चांद्रयान-२ ही देशातील युवकांसाठी प्रेरणा : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2019
Total Views |




नवी दिल्ली : 'चांद्रयान-२' मोहिमेने आमचे वैज्ञानिक सर्वश्रेष्ठ आहेत, जागतिक दर्जाचे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ही मोहीम देशातील युवकांना विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनासाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आकाशवाणीवरून 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशावासियांशी संवाद साधताना ते बोलत होते.

 

या संवादात त्यांनी भारताने अंतराळ संशोधनात केलेली अभिमानास्पद प्रगती, जल संरक्षण व व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान, काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्था व विकास, देशातील काही ठिकाणची पूरपरिस्थिती व मदतकार्य आदी अनेक विषयांवर भाष्य केले. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात, इस्रोच्या 'चांद्रयान-२' मोहिमेचे विशेष कौतुक करताना ते म्हणाले की, २०१९ हे वर्ष भारताच्या अंतराळ संशोधनातील प्रगतीसाठी खूपच चांगले ठरले आहे.



 

मार्च महिन्यात आपल्या शास्त्रज्ञांनी '-सॅट' उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले आणि आता चांद्रयान-२ मोहीम यशस्वी केली. चांद्रयान-२ च्या उड्डाणाची छायाचित्रे पाहून देशवासियांची छाती अभिमानाने फुलून आल्याचे ते म्हणाले. मोदी पुढे म्हणाले की, चांद्रयान-२ मोहिमेतून मला स्वतःला फेथ आणि फिअरलेसनेस अर्थात विश्वास आणि निर्भयता या दोन गोष्टी शिकायला मिळाल्या. चांद्रयान-२ ही मोहीम पूर्णपणे स्वदेशी पद्धतीची असून आमचे वैज्ञानिक सर्वश्रेष्ठ, जागतिक दर्जाचे आहेत, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे मोदी म्हणाले.


 

ज्या पद्धतीने आमच्या शास्त्रज्ञांनी विक्रमी वेळेत रात्रीचा दिवस करून, सर्व तांत्रिक प्रश्न सोडवून चांद्रयान-२ अवकाशात प्रक्षेपित केले, हे केवळ अभूतपूर्व आहे. वैज्ञानिकांची ही महान तपश्चर्या सर्व जगणे पाहिली असून ही आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. विज्ञान हाच विकासाचा मार्ग असून चांद्रयान-२ मोहीम देशभरातील युवकांना नाविन्यपूर्ण संशोधनासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.


 

'स्वच्छ भारत' मोहिमेबाबत..

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वच्छतेच्या बाबतीत आपण आदर्श स्थिती प्राप्त केली आहे, असे मुळीच नाही. परंतु, हागणदारीमुक्त गाव, सार्वजनिक स्थळांची स्वच्छता इ. बाबतीत आपण जे यश मिळवले आहे ती देशातील १३० कोटी जनतेच्या संकल्पाची शक्ती आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेतील नोकरी सोडून मायभूमीच्या सेवेसाठी भारतात परतलेले अभियंते योगेश सैनी यांचे विशेष अभिनंदन केले. सैनी यांनी आपल्या टीमसह दिल्लीला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याकरिता कौतुकास्पद काम केले आहे.


 

बाहेर पडा, सृष्टीसौंदर्य अनुभवा!

श्रावण महिना लवकरच सुरू होत असून या काळात भारतातील अनेक भागांत निसाग्राचे सौंदर्य पाहायला मिळते. आपल्या देशाचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि आपल्या देशातल्या लोकांची भावना समजून घेण्यासाठी पर्यटन आणि तीर्थयात्रा यापेक्षा मोठा शिक्षक नाही.हिरवाईचा शालू पांघरलेली धरती, वाहते झरे आणि कूजन करणारे पक्षी इ. निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी कुटुंबीयांसोबत बाहेर पडा, देशभरात प्रवास करा, असेही आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. यातून श्रावणाचा हा महिना आपल्यामध्ये नवी उर्जा, आशा आणि उमेद निर्माण करेल, असे मोदी म्हणाले.

.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@