महाराष्ट्रात 'लेदरबॅक' कासवाचे दुर्मीळ दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2019   
Total Views |


 


महाराष्ट्रातील पहिलाच छायाचित्रीत पुरावा


मुंबई (अक्षय मांडवकर) : महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात 'लेदरबॅक' या जगातील सर्वात मोठ्या सागरी कासवाचा वावर आढळून आला आहे. राज्याच्या समुद्रात या कासवाचे दर्शन होणे, अत्यंत दुर्मीळ घटना मानली जात आहे. महिन्याभरापूर्वी रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना भारदखोल समुद्रकिनाऱ्यानजीक हे कासव दिसले. मच्छीमारांनी या कासवाचे छायाचित्रण 'कांदळवन संरक्षण विभागा'कडे (मॅंग्रोव्ह सेल) पाठवले असून 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'मधील तज्ज्ञ संशोधकांनी याबाबत सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे 'लेदरबॅक' कासवाचा हा महाराष्ट्रातील पहिलाच छायाचित्रीत पुरावा आहे.

 
 

राज्याच्या सागरी परिसंस्थेमध्ये प्रामुख्याने चार समुद्री कासवे आढळतात. यामध्ये 'आॅलिव्ह रिडले', 'ग्रीन सी', 'हाॅक्सबिल' आणि 'लाॅगरहेड' या कासवांचा समावेश होतो. यामधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या दरवर्षी मोठ्या संख्येने कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येतात, तर इतर तीन प्रजातींच्या कासवांचा केवळ वावर आढळतो. मात्र, आता 'लेदरबॅक' प्रजातीच्या कासवाचे दर्शनही राज्याच्या समुद्रामध्ये झाले आहे. सागरी संशोधनाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वाची आहे. कारण, भारतात केवळ अंदमान-निकोबार बेटावर 'लेदरबॅक' प्रजातीची कासवे विणीसाठी येतात. महाराष्ट्रात १९८५ साली मालवणमधील देवबागच्या किनाऱ्यावर साडेचार फूटाचे 'लेदरबॅक' कासव आढळले होते. तशी नोंद 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'कडे (सीएमएफआरआय) आहे. परंतु, त्याचे कोणत्याही प्रकारचे छायाचित्र उपलब्ध नाही. मात्र, जून महिन्यात भारदखोल समुद्रकिनाऱ्यानजीक आढळेल्या 'लेदरबॅक' कासवाचे छायाचित्रण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे 'लेदरबॅक' कासवाचा हा महाराष्ट्रातील पहिलाच छायाचित्रीत पुरावा आहे.

 
 
 

 

मच्छीमार विष्णूदास वाघे व सदानंद चोघले यांना किनाऱ्यापासून १२ किमी अंतरावर 'लेदरबॅक' आढळून आले. दुर्दैवाने ते मासेमारीच्या जाळ्यात अडकले होते. दोन्ही मच्छीमारांनी त्याची जाळ्यातून सुटका करुन पु्न्हा समुद्रात सोडून दिले. हे कासव साधारण चार फूट लांब होते. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी या सर्व घटनेचे छायाचित्रण केले. 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने काही दिवसांपूर्वी दिवेआगर येथे संरक्षित सागरी प्रजातींबाबत जनजागृती अभियान राबविल होते. या अभियानाच्या माध्यमातून झालेल्या जनजागृतीमुळे 'लेदरबॅक' कासवाचे हे छायाचित्रण समोर आले आहे. भारतीय 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत 'लेदरबॅक' कासव प्रथम श्रेणीत संरक्षित आहे. 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून राज्यातील किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये संरक्षित सागरी प्रजातींबाबत जनजागृती अभियान राबविले जात आहे. शिवाय राज्याच्या प्रत्येक किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या सागरी जीवांची माहिती देण्याबाबतही स्थानिकांमध्ये प्रबोधन करण्यात येत आहे.
 
 
जाळे कापून 'लेदरबॅक' कासवाला सोडल्याप्रकरणी आम्ही मच्छीमारांना अनुदान देण्याच्या विचारात आहोत. 'मॅंग्रोव्ह सेल' आणि 'मत्स्यव्यवसाय विभागा'ने संयुक्तपणे सागरी जीवांचा बचाव करणाऱ्या मच्छीमारांना भरपाई देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून यापूर्वी दोन मच्छीमारांना २५ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या माध्यमातून सागरी जीवांबाबत उपयुक्त माहिती मिळत आहे.
 
- एन. वासुदेवन
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मॅंग्रोव्ह सेल
 
 

महाराष्ट्राच्या सागरी परिसंस्थेमध्ये 'लेदरबॅक' कासवाचे दर्शन होणे, ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. फाऊंडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानामुळे स्थानिकांकडून सागरी जीवांबाबत महत्वाची माहिती मिळत आहे. या माहितीच्या संकलनामुळे त्यांच्या संवर्धनाला हातभार लागणार आहे. 'लेदरबॅक'च्या दर्शनामुळे आम्ही अशा घटना, त्यांची वारंवारता आणि त्यांच्या नोंदीबाबत सखोल अभ्यास करण्याच्या तयारीत आहोत.

- हर्षल कर्वे
सागरी संशोधक, मॅंग्रोव्ह फाऊंडेशन


लेदरबॅक कासवाची वैशिष्ट्ये

 

* जगात आढळणाऱ्या सात सागरी कासवांच्या प्रजातींपैकी 'लेदरबॅक' सर्वात मोठे कासव.

 

* साधारण ६ फुटांपर्यंत वाढते. वजन ५०० किलो असते.

 

* या कासवाचे कवच कातडीचे असल्याने त्यास 'लेदरबॅक' असे म्हणतात.

 

* त्यांच्या काळ्या त्वचेवर पांढऱ्या रेषा असून पुढील दोन पर मोठे असतात.

 

* मे ते आॅगस्ट या विणीच्या हंगामात चार ते सहा वेळा अंडी घालतात.

 

* हिंद महासागरातील बर्ड हेड पेनिनसुला, पश्चिम पापुआ, ग्रेट निकोबार आयलॅण्ड याठिकाणी सर्वाधिक घरटी

 

* तर अंदमान, श्रीलंका, नाटाळ आणि दक्षिण आफ्रिकेत तुरळक घरटी

 

* जेलीफिश आणि समुद्री फुलपाखरू (Cymbuliidae) हे प्रमुख खाद्य

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@