समाज उत्थानाचा शिवगोरक्ष आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2019   
Total Views |




राईनपाडा येथे लोकांचा गैरसमज झाला आणि डवरी गोसावी समाजाच्या पाच भिक्षेकरी तरुणांना नाहक जीवाला मुकावे लागले. समाज भिक्षेकरी आहे. पालात राहतो. त्याचे पालातले वास्तव्य संपून त्याच्या हातातील भिक्षेकऱ्यांची झोळी जाऊन ते खऱ्या अर्थाने सुखीसंपन्न, स्वावलंबी बनावे यासाठीचे विचारमंथन समाजातील मान्यवरांनी केले. त्यातूनच मग भटक्या जमाती संघाची स्थापना करण्यात आली.

 

जून 2019 च्या महिन्यातील गोष्ट. विश्वनाथ चव्हाण आणि साजन चव्हाण हे दोघे डवरी गोसावी समाजाचे तरुण. समाजाचे पारंपरिक काम म्हणजे देवधर्माचा जागर करत भिक्षा मागणे, धर्माचे जागरण करणे, भगवी वस्त्र परिधान करून हे दोघे पारंपरिक काम करण्यासाठी तिराई तालुका, रावेर जिल्हा जळगाव येथे गेले. दोघेही 21-22 वर्षांचे तरुण. मूळ मेहदेपूर, तालुका जळगाव, जामोद, बुलढाणा येथले. मात्र, गावात कुणी तरी हूल उठवली की कुणीतरी दोन तरुण भगवी वस्त्रे घालून गावातल्या पोरांना पळवायला आलेत. चहुबाजूंनी लोक गोळा झाले. लोकांचा राग शिगेला पोहोचलेला. या गावातल्या प्रमुखांनी या दोन तरुणांची विचारपूस सुरू केली. तोपर्यंत लोकांची तोबा गर्दी झाली होती. कित्येक लोक म्हणू लागले, कसली चौकशी करता, मारा त्यांना. खरे तर हे दोन तरुण भिक्षा मागण्यासाठीच आलेले. मूल वगैरे पळवण्याचा यांचा सुतराम संबंध नाही. तरीही शेकडो संतापलेल्या गावकऱ्यांना बघून ते घाबरले. राईनपाड्याची घटना त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागली. आपल्यालाही लोक काही गुन्हा नसताना असेच ठेचून मारतील, या विचारांनी हे तरुण गर्भगळीत झाले. राईनपाड्याची घटना होतीही अशीच क्रूर. एका वर्षापूर्वी राईनपाडा हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला होता. भिक्षेकरी समाजाच्या युवकांना पोरं पळवणाऱ्या टोळीचे लोक म्हणून आणि गावकऱ्यांनी डवरी गोसावी समाजाच्या पाच तरुणांना ठेचून मारले होते. हे युवकही भिक्षा मागण्यासाठीच गेले होते. पण केवळ लोकांचा गैरसमज झाला आणि त्या गैरसमजापायी त्या पाच निष्पापांना जीव गमवावा लागला होता. आपलेही असेच होणार, असे त्यांना वाटले. त्याचवेळी गावातील प्रमुख विश्वनाथ आणि साजनला दरडावून विचारू लागला,“सांगा, तुम्ही कुठले?” यावर गयावया करत दोघांनीही आपले मूळगाव, कुठून आलो, कुटुंबाची माहिती दिली. दोघेही प्रमुखाला विनंती करू लागले की, तुम्ही आमच्या घरच्यांशी बोला, वस्तीच्या लोेकांशी बोला, गावच्या ग्रामपंचायतीशी बोला. प्रमुखाने खातरजमा करण्यासाठी या दोघांच्या गावी फोनने संपर्क साधला. तेव्हा दोघे खरे बोलत होते, हे त्यांच्याही लक्षात आले. मात्र, तरीही जमाव त्या दोघांना घेराव घालून उभा होताच. त्यांना सोडण्यास तयार नव्हता.

 

यावेळी दोघांच्या घरातल्यांनी भटक्या जमाती महासंघ म्हणे ‘बीजेएम’शी संपर्क साधला. संघाचे प्रदेशाध्यक्ष भरतकुमार तांबिले आणि डवरी गोसावी समाजाचे आदर्श मच्छिंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. भरतकुमार तांबिले हे समाजसेवक, तर मच्छिंद्र चव्हाण हे सध्या पुणे पोलीसमध्ये असिस्टंट कमिशनर पदावर कार्यरत आहेत. हे दोघेही पालावरचे जगणे जगलेले आहे. ते दु:ख, ती होरपळ त्यांनी भोगलेली होती. राईनपाड्याच्या बळींना न्याय मिळवून देण्यासाठी दोघांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रंदिवस एक केला होता. मरणारी दुर्दैवाने मेली. पण त्यांच्यामागे उरलेल्या कुटुंबीयांच्या नशिबाचे दशावतार संपवावे म्हणून या दोघांनी समाजाला संघटित करून पीडितांच्या कल्याणासाठी यशस्वी प्रयत्न केले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळेच विश्वनाथ आणि साजन चव्हाणच्या कुटुंबीयांनी मोठ्या विश्वासाने भरतकुमार आणि मच्छिंद्र यांना संपर्क केला. हे दोघेही त्यावेळी मुंबईला आणि घटना घडली होती जळगावला. लगेचच निर्णय घेणे गरजेचे होते. या दोघांनी तात्काळ नियोजन केले, निर्णय घेतले. त्यानुसार चक्रे फिरली. पोलिसांची फौज विश्वनाथ आणि साजन जिथे होते तिथे पोहोचली. त्या दोघांना सुरक्षितरीत्या सोडवले. जमावालाही शांत करण्यात आले, तसेच जमावासमोर पुराव्यानिशी सिद्ध केले गेले की, हे दोघे चोर किंवा पोरं पळवणारे नसून भिक्षेकरी समाजाचेच आहेत. त्यामुळे लोकक्षोभ थंडावला. लोक आपापल्या कामाला लागले. या दोघांचा जीव वाचला. याचे सारे श्रेय मच्छिंद्र चव्हाण आणि भरतकुमार तांबिलेसह त्यांच्या सहकाऱ्यांना जाते.

 

रूढ अर्थाने संस्थांची निर्मिती होते, ती समाजकल्याणासाठी किंवा जागृतीसाठी. त्याच आयामावर भटक्या जमाती महासंघ, बीजेएम, काम करत आहे. संघ भटक्या जमातीतील भिक्षेकरी समाजाचे जगणे खऱ्या अर्थाने माणूसपणाचे जगणे बनण्यासाठी काम करतो. संघाचे मार्गदर्शक आणि आदर्श आहेत मच्छिंद्र चव्हाण, तर प्रदेशाध्यक्ष आहेत भरतकुमार तांबिले आणि प्रदेश सचिव आहेत अरविंद गिरी. भरतकुमार सांगतात की, भटके विमुक्त समाजासाठी अनेक सरकारी योजना आहेत. 2014 च्या सत्तांतरानंतर नव्या आलेल्या भाजप सरकारच्या काळात या योजनांची कार्यवाहीही यशस्वीरीत्या करण्यात येत आहे. मात्र, जसे नेहमीच चालते की कोणत्याही गटातील दुबळे आपले हक्क, अधिकार प्राप्त करण्याआधीच त्या गटातील सबळ सक्षम लोक दुबळ्यांचेही हक्क आपल्या पदरात पाडून घेतात. तसेच या भटके विमुक्त समाजासाठीच्या योजनांचे आहे. भटके विमुक्त वर्गामध्ये मोडणाऱ्या आक्रमक जातींनी उपजत आक्रमकपणामुळे आपले हक्क सवलती मिळवल्या. पण त्यांच्या आक्रमकतेपुढे मूळ शांत असणाऱ्या भिक्षेकरी समाजाचे काही चालत नाही. एकतर हा समाज भिक्षा मागत आज इथे उद्या तिथे असतो. पाठीवर विंचवाचे बिर्‍हाड असते. त्यामुळे यांना पक्का ठावठिकाणा नाही. राहण्याचा पत्ता कायमस्वरूपी नाही. त्यामुळे यांच्या नावावर सरकारी कागदपत्रे असणे तसे मुश्किलच. त्यामुळे भटके जमातीमधील भिक्षेकरी समाजाची झोळी कायमच खाली राहिली आहे. अशा 20 भटक्या जातींवर भटक्या जमाती महासंघ काम करतो. उदाहरणार्थ, डवरी गोसावी, गोंधळी, गोपाळ, चित्रकथी, जोशी, बाबा, बैरागी, मसनजोगी नंदीबैल, माकडवाला, आसूडवाला, डोंबारी बहुरूपी, भोपी, वगैरे...

 

भटक्या जमाती महासंघाने फक्त संघच स्थापन केला नाही, तर संघाची उद्दिष्टं ठरवली. साऱ्या उद्दिष्टांचे सार आहे की, जगाच्या चक्रात समाजातील कुणीही मागे राहू नये, प्रत्येकाचा सामाजिक, धार्मिक, आर्थिक, कौटुंबिक आणि वैयक्तिकही सकारात्मक विकास व्हावा. हे सगळे करत असताना समाजाचे कालचे प्रश्न आणि आजचे प्रश्न समजून घेणे गरजेचे होते. हा प्रश्न त्या त्या समाजाकडूनच समजून घेणेही गरजेचे होते. यासाठी संघाने या 20 समाजांतील प्रमुख लोकांना एकत्र केलेे. समाजातील प्रश्नांवर परिसंवादाचे आयोजन केले. यावेळी झाडून सर्व समाजाचे प्रमुख प्रतिनिधी एकत्रित आले. या सर्वांना आधीच सूचित करण्यात आले होते की, परिसंवादामध्ये प्रत्येकाने आपापल्या समाजाचे प्रश्न, सद्य बरीवाईट स्थिती यावर मनोगत मांडायचे आहे. प्रतिनिधींनी हे मनोगत समाजाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्या निष्कर्षाच्या आधारे मांडले. यावेळी संघाने परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून धर्मजागरण मंच पश्चिम महाराष्ट्राचे हेमंत हरहरे यांना बोलावले होते. त्यांच्यासमोर आमच्या 20 समाजांच्या प्रतिनिधिनी समाजाची सद्यस्थिती व प्रश्न मांडले. त्यावरच्या उपाययोजनांवरही चर्चा केली. हरहरे यांनीही समाजाला चांगले मार्गदर्शन केले. त्यांनी आम्हाला समाज उत्थानासाठीच्या सूचना दिल्यात्यामुळे कामाला एक दिशा मिळाली. हा परिसंवाद मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आला होता.

 

परिसंवादाचे आयोजन भव्यच होते. कारण, आयोजकांच्या मते आम्ही भिक्षेकरी समाजातील. जीवन कायमच पालात गेलेले, तेही सगळ्याच वंचितपणाचे दु:ख भोगत. आता परिस्थिती पालटली आहे. समाजातील काही लोक सर्वोच्च पदावर आहेत. तरीही समाजाचे बहुसंख्य लोक पालात, झोपडीत किंवा चाळीत राहतात. त्यामुळे आर्थिक, सामाजिक उच्च स्तरातील लोकांशी बोलताना न्यूनगंड असतोच असतो. हा न्यूनगंड घालवण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन, अशा आलिशान ठिकाणी करण्यात आले. सर्वतोपरी उच्च स्तराच्या जगण्याचा हक्क आपल्यालाही आहे, ही भावना समाजप्रमुखांना व्हावी हे यामागचे कारण. तसेच समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी रा. स्व. संघाचे कोकण प्रांताचे विठ्ठल कांबळे यांनीही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क आणि संवाद साधला होता. यावेळी समाजाचे प्रश्न समजून घेताना कांबळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले होते. त्यानंतर संस्थेच्या कार्याबद्दल माहिती देताना मच्छिंद्र म्हणाले की, स्मार्ट भटक्या जमाती, पालमुक्त भटक्या जमाती, सुशिक्षित भटक्या जमाती, समृद्ध भटक्या जमाती, सुरक्षित भटक्या जमाती, सामाजिक भटक्या जमाती, व्यसनमुक्त भटक्या जमाती, तंटामुक्त भटक्या जमाती, सुदृढ भटक्या जमाती या नऊ संकल्पना घेऊन संस्था काम करते. समाजबांधवाने स्मार्ट असावे म्हणजे कसे? तर त्यांच्याकडे स्वत:ची ओळख दर्शवणारी सर्व कागदपत्रे असावीत. त्यात रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणुकीचे कार्ड आणि जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला वगैरे असायलाच हवा. त्याने पाल सोडून स्थिर घरामध्ये राहायला हवे. व्यसन करून भांडण करता नये, तर त्याने समाजशील असावे. कुठेही समाजबांधव अडचणीत असतील, तर त्याने मदतीला धावून जावे. त्याने शिकून स्वावलंबी होऊन समृद्ध व्हावे यासाठी भटक्या जमाती संघ काम करत आहे.

 

धर्म जागर आणि संस्कृती टिकवणाऱ्या भटके विमुक्त समाजासाठी भटक्या जमाती संघाचे काम खरोखरच मैलाचा दगड आहे. कारण, समाजाचे संख्याबळ कमी असल्याने समाजाला अजूनही म्हणावे तितके प्रतिनिधित्व कुठेही मिळाले नाही. मात्र, भटक्या जमाती संघाच्या रूपाने या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे एक नि:स्वार्थी संघटन उभे राहिले आहे. ही संघटना सहानुभूतीवाल्यांची नाही, तर भटकंतीचे जिणे जगूनही आयुष्यात यशस्वी होणाऱ्या समाजदु:खाची अनुभूती असणाऱ्यांची आहे. या संस्थेला कोणत्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नाही की यांची कोणतीही आक्रमक भूमिका नाही. ही संस्था समाज धर्म आणि संस्कृती समन्वयाचे काम करत आहे.

 

शिरजटा झोळी भगवा वेश

कानन कुंडल, भस्म लिसे,

शिवगोरक्ष आदेश आदेश

 

करणाऱ्या समाजबांधवांच्या उत्थानाचाही आदेश येणाऱ्या काळात पूर्णरूपात नक्कीच येईल. शिवगोरक्ष आदेश आदेश...!

 

रा. स्व. संघ परिवारातील धर्मजागरणाशी भटक्या जमाती महासंघाने संपर्क का साधला असेल? किंवा रा. स्व. संघाच्या विठ्ठल कांबळेंनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी का संवाद साधला असेल? यावर बोलताना भरतकुमार आणि मच्छिंद्र दोघांचेही आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे होते की, भिक्षेकरी समाज हा ऐतिहासिक काळापासून धर्मजागरणाचे आणि धर्मप्रसाराचे काम करणारा समाज आहे. आमची नाळ धर्म-संस्कृती मानणाऱ्यांशीच जुळणार. देवधर्माला, संस्कृतीला नावं ठेवणाऱ्या कोणत्याही संघटनेचे आम्ही समविचारी होऊच शकत नाही. आमच्या धर्माचे काम करणारे कोण आहे?याचा शोध घेतला असता रा. स्व. संघाचे धर्म आणि संस्कृतीबाबतचे काम आम्हाला योग्य वाटते. त्यामुळे हेमंत हरहरे किंवा विठ्ठल कांबळे आम्हाला आमच्या घरातील बंधूच वाटतात.

 

(संपर्क : भरतकुमार तांबिले - 9594845999)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@