व्यापार-आंतरराष्ट्रीय संबंधांचे व्यासपीठ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2019   
Total Views |
 



१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर व्यापार हे आंतरराष्ट्रीय संबंधांचे व्यासपीठ म्हणून उदयास आले. व्यापाराच्या माध्यमातून आर्थिक प्रगती, विविध संधीचे द्वार खुले होणे, माहिती-तंत्रज्ञान आणि विचार यांची देवाणघेवाण होणे, यांसारखे अनेक विषय हाताळले जात असले तरी, दुसर्‍या राष्ट्रात केलेली वित्तीय गुंतवणूक ही राष्ट्राचे परराष्ट्र धोरण ठरविणेकामी मोलाची भूमिका बजावत असते. व्यापाराच्या माध्यमातून देशसेवा कशी करता येऊ शकते आणि देशाची आर्थिक आणि सामाजिक उन्नती घडविण्यासाठी व्यापार हा कसा एक सशक्त मार्ग असू शकतो, याचा आदर्श वस्तुपाठ ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ या संस्थेने घालून दिला आहे.

 

नुकतीच गुयाना येथे उच्चायुक्त म्हणून नियुक्त झालेले डॉ. के. जे. श्रीनिवास यांनी महाराष्ट्र चेंबरला भेट देत कॅरेबियन देशांमध्ये असलेल्या व्यवसायाच्या संधीबाबत सविस्तर चर्चा केली. दोन्ही प्रदेशांतील द्विपक्षीय व्यापार संबंध वाढविण्यासाठी गुयाना आणि इतर कॅरेबियन देशांमध्ये व्यापार वाढविण्यासाठी प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरला निमंत्रितदेखील करण्यात आले आहे. तसेच श्रीनिवासन यांच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील व्यावसायिक संधींचे द्वारदेखील चेंबरला भविष्यात खुले होण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे वृत्त आहे. तसेच, तुर्की, ग्रीस, मलेशिया, दुबई, साऊथ कोरिया यांसह विविध देशांना महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधी मंडळाने नुकतीच भेट दिली असून व्यापार-व्यवसाय वाढावा, यासाठी तेथील औद्योगिक संघटनांबरोबर सामंजस्य करारदेखील करण्यात आले आहेत. त्यामुळे भारत आणि नमूद करण्यात आलेली राष्ट्रे यांच्यातील व्यापार वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.

 

तसेच, यामुळे अनेक व्यापारी आणि उद्योजकांनादेखील जागतिक पटलावर व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर बेलारूस व भारतीय उद्योजकांच्या बीटूबी बैठकादेखील नुकत्याच संपन्न झाल्या. या बीटूबीमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून भारतीय कंपन्यांबरोबर उद्योग विस्तार व वाढीसाठी करार करण्यात येणार असल्याचे बेलारूस चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या सरचिटणीस मरीना फिलोनोव्हा यांनी चेंबरच्या पदाधिकार्यांना सांगितले आहे. दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार झाल्यामुळे निश्चितच दोन्ही देशांदरम्यान व्यापार संबंध वाढतील, दृढ होतील.

 

बीटूबीचे उद्दिष्ट व्यापार आणि व्यावसायिक संपर्कांचा विस्तार करणे असून बेलारूसी-भारतीय आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी योग्य योगदान देणे आहे. या बीटूबीच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील व्यापार-उद्योगवाढीसाठी करार होण्यास नक्कीच आगामी काळात मदत होणार आहे. या करारामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यास नक्कीच मदत होण्याची शक्यता आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय संबंधांना प्रोत्साहन देणे आणि एसआरईंना अ‍ॅग्रो इंडस्ट्रियल, मेडिकल टुरिझम, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी आदी क्षेत्रांना यामुळे चालना मिळण्याची शक्यतादेखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.

 

त्याचप्रमाणे भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील व्यावसायिक संबंध दक्षिण कोरिया, जी-फेअर कोरिया येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर आणि गेओन्गिडो बिझनेस अ‍ॅण्ड सायन्स एक्सीलरेटर (जीबीएसए) दरम्यान सामंजस्य करारदेखील करण्यात आला आहे. या करारावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, सह-अध्यक्ष आंतरराष्ट्रीय संबंध समितीचे अध्यक्ष मनप्रीत नागी आणि गियॉन्गिडो बिझनेस अ‍ॅण्ड सायन्स एक्सलरेटर, ग्लोबल ट्रेड डिव्हिजनचे कार्यकारी संचालक चोई आयके सुक आदींनी स्वाक्षरी केली आहे.

 

या करारामुळे दोन देशांमधील मजबूत व्यावसायिक संबंधांच्या विकासासाठी व्यावहारिक फ्रेमवर्क स्थापित होण्यास मदत होण्याबरोबरच परस्पर आर्थिक उद्दिष्टे अंमलबजावणी करणारी सहकार्याची प्रक्रिया निश्चित होण्यासदेखील मदत होणार असल्याचे चेंबरच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच गियॉन्गिडो बिझनेस अ‍ॅण्ड सायन्स एक्सलरेटर, ग्लोबल ट्रेड डिव्हिजनचे कार्यकारी संचालक चोई आयके सुक यांनी देखील या करारामुळे दोन्ही देशांतील व्यवसाय वाढण्यास मदत होणार असून सर्व स्तरावर माहितीची देवाणघेवाण करून व्यापार-उद्योगांचा मोठ्या प्रमाणात विकास करणे साध्य होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@