मिळणार याबाबत चित्रे यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा चित्रे यांनी निपाणेकर यांचा संदर्भ दिला व निपाणेकर यांनी त्यांना ते पुस्तक दिले, अशी आठवणदेखील निपाणेकर आवर्जून नमूद करतात. पुस्तकांमुळे अनेक मित्र लाभले आहेत. घरात जेवढी पुस्तके आहेत, त्यातील अनेक पुस्तके ही लोक वाचनासाठी घेऊन जात असतात. पुस्तकांमुळे कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांसारखा मित्र मिळाल्याचे सांगताना निपाणेकर यांचा ऊर अभिमानाने भरून येतो. निपाणेकर यांच्याकडील संदर्भग्रंथाच्या माध्यमातून अनेकांनी पीएच. डी, एम्.फील केले आहे. पुस्तके फिरत असल्याने त्याचा आनंद आहे. पुस्तक परत मिळावे, अशी अपेक्षा नसते. ती समाजात प्रवाही आहेत, याचा आनंद आहे. पुस्तकांमुळे मानसिकदृष्ट्या स्थिरता प्राप्त झाली असल्याचेदेखील निपाणेकर आवर्जून नमूद करतात. वाचता वाचता निपाणेकर यांची लिखाणालादेखील सुरुवात झाली. आजवर त्यांनी 50 पेक्षा जास्त स्वरचित कविता लिहिल्या आहेत. सार्वजनिक वाचनालयाच्या साहित्यिक मेळाव्यात एका मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने प्रभावित होऊन निपाणेकर यांना प्रसिद्ध लेखक वसंत पोतदार यांचे लेखनिक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. आणि याच दरम्यान निपाणेकर यांच्या लेखणीला धार मिळाली व वाचकप्रिय लेखन कसे करायचे, याची शिकवण निपाणेकर यांना मिळाली आणि येथूनच त्यांचा पद्याकडून गद्य लेखनाकडे प्रवास सुरू झाला. त्यानंतर साहित्यिक उत्तम कांबळे यांनी एका वृत्तपत्रात स्तंभलेखनाची संधी त्यांना दिली. त्या माध्यमातून अंधारातील नाशिक, महामार्गावरचे जग, गर्दुल्याचे जग, नाशिक वेश्यावस्ती, नाशिकमधील भिकार्‍यांचे जीवनमान, जागतिक वाङ्मयातील अभिजात ग्रंथ, गोदाकाठचे जीवन या माध्यमातून गोदातीरावरील व्यवसाय दर्शन, लोकांना माहीत नसणारे त्र्यंबक दर्शन, नाशिक जिल्ह्याचे वाइन विश्व, ग्रंथाच्या गावा जावे, यशोगाथा अशा विविध सदरांवर विपुल लेखन केले. आध्यात्माची ओढ निर्माण झाल्याने सप्तशृंगी देवी आणि गुरू शंकर महराज यांच्यावरदेखील निपाणेकर यांनी विपुल लेखन केले आहे.

 

लेखन कार्यातील या योगदानामुळे सावानाचा अ.वा. वर्टी, स्वप्नगंधा पुरस्कार, पुणे येथील नारायण सुर्वे पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार यांसारख्या अनेकविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. संस्कार भारतीच्या माध्यमातून कुसुमताई अभ्यंकर आणि सतीश नाडगौडा यांनीदेखील निपाणेकर यांच्या व्यासंगाची दखल घेतली. संस्कार भारतीच्या वतीने त्यांना स्वरचित कवितेसाठी काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येरवडा जेल, अंध शाळा, आदी ठिकणीदेखील निपाणेकर यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून 30 वर्षे सेवा केली आहे. शिक्षकी पेशात कार्य करताना अध्ययन करतानादेखील त्यांनी मुलांना जगातील प्रख्यात आणि स्फूर्तिदायी व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व उलगडून सांगितले. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासदेखील चालना मिळाली. तसेच, निपाणेकर यांनी महापलिका शाळेतील शिक्षकांचे अनेक वर्ष प्रशिक्षण केले आहे. तसेच ते आजमितीस सेवानिवृत्ती पश्चात महापालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत गुणवत्ता कक्षात कार्यरत आहेत. वाचक अनेक असतात. मात्र, संग्राहक आणि वाचन संस्कृती रुजविणारे विजय निपाणेकर यांच्यासारखे द्रष्टे फार दुर्मीळ असतात. निपाणेकर यांचा वाचनप्रवास असाच समृद्ध होवो, हीच कामना!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@