मेहबूबा मुफ्ती, एवढा आक्रस्ताळेपणा कशासाठी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2019   
Total Views |



मेहबूबा मुफ्ती म्हणतात, "काश्मीरला विशेष दर्जा देणारे 'कलम ३५ अ' आणि 'कलम ३७०' यांना धक्का लावल्यास एखादा बॉम्ब शिलगावल्यासारखे ते ठरेल. 'कलम ३५ अ' रद्द करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास हाहाकार माजेल." त्यांचे हे वक्तव्य आक्रस्ताळेपणाचेच म्हणावे लागेल.

 

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव दलाच्या जादा १०० तुकड्या तैनात करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर या मुद्द्यावरून काश्मीर खोर्‍यातील वातावरण पेटविण्याचे प्रयत्न मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांनी चालविल्याचे दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना करण्याचा भारत सरकारला पूर्ण अधिकार असल्याचा विसर या नेत्यांना पडला असल्याने वा त्याकडे ते दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्याकडून शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, त्यांचे पिताश्री फारूक अब्दुल्ला आदी मंडळींना, काश्मीर ही आपलीच जहागीर वाटत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने काही पाऊल उचलले की लगेच या नेत्यांचा थयथयाट सुरू होत असल्याचे दिसून येते.

 

जम्मू-काश्मीरमध्ये द्वेष पसरविण्याचे आणि तेथील विकासकार्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमातून स्पष्ट केले असले तरी, काश्मीर खोर्‍यातील नेत्यांना, द्वेषाच्या राजकारणातच रस असल्याचे, त्यांच्याकडून जी वक्तव्ये होत आहेत, त्यावरून दिसून येते. काश्मीरमधील दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. दहशतवाद्यांना मदत करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. पण, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राकडून नुकतीच जी उपाययोजना केली, त्याचे आपल्या परीने अर्थ लावून काश्मीर खोर्‍यातील लोकांना भडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी, काश्मीरमध्ये केंद्राने सुरक्षा दलाच्या जादा १०० कंपन्या तैनात करण्याचा संबंध 'कलम ३५ अ' आणि 'कलम ३७०' शी जोडला.

 

काश्मीरला विशेष दर्जा देणारी ही कलमे रद्द व्हायलाच हवीत, असा भाजपचा निर्धार असल्याचे जगजाहीर आहे. भारतीय जनसंघापासून या भूमिकेचा पाठपुरावा केला जात आहे. भारतीय जनता पक्षाची ही भूमिका काही लपून राहिलेली नाही. ही कलमे रद्द व्हावीत, यादृष्टीने तो पक्ष पाठपुरावाही करीत आहे. पण, मेहबूबा मुफ्ती यांनी, सरकारला तातडीने ही कलमे रद्द करायची असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून केंद्राने राज्यात जादा शंभर कंपन्या धाडल्या असल्याचा अर्थ त्यातून काढला आहे. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी असे अर्थ लावणे मेहबूबा मुफ्ती यांना भागच आहे.

 

मेहबूबा मुफ्ती केवळ एवढे बोलूनच थांबल्या नाहीत तर त्याही पुढे जाऊन त्या म्हणतात, "काश्मीरला विशेष दर्जा देणारे 'कलम ३५ अ' आणि 'कलम ३७०' यांना धक्का लावल्यास एखादा बॉम्ब शिलगावल्यासारखे ते ठरेल. 'कलम ३५ अ' रद्द करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास हाहाकार माजेल." मेहबूबा मुफ्ती यांचे हे वक्तव्य आक्रस्ताळेपणाचेच म्हणावे लागेल. काश्मीरमधील दहशतवादाचा बीमोड करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार अनेक उपाय योजत आहे. त्याचे दृश्य परिणाम दिसत आहेत. अमरनाथ यात्रा सुरळीतपणे सुरू आहे. त्या यात्रेत यंदा नेहमीपेक्षा मोठ्या संख्येने यात्रेकरू सहभागी झाले आहेत. १५ ऑगस्ट रोजी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी या यात्रेची सांगता होत आहे.

 

पुढील महिन्यात येणारा स्वातंत्र्यदिन लक्षात घेऊन त्या दरम्यान, फुटीरतावाद्यांना हाताशी धरून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी काही आगळीक करू नये, म्हणून तेथे जादा कुमक पाठविण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्याचा संबंध एकदम 'कलम ३५ अ' आणि 'कलम ३७०' रद्द करण्याशी मेहबूबा मुफ्ती यांनी जोडला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावरून परत आल्यानंतर केंद्राने ही कृती केल्याने, त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. काश्मीर खोर्‍यातील स्वातंत्र्यदिन समारंभांना गालबोट लावण्यासाठी दहशतवाद्यांचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यांना काश्मीर खोर्‍यातील फुटीरतावादी नेते हातभार लावत असतात, हे काही लपून राहिलेले नाही. हे लक्षात घेऊन 'आयएसआय'चे मनसुबे उधळून लावण्यासाठी केंद्राने ही कृती केली असेल तर काश्मीर खोर्‍यातील नेत्यांनी त्याचे स्वागतच करायला हवे.

 

जम्मू-काश्मीरमध्ये, तेथील मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाने काढून घेतल्यानंतर २० जून, २०१८ पासून तेथे राज्यपाल राजवट जारी करण्यात आली आहे. त्यास अलीकडेच सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी तेथे विधानसभा निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. आता तेथे या निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय राजकीय पक्ष, राज्य आणि केंद्र सरकार यांच्याशी चर्चा करून आणि अमरनाथयात्रा पार पडल्यानंतर घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी जे वक्तव्य केले ते आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेऊन तर केले नसेल ना?

 

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने जम्मू - काश्मीरमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांची एक तातडीची बैठक आज, मंगळवारी नवी दिल्लीत बोलावली आहे. त्यावरूनही राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. विधानसभा निवडणुकांपासून 'कलम ३५ अ' आणि '३७० कलमा'शी त्याचा संबंध जोडला जात आहे. ती बैठक नेमकी कशासाठी योजण्यात आली, ते सर्वांसमोर येईलच. ओमर अब्दुल्ला, त्यांचे पिता फारूख अब्दुल्ला यांनी 'कलम ३५ अ' आणि 'कलम ३७०' वरून या आधीच बराच आरडाओरडा केला आहे. "त्या कलमांना हात लावाल तर काश्मीरचा भारताशी संबंध संपेल," असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्या भूमिकेपासून त्यांनी माघार घेतल्याचे दिसत नाही. 'कलम ३५ अ' संदर्भातील सात याचिका सध्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयापुढे आहेत. त्याचा निकाल लागलेला नाही. असे असतानाही जादा कुमक पाठविण्याचा संबंध 'कलम ३५ अ' शी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.

 

"जम्मू-काश्मीरमधील जनतेची राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होण्याची इच्छा असल्याचे आणि बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्ब यांच्यापेक्षा विकासाची ताकद भक्कम असते," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. "काश्मीर समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू आहेत," असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी अलीकडेच कठुआ येथे बोलताना सांगितले. पण, त्याचवेळी या प्रयत्नात मोडता घालणार्‍यांना त्यांनी जो इशारा दिला, तोही या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले, ''चर्चेद्वारे प्रश्न सुटणार नसेल, तर तो कसा सोडवायचा याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. मी हे जे काही बोलतो आहे, ते अत्यंत जबाबदारीने बोलत आहे."

 

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सर्वसामान्य व्हावी, तेथील दहशतवादाचा पूर्णपणे बीमोड व्हावा, काश्मीर खोर्‍यातील जनता राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हावी यासाठी सरकारचे विविध प्रकारे प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून त्या राज्यात जादा शंभर कंपन्या तैनात केल्या आहेत. मात्र त्यावरून जे आकांडतांडव करीत आहेत, अशा सगळ्यांची नियत साफ नसल्याचेच म्हणता येईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@