काश्मिरी तरूणांची माथी भडकावणाऱ्या फुटीरतावाद्यांची मुले मात्र विदेशात स्थायिक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2019
Total Views |




नवी दिल्ली : जम्मू व काश्मीर राज्यातील विशेषतः काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद तसेच, तेथील फुटीरतावाद हा गेल्या अनेक दशकांपासूनची डोकेदुखी होऊन बसला आहे. यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्यामुळे येथील विकासदेखील खुंटला आहे. फुटीरतावादी नेते ‘कश्मीरीयत’च्या नावाने येथील तरूणांची माथी भडकवत त्यांना तोडफोड, दगडफेकीसाठी रस्त्यावर आणत असून यामुळे या शिक्षण-रोजगार व मुख्य प्रवाहापासून भरकटलेल्या या तरूणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे.

 

दुसरीकडे, हे तरूण ज्या नेत्यांमुळे प्रभावित होऊन रस्त्यावर उतरत आहेत, त्या नेत्यांची स्वतःची मुले मात्र चक्क विदेशात स्थायिक होऊन आनंदात जीवन व्यतीत करत आहेत. काश्मीरमधील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १४ फुटीरतावादी नेत्यांची २१ मुले विदेशात शिक्षणासाठी जाऊन तेथेच स्थायिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानेच याबाबतचे सत्य उजेडात आणले आहे. एका इंग्रजी प्रसारमाध्यमाने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकताच याबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, काश्मीरमधील प्रमुख फुटीरतावादी नेत्यांपैकी ९० टक्के नेत्यांची मुले ही विदेशात शिक्षणासाठी जाऊन तेथेच स्थायिक झाली आहेत. यामध्ये हुर्रियत, मुस्लिम लीग, तहरिक-ए-हुर्रियत, दुख्तरान-ए-मिल्लत आदींसह अनेक फुटीरतावादी संघटनांच्या नेत्यांचा समावेश आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सोमवारी राज्यसभेत बोलताना या मुद्द्यावर भाष्य केले होते. एका फुटीरतावादी नेत्याचा मुलगा सौदी अरेबियात काम करत असून तिथे तो महिन्याला तीस लाख रूपये कमावत आहे.असेही शाह यांनी यावेळी सांगितले होते. गृह मंत्रालयाकडे असलेल्या यादीनुसार, काश्मीर खोऱ्यातील १४ प्रमुख फुटीरतावादी नेत्यांचे मुलगा, मुलगी, नातू, नात, जावई, सुना असे २१ जण अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, इराण, तुर्कस्थान, मलेशिया व पाकिस्तानात शिक्षण घेत आहेत किंवा नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. यामध्ये आसिया अंद्राबी, जहूर गिलानी, मीरवाईज उमर फारूख, मोहम्मद युसुफ मीर आदी अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मुलांचा समावेश आहे.

 

नेते तुपाशी, कार्यकर्ते उपाशी...

ज्या फुटीरतावादी नेत्यांमुळे काश्मीर खोरे गेली कित्येक दशके होरपळून निघाले आहे, त्यांच्या पोटची मुले मात्र विदेशात छानछोकीत जगत आहेत. त्यांना या हिंसाचार, अस्थिरतेची झळ बसलेली नाही. दुसरीकडे, या नेत्यांच्या नादी लागलेल्या तरूणांना मात्र शिक्षण, रोजगार, नोकरी-व्यवसायापासून दूर जात हाती दगड घेऊन आपले व आपल्या कुटुंबाचेही आयुष्य उध्वस्त करून घेत आहे.

 

या नेत्यांची मुले, नातेवाईक विदेशात

निसार हुसैन (वहीदत ए इस्लामी), बिलाल लोन, अशरफ सहरई (तहरीक ए हुर्रियत), जी. एम. भट्ट (आमिर ए जमात), आसिया अंद्राबी (दुख्तरान मिल्लत), मोहम्मद शफी रेशी, अशरफ लाया (तहरीक ए हुर्रियत), जहूर गिलानी (तहरीक ए हुर्रियत), मीरवाइज उमर फारूक (हुर्रियत), मोहम्मद युसूफ मीर (मुस्लीम लीग).

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@