‘महानायक सावरकर’ : लोकमान्य सेवा संघातर्फे लोकमान्य शताब्दी व्याख्यानमाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2019
Total Views |





मुंबई : विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या गणेशोत्सवाच्या शताब्दीनिमित्त ऑगस्ट, २०१९ ते जुलै, २०२० या वर्षभराच्या कालावधीत ‘लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याला विविध विषयांवर त्या विषयातील तज्ज्ञ, विद्वान व विचारवंत वक्त्यांना संघातर्फे आमंत्रित करण्यात येणार आहे.

 

प्रत्येक महिन्याला एक व्याख्यान, मुलाखत, चर्चासत्र अथवा दोन दिवसांचे लिटफेस्ट, टेकफेस्ट, आर्टफेस्ट किंवा थिएटरफेस्ट असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम यातून सादर केले जाणार असून सजग-सुजाण, चिंतनशील नागरिक, वाचक व श्रोत्यांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. या मालिकेतील पहिला कार्यक्रम शनिवार, दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता सादर होणार असून ‘महानायक सावरकर’ या विषयावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याचे अभ्यासक, लेखक अक्षय जोग हे आपले विचार मांडणार आहेत. तसेच, यावेळी अक्षय जोग यांनी लिहिलेल्या ‘सावरकर : आक्षेप आणि वास्तव’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांचे हस्ते होणार आहे.

 

सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर आणि पुस्तकाचे प्रकाशक सात्यकी सावरकर आदी मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार असून लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. लोकमान्य सेवा संघाच्या या विशेष प्रकल्पाला जगभरातील गुणग्राहक श्रोते आणि सजग, साक्षर कांनी उत्तम प्रतिसाद द्यावा, असे आवाहन संघाच्या डॉ. रश्मी फडणवीस व महेश काळे यांनी केले आहे.

 

दै. ‘मुंबई तरूण भारत’ लो. से. संघाच्या या मालिकेमध्ये ‘मीडिया पार्टनर’ म्हणून सहभागी होणार आहे. तसेच, मुंबई तरूण भारतचे वेबपोर्टल अर्थात, महाएमटीबीतर्फे या मालिकेतील वर्षभरातील कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपणही वेबसाईट, युट्युब व फेसबुक पेजवरून करण्यात येणार आहे. यामुळे जगभरातील श्रोते-रसिकांना या कार्यक्रमांचा आस्वाद घेणे शक्य होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@