भान असू दे भारतीयत्वाचे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2019   
Total Views |



बेशिस्तपणा, वेळा न पाळणे, जिथे-तिथे कचरा फेकणे हे जणू भारतीयांच्या डीएनएमध्येच. आपल्या देशातही खरंतर हे सगळे बेकायदेशीर, दंडात्मक कारवाईयोग्य असले तरी त्याची इतर देशांप्रमाणे कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या या गचाळ सवयी विदेशातही पर्यटक म्हणून निदर्शनास येतात.

 

अतिथी देवो भवच्या संस्कृतीचे देशात दाखले देणारे काही भारतीय मात्र इतर देशांत पर्यटक म्हणून वावरताना ताळतंत्र सोडून वागताना आढळतात. याचाच प्रत्यय नुकत्याच समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आला. बालीच्या एका हॉटेलमधून एक भारतीय कुटुंब चक्क हॉटेलची भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, टॉवेल्स लंपास करताना रंगेहाथ पकडले गेले. हॉटेलमधून निघण्याच्या तयारीत असताना कर्मचाऱ्यांनी चक्क त्यांच्या सामानाची झाडाझडती घेतली आणि हे चोरलेले घबाड समोर आले. पण, या भारतीय कुटुंबाला पैशाचा भारी माज. “आम्हाला जाऊ द्या, आमचे विमान चुकेल, आम्ही तुम्हाला या सामानाची भरपाई करतो,” वगैरे अरेरावीची आणि उद्दाम भाषा त्यांनी वापरली. पण, हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांचे काहीएक न ऐकता त्यांच्याकडून हॉटेलमधील चोरलेले सगळे सामान जप्त केले. एकंदरीत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातून त्या पर्यटकांची छी-थू तर झालीच, शिवाय भारतीयांची ‘चोर’ अशी प्रतिमाही नाहक रंगवण्याची अनेकांना संधी मिळाली. खरंतर हा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाही, पण आजच्या समाजमाध्यमांच्या जगात अशा गोष्टी व्हायरल व्हायला तसूभरही वेळ लागत नसल्यामुळे भारतीयांवर तोंडसुख घ्यायला अशी अनेक तोंडं सरसावली. त्यामुळे भारतीय पर्यटकांनी परदेशात गेल्यावर अशी दुष्कृत्ये करून आपण आपल्यासोबत आपल्या देशाच्या नावालाही कलंक लावत आहोत, याचे भान बाळगणे अत्यावश्यक आहे.

 

बेशिस्तपणा, वेळा न पाळणे, जिथे-तिथे कचरा फेकणे हे जणू भारतीयांच्या डीएनएमध्येच. आपल्या देशातही खरंतर हे सगळे बेकायदेशीर, दंडात्मक कारवाईयोग्य असले तरी त्याची इतर देशांप्रमाणे कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या या गचाळ सवयी विदेशातही पर्यटक म्हणून निदर्शनास येतात. त्यातही पर्यटकांना त्या-त्या देशाचे कायदेकानून तपशीलवार समजावले जातात. जसे की, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कचरा टाकू नये, धूम्रपान निषिद्ध वगैरे वगैरे... त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचे उल्लंघन करणारे प्रकार क्वचित घडत असले तरी किमान परदेशी कायद्यांचा एक धाक कायम असतो. पण, हॉटेलमधून चोरी केल्यावर हॉटेल प्रशासनाला ते समजणारच नाही, या आविर्भावात वावरणे महामूर्खपणाचे म्हणावे लागेल. कारण, विदेशीच काय, भारतीय हॉटेलमध्येही ‘चेक आऊट’ केल्यानंतर तुम्ही वास्तव्यास असलेल्या रूमची संपूर्ण झाडाझडती घेतली जाते. संबंधित पाहुण्यांनी काही लंपास तर केले नाही ना, याची रीतसर तपासणी केली जाते. काही संशयास्पद आढळल्यास, गहाळ वस्तूची किंमतही तुमच्याच बिलात समाविष्ट करून तुम्हाला मोजावी लागतेच. पण, बालीला भारतीय पर्यटकांनी लाजलज्जा सोडून एक-दोन नव्हे, तर बऱ्याच वस्तूंवर हातसफाई केली, ज्याबद्दल त्यांना ना खंत ना खेद!

 

भारतीय पर्यटकांच्या अशाच बेमुवर्तखोर वागणुकीमुळे परदेशातही भारतीय पर्यटकांकडे फारसे मानसन्मानाने बघितले जात नाही, हे खेदाने नमूद करावे लागेल. याचा प्रत्यक्ष अनुभव थायलंडला गेल्यावरही आलाच. फुटपाथ सोडून भर रस्त्यावरून चालणे, विमानतळावरही एसटीत जागा पकडण्यासारखी धडपड करणे वगैरे त्यापैकी काही वानगीदाखल बेशिस्तीची उदाहरणे देता येतील. म्हणूनच काही ठिकाणी चक्क भारतीय पर्यटकांसाठी स्वतंत्र नियमावली वगैरेही हॉटेल्सकडून तयार करण्यात येते. त्यामुळे पर्यटक म्हणून जगाच्या पाठीवर फिरताना आपल्याला इथे कोण ओळखतं, आपण तर फ्री बर्ड वगैरे भावनांना जरा आवर घालावा. कारण, तुम्ही नुसते पर्यटक नाही, तर ‘भारतीय पर्यटक’ आहात, याचे भान कायम असू द्या. आपल्या अशा लाजिरवाण्या कृतीमुळे संपूर्ण देशालाच कोणी ‘चोर’ म्हणून हिणवणार असेल, तर अशा लोकांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी अतिशय रास्तच म्हणावी लागेल. त्याशिवाय या बेशिस्तीला लगाम घालता येणार नाही. परराष्ट्र मंत्रालयानेही यासंबंधीची नियमावली कडक करून परदेशी जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना याची पूर्वकल्पना द्यायलाच हवी. खरं तर हा प्रश्न कायद्याचा नाही, तर नैतिकतेचा आणि मूल्यांचा आहे. त्यामुळे ज्या भारतीय संस्कृतीला या नैतिक मूल्यांच्या आधारे जगाच्या पाठीवर नावलौकीक प्राप्त झाले, त्याला क्षुल्लक हव्यासापोटी असे धुळीस मिळवू नये. आपल्या देशाची प्रतिष्ठा, प्रतिमा ही आपल्याच हाती आहे. आपल्याच वर्तनावरून देशाच्या चारित्र्यावरही शिक्कामोर्तब होत असते, याचे परदेशात ‘भारतीय पर्यटक’ म्हणून वावरताना कायम स्मरण ठेवावे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@