केवळ चांगल्या लोकांनाच पक्षात प्रवेश : मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2019
Total Views |



नागपूर : सरकार सत्तेचा वापर आमदार फोडण्यासाठी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावत शरद पवारांनी आत्मचिंतनाची गरज असल्याचा टोला त्यांना लगावला आहे. आम्ही सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी करत असून आमदार फोडण्यासाठी करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या लोकांनाच पक्षामध्ये संधी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नागपूरात एका कार्यक्रमादरम्यान, पवारांच्या आरोपावर प्रतिक्रीया देताना ते बोलत होते.



 

मुख्यमंत्री म्हणाले, "शरद पवार यांना आता आत्मचिंतनाची गरज आहे. आमदार फोडण्यासाठी आम्ही सत्तेचा वापर कधीही केला नाही, चांगल्या लोकांनाच केवळ भाजपत प्रवेश दिला जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. मात्र, आम्ही सर्वांनाच पक्षात प्रवेश देणार नाही, काही निवडक चांगल्या जणांचा प्रवेश दिला जाईल. ईडी किंवा कोणत्याही एजन्सीद्वारे सुरू असलेल्या चौकशीत सहभाग असलेल्यांना सहभागी करून घेत नाही. आम्हाला कोणालाही आमंत्रित करण्याची किंवा पक्ष प्रवेशासाठी कुणाच्या मागे लागण्याची आवश्यकता नाही. भाजपाची ताकद आता वाढलेली आहे. त्यामुळे लोक स्वतः भाजपात प्रवेश करत आहेत. यातील जे चांगले आहेत, लोकाभिमुख कामे करतात त्यातल्या निवडक लोकांना आम्ही घेऊ. "

 

"पक्षाचे नेते सोडचिठ्ठी का देत आहेत ते पाहावे"

"आम्हाला दबावाचे राजकारण करण्याचीही आवश्यकता नाही. भाजपाने गेल्या पाच वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात अनेक साखर कारखान्यांना त्यांच्या कठीण परिस्थितीत मदत केलेली आहे. यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांची मोठी यादी आहे, मात्र आम्ही त्याबदल्यात कोणालाच भाजपात प्रवेश करण्यास सांगितले नाही. शरद पवारांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेते पक्षाला का सोडचिठ्ठी देत आहेत, याबाबत आत्मचिंतन करावे," असाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@