कर्नाटकात पुन्हा भाजप सरकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2019
Total Views |



चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान


बंगळुरू : माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शुक्रवारी भाजपने येथे आपली सत्ता स्थापन केली. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली असून चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान त्यांनी मिळवला.

 

कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडीचे सरकार सोमवारी कोसळल्यानंतर भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मुख्यमंत्रिपदासाठी येडियुरप्पा हाच भाजपचा चेहरा असेल हेही स्पष्ट झाले होते. मात्र, कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर लगेचच सत्तास्थापनेचा दावा न करता येडियुरप्पा यांनी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी राज्यपालांना पत्र लिहून त्यांनी भाजपच्या सत्तास्थापनेचा दावा केला. शपथविधी सोहळ्याला जाण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी कडू मल्लेश्वर मंदिरात जाऊनही दर्शन घेतले. त्यानंतर राजभवनावर झालेल्या छोटेखानी सोहळ्यात शुक्रवारी येडियुरप्पा यांनी शपथ घेतली आहेयेडियुरप्पा केवळ यांनीच शपथ घेतली असून ते राज्याचे २५वे मुख्यमंत्री ठरले. शपथविधीनंतर येडियुरप्पा यांच्यापुढे बहुमताची अग्निपरीक्षा असणार आहे. राज्यपालांनी ३१ जुलैपर्यंत त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.

 

बहुमताचे गणितही भाजपच्या बाजूने

 

कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या २२५ आहे. त्यातील एक अपक्ष आणि काँग्रेसच्या दोन बंडखोर सदस्यांना विधानसभा सभापती के. आर. रमेश कुमार यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे एकूण सदस्यसंख्या २२२ झाली आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या आणखी १४ बंडखोर सदस्यांबाबत अद्याप सभापतींनी निर्णय घेतलेला नाही. सद्यस्थितीत सभागृहात ११२ हा बहुमताचा आकडा आहे. बंडखोर आमदार सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची शक्यता धुसर आहे. त्यांच्या अनुपस्थितीत २०८ इतके सदस्य उरतील आणि बहुमताचा आकडा १०५ वर येईल. हे गणित भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. भाजपकडे १०५ इतके संख्याबळ असून दोन अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. ते पाहता येडियुरप्पा तूर्त बहुमताची परीक्षा पास होतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@