उलट्या बोंबा मारण्याचा प्रकार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2019
Total Views |
 


पवारांनी आमदारांच्या पक्ष सोडण्यासाठी भाजपला वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरणे, त्याला सत्तेचा गैरवापर म्हणणे, हा उलट्या बोंबा मारण्याचाच प्रकार. उलट या घडामोडींचे वर्णन 'जे पेरले ते उगवले' पासून 'जसे कराल तसे भराल' या शब्दांतच केले पाहिजे. कारण, पवारांचे राजकारणच फोडाफोडी शब्दाने सुरू होते आणि आता तिथेच संपतानाही दिसते.

 

आयुष्यभर घरफोड्या करूनच आपला मतलब साधणार्‍याने स्वतःवर मात्र तशी वेळ आली की नैतिकतेवर प्रवचन झोडायचे, हे कोणी, कधीतरी खपवून घेईल काय? उलट वेगवेगळ्या प्रकारच्या, नेमक्या-शेलक्या विशेषणांनी, वाक्प्रचारांनी संबंधित व्यक्तीची शोभाच करेल ना? सध्या अशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची झाल्याचे दिसते. पवारांनी नुकतेच राज्यातील पक्षांतरावर, "सत्ताधारी भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असून त्यामुळे आघाडीतील अनेक नेते पक्षांतर करत आहेत. मात्र, हा सत्तेचा गैरवापर असून अशाप्रकारे सत्तेचा गैरवापर मी आजवर कधीही पाहिलेला नाही," अशी टीका करत, "पक्षातील आमदार पक्ष सोडून गेले तरी त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही.

 

कारण, यापूर्वी मी 'सहाचे साठ' आमदार करून दाखविले होते," असे भाष्य केले. खरे म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाच्या संध्यासमयी त्यांनीच जमवलेले एक एक पाठीराखे-समर्थक 'साहेबां'ना सोडून जात आहेत, ही शोकांतिकाच. मात्र, पवारांनी आमदारांच्या पक्ष सोडण्यासाठी भाजपला वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरणे, त्याला सत्तेचा गैरवापर म्हणणे, हा उलट्या बोंबा मारण्याचाच प्रकार. उलट या घडामोडींचे वर्णन 'जे पेरले ते उगवले' पासून 'जसे कराल तसे भराल' या शब्दांतच केले पाहिजे. कारण, पवारांचे राजकारणच फोडाफोडी शब्दाने सुरू होते आणि आता तिथेच संपतानाही दिसते.

 

आज पवार आपल्या नेत्या-कार्यकर्त्यांच्या पक्षसोडीवरून सत्ताधार्‍यांना म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरताना दिसतात. पण, याला पवारांचेच राजकारण कारणीभूत आहे. कारण मतदारांनी कोणताही जनादेश दिला, तरी त्याला धाब्यावर बसवून कोलांटउड्या मारण्याची, सतत सत्तेत राहण्याची मानसिकता पवारांनीच जोपासली. आपल्यामागे येणार्‍यांनाही पवारांनी हीच सवय लावली. बरं, पवारांनी जी काही सत्ता मिळवली, ती काही एक एक माणूस आयुष्यभर जोडून नव्हे तर कोणीतरी जोडलेली माणसे फोडूनच. आता आपणच जी सत्तास्वप्ने आपल्या ठिकठिकाणच्या मोहर्‍यांना दाखवली, तीच पुरी करण्यासाठी ही मंडळी दुसरीकडे जात असतील, तर त्यात पवारांना गैर वाटण्यासारखे काय? उलट ही सगळीच माणसे इतकी वर्षे ज्यांच्या मंत्राने वागत आली, तोच मंत्र आजही अमलात आणताना दिसतील.

 

तो मंत्र अर्थातच पवारांनीच दिलेला होता-सत्तेचा, पदाचा, अधिकाराचा आणि हे सर्व मिळवण्यासाठी सर्वच प्रकारच्या मर्यादा ओलांडण्याचा! म्हणून पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या वा भाजपच्या नावाने शंख करण्यापेक्षा एकदा स्वतःच्याच अर्धशतकाच्या राजकीय कारकिर्दीचे परीक्षण करावे. आपण ज्या खेळी, डावपेच इतरांना नामोहरम करण्यासाठी भूतकाळात वापरल्या, तेच आता आपल्याबाबतही घडत असल्याचे पवारांना यातून उलगडेल. आपण नैतिकतेसाठी वा निष्ठेसाठी वा तत्त्वासाठी तेव्हा नेत्यांची-आमदारांची फोडाफोडी न केल्याचे ज्ञानही पवारांना यातूनच मिळेल.

 

१९७८ साली राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार खुर्चीवर बसले तेच मुळी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून! तेव्हापासून सुरू झालेला पवारांचा हा फोडाफोडीचा, अविश्वासाचा सिलसिला पुढे चार दशके चालला. अन्य पक्षांतील मतभेद-बेबनावातून स्वतःच्या पक्षवाढीसाठी संधी शोधायची, दुसर्‍या पक्षातील आमदार, नेते, कार्यकर्ते हेरायचे, सत्तेची-पदाची लालूच दाखवून गळ टाकायचे आणि त्यांना आपल्या नेतृत्वाखाली आणायचे, हाच खेळ पवार कायम करत आले. राजकारणातील बाराखडी शिकणार्‍याचे नेतृत्व इतरांनी आकाराला आणायचे आणि पवारांनी ही दुसर्‍याची मुले आपल्या मांडीवर ओढून घ्यायची, हा उद्योग सर्वांनीच पाहिला.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि शिवसैनिक हा त्याचा उत्तम नमुना. छगन भुजबळांना डझनभर आमदारांसह शिवसेनेतून फोडले तेव्हा पवारांचा प्रत्येक दिवस सत्तेच्या कैफात धुंद झालेला होता ना? तद्नंतर सत्तेचा मुकुट आपल्याच माथी असावा म्हणून मधुकर पिचड, गणेश नाईक, भास्कर जाधव, आनंद परांजपे, नवाब मलिक, गोविंदराव आदिक यांच्यापासून ते आताच्या अमोल कोल्हेंपर्यंतची मंडळी पवारांनी इतर सर्वच पक्षांच्या फोडाफोडीतूनच गोळा केली. हे तर काहीच नाही, भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडेंना आपल्या पक्षात खेचण्याचे कामही पवारांनीच करून दाखवले होते. तेव्हा शिवसेना फोडून बाळासाहेब ठाकरे आणि धनंजय मुंडेंना आपल्या गोटात आणताना गोपीनाथ मुंडेंना दुखावून पवारांनी आसुरी आनंदच मिळवला होता ना? आता तेच स्वकर्तृत्वाचे प्रयोग स्वतःवर होत असल्याचे पाहून मात्र पवारांना सत्तेचा गैरवापर आठवला! मग पवारांनी इतकी वर्षे जे केले तो कसला वापर होता? गैरच ना?

 

"आमदार गेले तरी फरक पडत नाही. मी सहाचे साठ करून दाखवले होते," असेही पवारांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. पवारांचेही बरोबरच आहे म्हणा. १९८० साली पवारांनी स्वपक्षाचे ६० आमदार निवडून आणले, पण १५ दिवसांतच त्या '६० चे ६' झाले (साहेबांच्याच फोडाफोडीच्या मंत्राला अनुसरून). नंतर १९८५ साली पवारांनी पुन्हा '६ चे ६०' करून दाखवले, हेही खरेच. पण पुढे काय? पवारांचे घोडे ६० वरच अडले? त्या ६० चे रूपांतर कधी एकहाती सत्तेत का झाले नाही? सोबतच १९९९ साली शरद पवार, तारिक अन्वर आणि पूर्णो संगमांनी एकत्र येत स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या 'राष्ट्रीय' पक्षाला दोन आकडी खासदारांना तरी का कधी निवडून आणता आले नाही? आज तर पवारांच्या पक्षाची अवस्था अतिशय दारुण असून समोर भाजपचे आव्हान आहे. हा तोच भाजप आहे, ज्यांनी दोन खासदारांवरून सुरुवात केली आणि आज ३०३ खासदारांचा पल्ला गाठला. त्यामुळे पवारांनी '६ चे ६०' करण्याचे सांगण्यात अभिमानास्पद असे काहीही नाही.

 

दुसरी गोष्ट म्हणजे जर आमदारांनी पक्ष सोडण्याने पवारांना फरक पडत नसेल तर मग त्यावरून ते भाजपवर आगपाखड का करत आहेत? म्हणजेच फरक पडतोय, पडलाय, पण उसने अवसान आणून जणू काही झालेच नाही, असे दाखविण्याचा प्रयत्न तर यातून पवार करत नसतील ना? अर्थातच असे करण्याशिवाय पवारांकडे दुसरा पर्याय तरी कोणता शिल्लक आहे? कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी बेटकुळ्या फुगवून दाखवाव्याच लागतील ना? पण यातून साध्य काय होणार? कारण जनतेच्या मनातून तर पक्ष केव्हाचाच उतरला आहे आणि हाच तर आजच्या राजकारणात, सत्ताकारणात पडलेला मोठा फरक आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@