राहुल गांधींचा धाडसी निर्णय ; प्रियांका गांधींची पाठराखण

    04-Jul-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडणे हा राहुल गांधींचा धाडसी निर्णय असल्याचे मत प्रियांका गांधी यांनी व्यक्त करत त्यांची पाठराखण केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी ट्विटरवर ट्विट करत राहुल गांधींच्या या निर्णयावर आपले मत व्यक्त केले.

 

"राहुल गांधींसारखं धाडस फारच कमी लोकांकडे असते. मी तुझ्या निर्णयाचा मनापासून आदर करते." असे ट्विट करत प्रियंकांनी राहुल गांधींच्या निर्णयावर अशी भावना व्यक्त केली. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. परंतु पक्षाचे नेते सातत्याने त्यांची समजूत काढत होते आणि राजीनामा परत घेण्याची विनंती करत होते. परंतु राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम राहत बुधवारी ट्विटरवर चार पानांचे पत्र लिहून काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

 
 
 

काँग्रेसच्या चांगल्या भविष्यासाठी काही मोठे आणि कडक निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही राहुल गांधींनी पत्रात नमूद केले. तसेच "काँग्रेससाठी सेवा करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, ज्या पक्षाची मूल्य आणि आदर्शांनी देशाची सेवा केली आहे. मी देश आणि संघटनेचे आभार मानतो. जय हिंद." म्हणत राहुल गांधींनी आपल्या पत्राचा शेवट केला. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat